आपला देश पावसाच्या लहरीपणाशी झुंजत असताना युरोपातले अनेक देश तीव्र उन्हाळ्याच्या संकटाचा सामना करत आहेत. या थंड देशांमध्ये उष्णतेची लाट आलीय, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण खरेच पश्चिम युरोपातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे देश ‘हीट डोम’च्या प्रभावाखाली आहेत. हा हीट डोम नक्की काय प्रकार आहे… जाणून घेऊ.
पश्चिम युरोपात किती उष्णता आहे?
पश्चिम युरोपमधील बऱ्याच भागांमध्ये जूनच्या अखेरच्या आठवड्यात तीव्र उष्णतेची लाट पसरली होती. स्पेनमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आणि फ्रान्समध्ये जंगलात वणवे पेटले. स्पेनमध्ये यंदाचा जून महिना आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ठरला आहे, असे तिथल्या हवामान खात्याने (AEMET) सांगितले आहे. पोर्तुगालमधील मोरा या शहरात जून महिन्याचे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ४६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. लंडन आणि आग्नेय भागात तापमान ३४ अंशांच्या जवळपास होते. हिथ्रो येथे ३३.१°C तापमान नोंदवले गेले. उत्तर आणि पश्चिम ब्रिटन या उच्च-दाबाच्या क्षेत्राबाहेर असल्यामुळे तिथे हवामान तुलनेने थंड आणि दमट आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की ब्रिटन आणि नेदरलँड्सह अनेक देश या उष्णतेला कारणीभूत असलेल्या ‘हीट डोम’च्या प्रभावाखाली आहेत.
हीट डोम म्हणजे काय?
हीट डोम म्हणजे वातावरणातील हवेचे उच्च-दाबाचे घुमटाकार क्षेत्र. वातावरणातील हालचालींमुळे हवा एका ठिकाणी अडकते. पुढे सरकत नाही. हवामानातील उच्च-दाबाचे हे क्षेत्र जे काही दिवस किंवा आठवड्यांपर्यंत एका भागावर टिकून राहते. आपण उकळत्या पाण्याचे उदाहरण घेऊ. पातेल्यात पाणी उकळत ठेवले आणि तर त्याची गरम वाफ वर येऊन वातावरणात पसरते. पण जर त्या पातेल्यावर झाकण ठेवले तर काय होईल? एखादा पदार्थ लवकर शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवले जाते. त्यामुळे गरम हवा झाकणाखाली साठून राहते आणि पाणी लवकर तापते किंवा पदार्थ लवकर शिजतो. तसेच एखाद्या क्षेत्रात अधिक काळासाठी गरम हवा साठून राहिली तर वातावरणात घुमटाकार उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते. कारण हवेची प्रवृत्ती अशी की ती तापली तर वातावरणात वर जाते. थंड झाल्यावर खाली येते. यामुळे ही घुमटाकार स्थिती तयार होते. ही स्थिती काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत टिकून राहते. उच्च-दाबामुळे गरम हवा खाली अडकते, ती आणखी तापते आणि संकुचित होऊन (कॉम्प्रेस) डोम तयार करते. त्यामुळे जास्त उष्णता जमिनीवर पोहोचते. जमीन शुष्क झाल्याने ती आणखी गरम होते. अशा हवेमुळे ढग तयार होण्यास अडथळा येतो. आकाश निरभ्र राहते. सूर्याची किरणे सरळ जमिनीवर पडतात.
हीट डोमचा परिणाम काय होतो?
हीट डोममुळे दिवसभर सूर्यप्रकाश, तापलेली हवा असते. थोडीशीही गार हवा मिळत नाही. जितका वेळ हा गरम हवेचा घुमट एका भागावर टिकून राहतो, तितकी रस्ते, इमारतींवर उष्णता साठते आणि जमिनीत ओलसरपणा कमी होतो, जमीन तापते. जंगलातील झाडेही वाळून जातात आणि उष्णतेने वणवे लागण्याची शक्यता वाढते.
हीट डोमची अवस्था काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सध्या युरोपला जाणवणारा हीट डोम काही दिवसांत निघून जाईल.
हवामान बदलाशी संबंध आहे का?
हीट डोम ही तशी नवीन गोष्ट नाही. पण आता त्याचे परिणाम अधिक तीव्र झाले आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात की यावेळचा उष्णतेचा तीव्रपणा आणि इतक्या लवकर ही उष्णतेची लाट येणे हे हवामान बदलाशी सुसंगत आहे. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र, वारंवार आणि विस्तृत होत आहेत. वातावरणात हरितगृह वायूंचा साठा वाढल्यामुळे – विशेषतः जीवाश्म इंधन जाळल्यामुळे – पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले आहे. त्यामुळे जेव्हा उष्णतेची लाट येते, तेव्हा तापमान अधिक उच्च पातळीवर पोहोचते.
औद्योगिक क्रांतीपासून (१९व्या शतकातील) पृथ्वीचे सरासरी तापमान जवळपास १.३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. युरोप हा जगात सर्वात वेगाने तापणारा खंड आहे. जागतिक सरासरीपेक्षा दुपटीने युरोपमधील उष्णता वाढत आहे.
भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक?
हवामान बदलामुळे अशा टोकाच्या उष्णतेच्या लाटा वेळेआधी येऊ लागल्या आहेत आणि जास्त दिवस टिकत आहेत. अमेरिकेतसुद्धा दोन आठवड्यांपूर्वी अशाच हीट डोममुळे तीव्र उष्णतेचा अनुभव आला.
भविष्यात कोणत्या महिन्यात अशी लाट येईल हे अचूक सांगता येत नाही, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी सध्याचे अंदाज सांगतात की युरोपमध्ये या वर्षी सरासरीपेक्षा अधिक गरम उन्हाळा असेल. युरोपीय महासंघाच्या कोपरनिकस हवामान सेवा विभागाच्या डॉ. सामंथा बर्गेस यांनी ‘रॉयटर्स’ला ही माहिती दिली.