Bhairav Battalion Indian Army : गेल्या वर्षभरात भारतीय लष्कराच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीची अनेक महत्त्वाची शस्त्रास्त्रे आणि उपकरणे दाखल झाली. आता पायदळाची ताकद वाढवण्यासाठी लष्करात लवकरच भैरव बटालियन्सचा समावेश केला जाणार आहे. भारतीय लष्कराच्या पायदळ विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी बुधवारी त्या संदर्भातील माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यांत लष्करात २५ भैरव बटालियन्स दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नेमक्या काय आहेत या बटालियन्स? त्यांचा वापर कशासाठी केला जाणार? त्या संदर्भातील हा आढावा…
लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सहा महिन्यांमध्ये लष्करात २५ भैरव बटालियन्सची स्थापना केली जाईल. त्यापैकी २५० सैनिकांच्या पाच बटालियन्सची स्थापना झाली असून, १ ऑक्टोबरपासून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या महिन्यात प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या प्रत्यक्ष कामाला लागणार आहेत. पुढील सहा महिन्यांत अशा एकूण २५ बटालियन्स तयार करण्याची योजना आहे. विशेष मोहिमांसाठी या बटालियन्स तयार केल्या जात असून, त्या भारतीय लष्कर आणि पॅरा मिलिटरी फोर्समध्ये दुवा म्हणून काम करतील, असेही लेफ्टनंट जनरल म्हणाले.
भैरव बटालियन म्हणजे काय?
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जुलै महिन्यात पहिल्यांदाच पायदळात भैरव बटालियन्सच्या समावेशाचा उल्लेख केला होता. त्यानंतर लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनीही या बटालियन्सला भारतीय लष्करात सामील करण्याच्या योजनांबद्दलची माहिती दिली होती. २७ ऑक्टोबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या शौर्य दिनाच्या आधी भैरव बटालियन्सचा पायदळात समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी अजय कुमार यांनी भैरव बटालियन्सला ‘लीन अँड मीन’ (सुव्यवस्थित पण घातक) दल असे संबोधले होते. भारत–चीन आणि भारत–पाकिस्तान सीमांवर जलद आणि उच्च-प्रभावी कारवायांसाठी ही बटालियन्स तयार केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
भैरव बटालियन्सची स्थापना कशासाठी?
दी प्रिंटच्या वृत्तानुसार, भैरव बटालियन्समधील सैनिक हे ‘स्पेशल फोर्सेस’सारखेच प्रशिक्षित असतील. या बटालियन्समधील प्रत्येक सैनिकाला विशिष्ट ऑपरेशनल भूभागाच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांच्याकडे वेगवेगळी जबादारी असेल. मात्र, या बटालियन्स स्पेशल फोर्सेससारखी अवजड शस्त्रे वापरणार नसून क्लिष्ट मोहिमांमध्येही सहभागी होणार नाहीत. भारतीय लष्कर आणि पॅरा मिलिटरी फोर्स यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम भैरव बटालियन्सकडे असेल. त्यांचा वापर केवळ पाळत ठेवण्यासाठी आणि ‘आत्मघातकी’ मोहिमांसाठी केला जाणार आहे, त्यामुळे शत्रूंवर अधिक प्रभावीपणे हल्ला करता येईल.
भैरव बटालियन्सचे काम काय असेल?
या बटालियन्सचे प्राथमिक काम शत्रूंच्या तुकड्यांची हेरगिरी करणे आणि त्यांच्या कारवाईत व्यत्यय आणणे असेल. यासोबतच, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी किंवा हालचाल रोखणे हेदेखील त्यांचे महत्त्वाचे काम असेल. भैरव बटालियन्सच्या मदतीमुळे स्पेशल फोर्सेसना आपल्या मोहिमांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. शत्रूंवर अचानक आणि गनिमी हल्ले करणे आणि दहशतवादविरोधी कारवाईची जबाबदारी या बटालियन्सकडे असेल. या तुकड्यांमध्ये केवळ लष्कराच्या पायदळाचे जवानच नव्हे, तर आर्मी एअर डिफेन्स आणि आर्टिलरी रेजिमेंट्समधील जवानही सामील असतील, असे लेफ्टनंट जनरल कुमार यांनी सांगितले.
लष्कराकडे किती भैरव बटालियन्स असतील?
लेफ्टनंट जनरल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करात एकूण २५ भैरव बटालियन्स असतील. त्यातील प्रत्येक बटालिन्समध्ये २५० सैनिकांचा समावेश असेल. सध्या या अत्याधुनिक आणि चपळ दलाच्या पाच तुकड्या तयार करून त्यांच्या कार्यक्षेत्रात तैनात करण्यात आल्या आहेत. दी प्रिंटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भैरव बटालियन्सच्या तीन तुकड्या पाकिस्तान आणि चीनच्या उत्तर सीमेवर तैनात आहेत, तर एक तुकडी ईशान्येकडील सीमेवर आणि दुसरी तुकडी पश्चिम सीमेवर आहे. उर्वरित बटालियन्स पुढील सहा महिन्यांत तयार होतील, असे लेफ्टनंट जनरल कुमार यांनी सांगितले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्करात भैरव बटालियन्सची गरज लक्षात आली. या मोहिमेमुळे रणनीतिक कृती आणि धोरणात्मक उद्दिष्टे यांच्यात अचूक समन्वय साधण्याची गरज अधोरेखित झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युद्धनीतीवर भारतीय लष्कराचे विशेष लक्ष
भैरव बटालियन्सबरोबरच भारतीय लष्कराकडून पायदळाचे बळ वाढवण्यासाठी ‘ईगल ऑन द आर्म’ या संकल्पनेअंतर्गत ‘अश्नी ड्रोन प्लाटून्स’ उभारण्यात आल्या आहेत. या प्लाटूनमध्ये विशेष प्रशिक्षित सैनिक असतील आणि ते प्रत्येक २०-२५ सैनिकांच्या तुकडीत पाळत ठेवण्याचे काम करतील. लष्कराकडून सध्या ‘आत्मघातकी’ मोहिमांसाठी नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोन्सची चाचणी सुरू आहे. त्याशिवाय ४.२ लाख क्लोज-क्वार्टर बॅटल कार्बाइन्ससाठी २,७७० कोटी रुपयांचा करार झाला आहे. यातील ६० टक्के पुरवठा भारत फोर्ज करणार आहे, तर उर्वरित पुरवठा पीएलआर सिस्टम्स (अदानी डिफेन्स-इस्रायल वेपन इंडस्ट्रीज संयुक्त उपक्रम) करणार आहे. स्वदेशी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत अमेरिकेकडून १२ जॅव्हलिन लाँचर्स आणि १०४ क्षेपणास्त्रे तातडीने खरेदी केली जात आहेत, अशी माहितीही लेफ्टनंट जनरल कुमार यांनी दिली आहे.
हेही वाचा : Shocking आईसलँडमध्ये सापडला पहिला डास!; जाणून घ्या, या घटनेमागील ५ महत्त्वाचे मुद्दे!
भारतीय सेनेत होणाऱ्या इतर बदलांची रूपरेषा
या नवीन बटालियन्स आणि आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे भारतीय लष्कराची ताकद नक्कीच वाढणार आहे. लष्कराला मिळणारी नवीन शस्त्रास्त्रे, जसे की स्नायपर रायफल्स, मशीन गन्स आणि रॉकेट-लाँचर्स, यामुळे सैनिकांची मारक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय टँक नष्ट करणारी क्षेपणास्त्रे आणि सॉफ्टवेअर-डिफाइंड रेडिओमुळे दळणवळण आणि शत्रूच्या रणगाड्यांना लक्ष्य करण्याची क्षमताही सुधारणार आहे. जॅव्हलिन लाँचर्स आणि क्षेपणास्त्रे तातडीने खरेदी केल्यामुळे सीमेवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर अधिक सज्ज होईल. या सर्व उपायांमुळे भारतीय लष्कराची कार्यक्षमता आणि सुरक्षा अधिक मजबूत होईल, असा विश्वासही लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी व्यक्त केला आहे.
