Where Will be Mock Drill in India : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेनंतर केंद्र सरकारने अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून पाकिस्तानलगत असलेल्या सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जिल्ह्यांमध्ये नव्या मोहिमेची तयारी केली आहे. आज शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून जम्मू- काश्मीरपासून ते गुजरातपर्यंत ‘ऑपरेशन शील्ड’ राबविण्यात येणार आहे. यादरम्यान भोंगे वाजणार असून ब्लॅकआउटही होणार आहे. दरम्यान, ऑपरेशन शील्ड नेमकं आहे तरी काय? भारताने त्याची तयारी का सुरू केली? याबाबत जाणून घेऊ…

काय आहे ऑपरेशन शील्ड?

ऑपरेशन शील्ड ही एक व्यापक सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रील आहे. युद्धजन्य किंवा तत्सम परिस्थितीत यंत्रणेला सहकार्य करत नागरिकांनी नेमकं काय करावं, याचीच माहिती या मॉक ड्रीलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत शत्रूंची विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून नागरिकांनी स्वत:चे संरक्षण कसे करायला हवे याचे प्रशिक्षणही यावेळी दिले जाणार आहे. या मॉक ड्रीलमधून स्थानिक प्रशासनाची, नागरिकांची तसेच स्वयंसेवकांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी, समन्वय आणि प्रतिसाद क्षमता तपासली जाणार आहे. ७ मे रोजी देशातील काही निवडक राज्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स ड्रील्स पार पडल्या होत्या. त्यापेक्षाही ऑपरेशन शील्ड मोठे असल्याचे सांगितले जात आहे.

ऑपरेशन शील्ड आताच का राबवलं जातंय?

२९ मे रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ऑपरेशन शील्ड राबवण्याचा निर्णय यापूर्वी झालेल्या सरावातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण धड्यांवर आधारित आहे. मागील सरावामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ऑपरेशन शील्डचा मुख्य उद्देश या गंभीर उणीवा भरून काढणे आणि शत्रूच्या हल्ल्यांपासून बचावासाठी सिव्हिल डिफेन्सची तयारी वाढवणे असा आहे. या प्रसिद्धीपत्रकात स्थानिक प्रशासनाला सरावामध्ये पूर्णपणे सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही मॉक ड्रील विशेषतः नियंत्रण रेषेजवळील भागांवर लक्ष केंद्रित करणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या सरावाचा उद्देश या संवेदनशील भागांतील आपत्ती व्यवस्थापनाची तयारी व नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे.

आणखी वाचा : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचं मुस्लीम नेत्याकडून कौतुक; काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?

कोणत्या राज्यांमध्ये होणार ऑपरेशन शील्ड?

७ मे रोजी देशातील काही निवडक राज्यांमध्ये मॉक ड्रील घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता ऑपरेशन शील्ड यावेळी संपूर्ण देशात नव्हे तर फक्त सीमावर्ती भागात राबवले जाणार आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून ऑपरेशन शिल्ड राबवले जाईल. या सरावामध्ये कठुआ, सांबा, जम्मू, उधमपूर, राजौरी, पूंछ, बारामुला आणि कुपवारा यांसारख्या संवेदनशील सीमावर्ती जिल्ह्यांचा समावेश असेल.

पंजाब-चंदीगडमध्ये होणार ब्लॅकआऊट

पंजाबमध्ये ऑपरेशन शील्ड अंतर्गत होणाऱ्या मॉक ड्रीलमध्ये सीमेवरील धोकादायक नागरी भागांमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात येईल. सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांचा यामध्ये अपवाद असणार आहे. यादरम्यान, हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले जाणार आहेत. स्थानिक प्रशासन व नागरिक हे संभाव्य हल्ले किंवा आपत्तींच्या परिस्थितीत कितपत तयार आहेत, याची चाचपणी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पंजाबचे विशेष पोलिस महासंचालक संजय कालरा यांनी सांगितले की, ही मॉक ड्रील संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार असून संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल.

चंदीगडमध्ये, किशनगड आणि आयटी पार्क भागात रात्री ८ वाजेच्या सुमारास १० मिनिटांचा ब्लॅकआउट पाळण्यात येईल, असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. हरियाणा राज्य सरकारने ऑपरेशन शील्ड संपूर्ण २२ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, हे सराव सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होणार आहेत, ज्यामध्ये हवाई हल्ले, ड्रोन हल्ले आणि इतर युद्धकालीन आपत्कालीन परिस्थितींचे अनुकरण करण्यात येईल. रात्री आठ ते सव्वाआठ या वेळेत राज्यात ब्लॅकआउट होईल, असं सरकारने सांगितलं आहे.

हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर का आले आहेत?

राजस्थानमधील ४१ जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन शील्ड

राजस्थानमधील सर्व ४१ जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन शील्ड राबवले जाणार आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही मॉक ड्रिल संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल. “आम्ही अनुभवी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेत आहोत. मॉक ड्रीलसह आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो,” असे एका कर्मचाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितले. जैसलमेरमध्ये तयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील सहा ठिकाणी हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले जाणार आहेत. एकूण ७२ सिव्हिल डिफेन्स कर्मचाऱ्यांना या ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमध्येही होणार ऑपरेशन शील्ड

गुजरातमधील अनेक जिल्ह्यांतही ऑपरेशन शील्डची तयारी करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्र, ‘बॉम्बे समाचार’नुसार, ब्लॅकआउटसाठी पाटण जिल्ह्यातील १८ महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. सिद्धपूर, चनसमा, हरिज आणि राधानपूर हे नगरपालिकांचे परिसरही या सरावाचा भाग असतील. स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये रात्री आठ वाजेपासून ते साडेआठ वाजेपर्यंत असे ३० मिनिटांचे ब्लॅकआउट असेल. यादरम्यान रस्त्यावरील दिवे, दुकानांवरील साईनबोर्ड्स बंद ठेवण्यात येतील. वडोदरा आणि सुरतसारख्या मोठ्या शहरांमध्येदेखील या सरावाचा अंदाज आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. जयंती रवी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने या मॉक ड्रीलच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक यंत्रणांबरोबर समन्वय राखण्याचे निर्देश दिले आहेत.