-इंद्रायणी नार्वेकर

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई आणि त्यावरून होणारे राजकीय वाद हे ठरलेलेच असतात. तसे ते या वर्षीही झाले. या वर्षी ७ मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपली. मात्र स्थायी समितीने नालेसफाईशी संबंधित प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे नालेसफाईचे नियोजन कोलमडले. दरवर्षी १ एप्रिल पासून होणारी नालेसफाई यंदा रखडली. प्रशासनाने आपल्या अधिकारात प्रस्ताव मंजूर केले आणि अखेर ११ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ही नालेसफाई पूर्ण होणार का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर येणारा हा पावसाळा आणि त्याआधीची ही नालेसफाई यंदा खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नालेसफाई कशासाठी?

मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईचा बराचसा भाग हा खोलगट बशीसारखा सखल आहे. यातच मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे हे त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून कचरा येतोच त्याचबरोबर आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो कचरा टाकला जातो. त्यामुळे हे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी हा गाळ काढणे आवश्यक असते. त्यामुळे पालिका दरवर्षी नदी व नाल्यातील गाळ काढण्यासाठी सुमारे २०० कोटींचे कंत्राट देत असते.

किती गाळ काढतात?

मुंबईतील विविध मोठ्या, लहान नाल्यांसह पेटीका नाले तसेच रस्त्यांलगतच्या जलमुखांची साफसफाई या नालेसफाईत अंतर्भूत असते. नदी नाल्यांमधून साचलेला गाळ हा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास ८ लाख ८८ हजार मेट्रिक टन गाळ काढून मुंबई बाहेरील क्षेपणभूमीवर नेण्यात येतो. या एकूण गाळापैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो. तर १० टक्के गाळ पावसाळ्यात आणि १५ टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जातो.

गाळ काढण्याचे उद्दिष्ट कसे ठरते?

पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. मात्र एखाद्या नाल्यात १ मीटर उंचीपर्यंत गाळ असेल तर तो सगळा काढून टाकला जात नाही. तर त्यापैकी केवळ १५ सेंमीपर्यंत गाळ काढला जातो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मदत होते. सगळा गाळ काढणे हे खूप वेळखाऊ आणि प्रचंड खर्चिक होते. 

नालेसफाईवर लक्ष कसे ठेवतात?

नालेसफाईच्या कामात अनेकदा घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. उद्दिष्टाइतका गाळच न काढणे, गाळात बांधकामाचा राडारोडा मिसळणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालिकेने आता नालेसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी खास यंत्रणा उभी केली आहे. प्रत्येक २०० मीटर अंतराच्या कामासाठी किमान ५ मिनिटे कालावधीची दृकश्राव्य चित्रफित (व्हिडिओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअल टाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करून ती अपलोड करणे कंत्राटदारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांना पार पाडावी लागणार आहे. 

नालेसफाईचा एकूण खर्च किती?

मोठ्या नाल्यांसाठी एकूण सुमारे ७१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तर लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर रस्त्यालगतच्या गटारांसाठी मिळून १७० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. गाळासाठी मेट्रिक टन मागे १६०० रुपये दर आहे. या व्यतिरिक्त  सुमारे २० किमी लांबीच्या मिठी नदीतील गाळ काढण्याचे संपूर्ण वेगळे कंत्राट दोन वर्षांसाठी दिले जाते.