नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमातील शिफारशींनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा (OBE) आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सीबीएसईने काही शाळांना प्रस्ताव दिला आहे. ही ओपन बुक परीक्षा प्रायोगिक तत्वावर घेतली जाणार असून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी, तर इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांच्या परीक्षा या पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव सीबीएसईने दिला आहे.
ही परीक्षा प्रायोगिक तत्वावर घेण्यात येत असून याद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारा वेळ, तसेच या पद्धतीसंदर्भात शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मिळवणे हा सीबीएसईचा मुख्य उद्देश आहे. मात्र, ओपन बुक परीक्षा ही संकल्पना नेमकी काय आहे? सीबीएसईने अशा प्रकारची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव का दिला आहे? ही परीक्षा पद्धत पारंपरिक परीक्षा पद्धतीपेक्षा सोप्पी असते का? याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा – ‘ओरिजिन’च्या निमित्ताने: भारतीय सिनेसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रण केव्हा व कुणी केले?
ओपन बुक परीक्षा नेमकी काय आहे?
ओपन बुक परीक्षा म्हणजे नावानुसारच अभ्यासाची सामग्री वापरण्याची मुभा असलेली परीक्षा होय. या परीक्षा पद्धतीत विद्यार्थी पेपर सोडवताना स्वत:जवळ पुस्तक ठेऊ शकतात. यामध्ये नोट्स, पाठयपुस्तके, वह्या यांचा समावेश असू शकतो. ओपन बुक परीक्षा ही मुख्यत: दोन पद्धतीनुसार घेतली जाऊ शकते. एक म्हणजे प्रतिबंधित पद्धत आणि दुसरी म्हणजे मुक्त पद्धत. प्रतिबंधित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना केवळ शाळांनी उपबल्ध करून दिलेली सामग्री, म्हणजे पुस्तक, नोट्स वह्या वापरण्याची परवानगी असते, तर मुक्त परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थी आपल्याला हवी ती पुस्तके किंवा नोट्स वापरू शकतो.
ही परीक्षा पद्धत सामान्य परीक्षा पद्धतीपेक्षा सोपी असते का?
ओपन बुक परीक्षा ही सामान्य परीक्षांपेक्षा सोपी असते, असं म्हणता येणार नाही. कारण सामान्य परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचे परीक्षण केले जाते, तर ओपन बुक परीक्षेत त्या विषयाची समज व संकल्पनेचे विश्लेषण करण्याची क्षमता याची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील प्रश्न तशा पद्धतीने मांडले जातात. महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर शिक्षकांसाठीही आव्हानात्मक ठरू शकतात. कारण या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे थेट पुस्तकात मिळणार नाही, याची काळजी शिक्षकांना घ्यावी लागते. मुळात पाठयपुस्तकातील माहिती फक्त उत्तर म्हणून पेपरमध्ये उतरवणे हे थांबवून, प्रश्नाचं उत्तर शोधून ओळखणं, हे कसब निर्माण करणं हा या परीक्षांचा हेतू असतो.
ही संकल्पना भारतात नवीन आहे?
ही संकल्पना भारतात पहिल्यांदाच मांडण्यात आली असं नाही. २०१४ मध्ये सीबीएसईने इयत्ता ९ वीची हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान; तर इयत्ता ११ वीची अर्थशास्त्र, जीवशास्त्र आणि भूगोल या विषयांची परीक्षा ओपन बुक परीक्षा पद्धतीनुसार घेतली होती. यासाठी विद्यार्थ्यांना चार महिन्यांपूर्वी अभ्यास साहित्य पुरवण्यात आले होते. मात्र, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत बंद करण्यात आली.
याशिवाय २०१९ मध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) या संस्थेच्या शिफारशींनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ओपन बुक परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच करोना काळात दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठी, अलीगड मुस्लीम विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठांच्या परीक्षाही ओपन बुक परीक्षा पद्धतीप्रमाणे घेण्यात आल्या होत्या. तसेच आयआयटी दिल्ली, आयआयटी इंदौर आणि आयआयटी बॉम्बे यांनीही ऑनलाइन पद्धतीने ओपन बुक परीक्षा आयोजित केली होती.
सीबीएसईने ओपन बुक परीक्षा घेण्याचा प्रस्ताव का दिला?
सीबीएसईने हा निर्णय शिक्षण पद्धतीतील प्रस्ताविक सुधारणांच्या अनुषंघाने घेतला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अशाप्रकारच्या परीक्षा पद्धतीचा कोणताही उल्लेख नाही. तर या धोरणात विद्यार्थ्यांनी घोकमपट्टी न करता त्यांना विविध संकल्पना समजाव्या या उद्देशाने सुधारणा सुचवल्या आहेत. उदा. विद्यार्थ्यांनी केवळ प्रकाशसंश्लेषण ही संकल्पना काय हे तोंडी सांगून चालणार नाही, तर त्यांना प्रात्यक्षिकद्वारे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया आणि त्याचा वनस्पतींवर होणारा परिणामही दाखवता आला पाहिजे, या उद्देशाने या सुधारणा सुचवल्या आहेत. याशिवाय शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातदेखील सध्याच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.
हेही वाचा – विश्लेषण : संदेशखाली प्रकरण काय आहे? यावरून ममता-भाजप संघर्ष का उडाला?
ओपन बुक परीक्षेसंदर्भातील संशोधन काय सांगतं?
२०२१ साली भुवनेश्वर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांनी ओपन बुक परीक्षेसंदर्भात एक संशोधन केले होते. त्यानुसार, या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होण्यास मदत होत असल्याचे या संशोधनातून पुढे आले होते. याशिवाय २०२० साली केंब्रिज विद्यापाठातील विद्यार्थ्यांनी ओपन बुक परीक्षेची व्यवहार्यता तपासण्याचा प्रयत्न केला. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या या अभ्यासानुसार, ९८ पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण तर २१ विद्यार्थी नापास झाल्याचं पुढे आले. यापैकी ५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेबाबत अभिप्राय दिला होता. त्यापैकी अनेकांनी मान्य केले, की या पद्धतीमुळे त्यांच्यावरचा तणाव काहीसा कमी झाला.