अमोल परांजपे

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा उमेदवारीच्या शर्यतीत उतरलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोपनीय कागदपत्रांच्या अयोग्य हाताळणीबाबत दाखल आरोपपत्र उघड झाले आहे. यात अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ट्रम्प आज, मंगळवारी फ्लोरिडामधील न्यायालयात हजर होणार आहेत. ट्रम्प यांच्या या कृतीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचला का, ट्रम्प यांच्या उमेदवारीवर काय परिणाम होऊ शकतो, याचा हा आढावा…

ट्रम्प यांच्यावरील नवे आरोप कोणते?

आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झालेल्या ट्रम्प यांच्यावर आता अत्यंत गोपनीय सरकारी कागदपत्रांची अयोग्य हाताळणी केल्याप्रकरणी आरोप झाले आहेत. या आरोपपत्राचा तपशील उघड झाला असून यामध्ये गोपनीय कागदपत्रे स्वत:कडे ठेवणे, न्यायप्रक्रियेत बाधा आणणे, अफवा पसरविणे यांसारखे ३७ आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेची अण्वस्त्रसज्जता, दुसऱ्या एका देशाची अण्वस्त्रसज्जता, ‘व्हाइट हाऊस’ला दिली गेलेली गोपनीय माहिती, अमेरिका व अन्य देशांची लष्करी ताकद आदी महत्त्वाचे दस्तऐवज ट्रम्प यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर स्वत:च्या ताब्यात ठेवल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आपल्या राजकीय कृतिगटातील एका व्यक्तीला दुसऱ्या देशातील लष्करी कारवाईचा नकाशा दाखविल्याचा गंभीर आरोप आहे. एक लेखक, एक प्रकाशक आणि आपल्या दोन कर्मचाऱ्यांना (सुरक्षित कागदपत्रे पाहण्याची परवानगी नसताना) एका हल्ल्याची लष्करी योजना दाखविली होती. विशेष म्हणजे ही कागदपत्रे सरकारला परत करण्याचा आग्रह धरणाऱ्या आपल्या वकिलांपासूनही त्यांनी ती लपवून ठेवली, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

आरोपांवर ट्रम्प यांचे म्हणणे काय?

ट्रम्प यांनी अर्थातच हे आरोपही फेटाळले आहेत. समाजमाध्यमावरील दृकश्राव्य संदेशात ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. मी निर्दोष आहे आणि हे मी अत्यंत स्पष्टपणे आणि शक्यतो लवकरात लवकर सिद्ध करीन. आरोपपत्रातील तपशील उघड झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेने आपल्या पाठीराख्यांना देणग्यांचे आवाहनही केले. ट्रम्प यांच्याविरोधातील हे प्रकरण हाताळणाऱ्या सरकारी वकिलावर त्यांनी आगपाखड केलीच, शिवाय राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही आरोप केले. “माझ्याकडे लपविण्यासारखे काही नव्हते. आताही नाही,” असे ट्रम्प सातत्याने सांगत आहेत. जॉर्जियामधील पक्षाच्या कार्यक्रमातही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. आरोपपत्र म्हणजे निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न आहे, असा नवा आरोपही त्यांनी या वेळी केला. या (आणि यापूर्वी दाखल आरोपपत्रांचा) ट्रम्प प्रचारात वापर करतील, असे संकेत यातून मिळाले असल्याने आता डेमोक्रेटिक पक्ष हे प्रकरण कसे हाताळतो, याची उत्सुकता आहे.

यापुढे काय होऊ शकेल?

ट्रम्प हे मंगळवारी, १३ जून रोजी दक्षिण फ्लोरिडामधील न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमधील एका प्रकरणात मॅनहॅटन जिल्हा न्यायालयात त्यांनी अशाच पद्धतीने शरणागती पत्करली होती. बंद दाराआड त्यांना तांत्रिक अटक दाखवून लगेचच जामीनही देण्यात आला. या वेळीही असेच काही तरी होण्याची शक्यता वर्तविली जात असली, तरी या प्रक्रियेबाबत अद्याप कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फ्लोरिडामधील या प्रकरणाची सुनावणी घेणारे न्यायाधीश एलिन कॅनन यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प यांनीच केली होती. याच न्यायाधीशांनी पूर्वी ट्रम्प यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांची स्वायत्त मध्यस्थामार्फत तपासणी करण्याची मागणी मान्य केली होती, हे विशेष. अन्य प्रकरणांप्रमाणेच या वेळीही ट्रम्प यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढावे, असे म्हटले आहे.

उमेदवारीवर काय परिणाम होईल?

विधिज्ञांच्या मते त्यांच्यावरील हे आरोप सिद्ध झाले, तरीही त्यांना निवडणूक लढण्यापासून किंवा जिंकण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. उलट न्यूयॉर्कमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर ट्रम्प यांच्या देणग्यांमध्ये वाढच झाली आहे. विशेष म्हणजे प्राथमिक फेरीतील त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी ‘आम्ही एकशे पाच’ या न्यायाने ट्रम्प यांची बाजू उचलून धरली आहे. हिलरी क्लिंटन किंवा बायडेन यांच्यावरील आरोपांबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या सरकारी यंत्रणा ट्रम्प यांना मुद्दाम लक्ष्य करीत असल्याचा आरोप सर्वात प्रबळ प्रतिस्पर्धी रॉन डिसँटिस यांनी केला. अन्य बऱ्याच रिपब्लिकन उमेदवारांनीही असाच सूर लावला. या प्रकरणांचा उपयोग बायडेन यांच्याविरोधात करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा मानस असल्याचे स्पष्ट आहे. आता मंगळवारच्या सुनावणीमध्ये सरकारी यंत्रणा, ट्रम्प आणि न्यायालय काय भूमिका घेतात, यावर दोन्ही पक्षांची पुढची खेळी ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com