2006 Mumbai Local Train Blast Case मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेन मध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने मुंबईसह सारा देश हादरला होता. या प्रकरणात १९ वर्षानंतर २१ जुलै रोजी निकाल लागला असून मुंबई उच्च न्यायालयाने १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकल ट्रेनमधले हे साखळी बॉम्बस्फोट प्रकरण नेमके काय होते, ते का आणि कसे घडवले गेले, याविषयी..

७/११ रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण

११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना ‘७/११’ बॉम्बस्फोट म्हणून ओळखले जाते. हा मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक सेवेच्या इतिहासातील एक अत्यंत विनाशकारी आणि काळा दिवस मानला जातो. संपूर्ण देश या बॉम्बस्फोटांनी हादरला होता. या स्फोटांमुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे सेवा ठप्प झाली होती. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले होते. संपूर्ण शहरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकूण किती बॉम्बस्फोट झाले?

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील उपगरीय लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये एकूण ७ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले होते. संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटांपासून ते ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत,अवघ्या ११ मिनिटांच्या आत एकूण ७ बॉम्बस्फोट झाले होते.

कुठल्या स्थानकांत स्फोट झाले?

माटुंगा रोड, माहीम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये स्फोट झाले. विशेष म्हणजे यासाठी केवळ पश्चिम रेल्वेलाच लक्ष्य केले गेले. हल्लेखोरांनी मध्य वा हार्बर रेल्वेला लक्ष्य केले नाही. त्यामुळे हेतूंविषयी शंकाकुशंकांना उधाण आले होते.

किती जणांचा मृत्यू झाला होता?

दहशतवाद्यांनी जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी यासाठी संध्याकाळची गर्दीची वेळ निवडली होती. या स्फोटांमध्ये १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ८२४ हून अधिक लोक जखमी झाले होेते. अनेक जखमींना कायमचे अपंगत्व आले तर काही जणांना दीर्घकाळ उपचारातून जावे लागले.

बॉम्बस्फोटासाठी कुठली पद्धत?

दहशतवाद्यांनी या स्फोटासाठी नवीन पद्धत वापरली होती. त्यांनी बॉम्ब ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला होता. हे प्रेशर कुकर बॅगेत टाकून ते रेल्वे डब्यातील सामानाच्या रॅकवर ठेवण्यात आले होते. प्रवाशांचे सामान असल्याचे वाटून कुणाला संशय आला नाही. प्रेशर कुकरमुळे स्फोटांचा प्रभाव अधिक वाढला. डोक्याच्या उंचीवर स्फोट झाल्यामुळे प्राणहानी आणि गंभीर जखमींचे प्रमाण वाढले. हे स्फोट संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी घडवून आणले गेले ज्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली.

बॉम्बस्फोट कुणी आणि का घडवले?

हे स्फोट पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने, भारतात बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमी) कथित सदस्यांच्या मदतीने घडवून आणले होते. या हल्ल्याचे नियोजन अनेक महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि स्फोट घडवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.

पाकिस्तानची भूमिका काय होती?

भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानच्या आयएसआय (आयएसआयI) या गुप्तचर संस्थेचाही या कटात हात असल्याचा आरोप केला. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये देण्यात आले होते आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे आरडीएक्स (आरडीएक्स) स्फोटके पाकिस्तानातून भारतात आणण्यात आले होते असे तपासात समोर आले.

किती जणांना अटक? किती फरारी आहेत?

दहशतवाद विरोधी पथकाने नोव्हेंबर २००६मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, या प्रकरणात एकूण ३० आरोपींची नावे होती, त्यापैकी १७ जण अजूनही फरारी आहेत. यामध्ये १३ पाकिस्तानी नागरिक आणि काही भारतीय नागरिकांचा समावेश आहे तपासानंतर या प्रकरणात एकूण १३ आरोपींवर खटला चालवण्यात आला.

२०१५ मध्ये न्यायालयात काय झाले?

या खटल्याचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्षे चालली. २०१५ मध्ये विशेष मोक्का न्यायालयाने या प्रकरणातील १३ आरोपींना दोषी ठरवले होते. त्यापैकी दोषसिद्ध ५ आरोपींना फाशीची, तर ७ दोषसिद्ध आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एक आरोपी निर्दोष सुटला होता. फाशीची शिक्षा सुनावलेल्या कमल अन्सारी याचा मृत्यू झाला होता. जन्मठेप झालेल्यांमध्ये मोहम्मद फैजल अताउर रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी, नावेद हुसेन खान आणि आसिफ खान यांचा समावेश होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किती आरोपी निर्दोष सुटले?

दोषींनी विशेष न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांचे विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. या प्रकरणी ५ महिने नियमित सुनावणी सुरू होती. ९२ सरकारी, तर ५० बचाव पक्षाचे साक्षीदार तपासण्यात आले. सोमवार २१ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून सर्वच्या सर्व १२ आरोपींची निर्दोष सुटका करण्याचे निर्देश दिले. आता हे सर्व जण १९ वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.