गेल्या काही महिन्यात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. इंधनाचे चढेच असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. मार्चमध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर म्हणजेच १३७ दिवसांनंतर १६ दिवसांत १४ वेळा किमती वाढल्या. ब्रेंट क्रूडची किंमत ४ नोव्हेंबरपासून प्रति बॅरल सुमारे २५.५३ डॉलर्सने वाढून १०६.४८ डॉलर्स प्रति बॅरल झाली आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५% आयात करतो. त्यामुळे आता इंधनावर पर्याय शोधला जात आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात १५ टक्के मिथेनॉल मिश्रणासह ‘M15’ पेट्रोल लाँच केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी नीति आयोगाचे सदस्य व्हीके सारस्वत आणि आयओसी चेअरमन एसएम वैद्य यांच्या उपस्थितीत ‘M15’ पेट्रोलच्या पायलट प्रकल्पाचा शुभारंभ केला. M15 पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉलचे मिश्रण आहे. नीति आयोगाच्या व्हिजनवर आधारित भारताला उर्जेच्या गरजांमध्ये स्वावलंबी बनवण्यासाठी इंडियन ऑइलने पायलट प्रोजेक्ट म्हणून M15 पेट्रोलचे वितरण सुरू केले आहे. मिथेनॉल पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवर उत्तम पर्याय ठरू शकते. काही प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेलमध्ये मिसळून देखील वापरले जाऊ शकते किंवा ते १००% वापरले जाऊ शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत प्रदूषणही कमी होते आणि ते स्वस्तही आहे. M-15 च्या वापरामुळे वायू उत्सर्जन ५ ते १० टक्क्यांनी कमी होऊ शकते. मिथेनॉलपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर सुरू केला आहे. भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

मिथेनॉल हे भविष्यातील इंधन
पेट्रोलमध्ये १५% मिथेनॉल मिसळल्यास वायू प्रदूषण ३३ टक्क्यांनी कमी होऊ शकते, तर डिझेल पूर्णपणे बदलल्यास वायू प्रदूषण ८० टक्क्यांनी कमी होईल. शहरांमधील वाहतुकीमुळे 40% पर्यंत वायू प्रदूषण होते. सरकारने M15 आणि M100 वापरण्यास मान्यता दिली आहे.

आसाम पेट्रोकेमिकल लिमिटेड उत्पादन करेल
या प्रकल्पाशी संबंधित अधिकृत निवेदनानुसार, आयओसी भारताला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी पावले उचलत आहे. मिथेनॉलची सहज उपलब्धता लक्षात घेऊन या उपक्रमासाठी तिनसुकियाची निवड करण्यात आली. M15 पेट्रोलचे उत्पादन आसाम पेट्रोकेमिकल लिमिटेडद्वारे डिगबोईच्या परिसरात केले जाईल. चीन, जपान, इटली, स्वीडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये सध्या मिथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. जगभरातील सागरी क्षेत्रात इंधन म्हणून मिथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून स्वीडनसारखे देश त्याचा वापर करण्यात आघाडीवर आहेत.

विश्लेषण : फिल्टर न वापरता समुद्राच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करणारे उपकरण कसे काम करते?

काय फायदा होईल?
पेट्रोल आणि डिझेलच्या जागी मिथेनॉल आल्यास त्याचा सरकार आणि सामान्य माणूस दोघांनाही फायदा होईल. मिथेनॉलच्या वापरामुळे सरकारला वार्षिक ५ हजार कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. केवळ पेट्रोलमध्ये १५% मिथेनॉल मिसळल्यास, कच्च्या तेलाची आयात दरवर्षी १५% कमी केली जाऊ शकते.

तेलाच्या वाढत्या किमतींपासून मिळणार दिलासा
पेट्रोलियम मंत्रालय आयात कमी करण्याच्या दिशेने काम करत आहे आणि मिथेनॉलसह इंधनाचे मिश्रण केल्याने तेलाच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळेल. M15 च्या वापरामुळे इंधन आयात कमी होईल आणि इंधन आयात बिलांमध्ये अब्जावधी डॉलर्सची बचत होईल. याबद्दल बोलताना, आयओसीचे अध्यक्ष एस.एम. वैद्य म्हणाले, “M15 चे हे इंधन स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि आयातीचा भार कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.”

M15 पेट्रोल कुठे मिळेल?
सुरुवातीच्या टप्प्यात M15 पेट्रोलचा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या इंडियन ऑइलच्या निवडक पेट्रोल पंपांवर M15 पेट्रोल मिळेल. सध्या आसाममधील तिनसुकिया शहरात त्याची विक्री सुरू झाली आहे. कारण या भागात मिथेनॉलचे उत्पादन जास्त होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is m 15 petrol fuel prices will bring relief rmt
First published on: 04-05-2022 at 10:18 IST