आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एका संशयित धर्मराज कश्यप हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. परंतु पोलिसांना तो अमान्य होता. अखेरीस त्याचे नेमके वय निश्चित करण्यासाठी बोन ऑसिफिकेशन चाचणी घेण्यात आली. त्यात धर्मराजचे वय १७ नसून १९ असल्याचे स्पष्ट झाले. यानिमित्ताने बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय, यावर दृष्टिक्षेप.

सिद्दीकी हत्या तपासाच्या निमित्ताने

दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथील आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे वडील, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यापैकी एक आरोपी धर्मराज कश्यपच्या वकिलांनी तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यामुळे न्यायालयाने या आरोपीच्या हाडांची तपासणी करण्याचे आदेश दिले. या तपासणीचा अहवाल येईपर्यंत धर्मराजला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, धर्मराजच्या हाडांची ऑसीफिकेशन चाचणी केल्यानंतर तो अल्पवयीन नसल्याचे उघडकीस आले.

आणखी वाचा-मदरशांना निधी देणे थांबवावे, बाल आयोगाची इच्छा; कारण काय? केरळची व्यवस्था इतर राज्यांपेक्षा वेगळी कशी?

ऑसिफिकेशन प्रक्रिया म्हणजे काय?

ऑसिफिकेशन ही हाडांच्या निर्मितीची प्रक्रिया असून ही प्रक्रिया भ्रूण विकासाच्या सहाव्या आणि सातव्या आठवड्यांदरम्यान सुरू होते. वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत ती चालू राहते. ही प्रक्रिया व्यक्तीनिहाय काहीशी भिन्न असते. ऑसिफिकेशन या प्रक्रियेमध्ये बाळाच्या जन्मानंतर त्याच्या स्नायूमधील तंतूमय ऊती हळूहळू हाडामध्ये रूपांतरित होत असतात. यामुळे शरीरात हाडांचा सांगाडा आकार घेण्यास मदत होते. ‘ऑसिफाय’मध्ये गळ्याभोवतीचे हाड सर्वप्रथम वाढण्यास सुरुवात होते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीच्या हाडामध्ये होणारे बदल आणि त्यांचे एकमेकांशी घट्ट होणारे बंध हे ऑसिफिकेशन चाचणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. गर्भाशयातील पाचव्या ते सातव्या आठवड्यात याची वाढ होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यातील सपाट हाडांची पौगंडावस्थेत पूर्ण वाढ होते. त्यामुळे हाडांची चाचणी करून एखाद्या व्यक्तीचे वय ठरविणे शक्य होते.

कशी होते ऑसिफिकेशन चाचणी?

ऑसिफिकेशन चाचणीला एपिफिसील फ्यूजन चाचणी असेही संबोधिण्यात येते. या चाचणीमध्ये ऑसिफिकेशनची डिग्री निश्चित करण्यासाठी शरीरातील विशिष्ट हाडांच्या, विशेषत: गळ्याभोवतीचे हाड, छातीचे हाड आाणि ओटीपोट आणि मांड्यांना जोडणारे हाड, मनगट यांची निवड केली जाते. व्यक्तीच्या वाढत्या वयोमानानुसार हाडांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. त्यामुळे तपासणीसाठी सामान्यपणे या हाडांची निवड करण्यात येते. चाचणीमध्ये या हाडांची क्ष-किरण तपासणी केली जाते. गळ्याभोवतीचे हाड हे लांब हाड असून, ते खांद्याच्या हाडासोबत छातीच्या हाडांनाही जोडलेले असते. या हाडाचा विकास आणि एकमेकांशी घट्ट होत असलेल्या बंधाची प्रक्रिया ही फारच गुंतागुंतीची समजली जाते. त्यामुळे गळ्याच्या भोवती असलेल्या हाडाच्या क्ष-किरण परीक्षणातून तज्ज्ञांना व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावणे शक्य होते. त्याचप्रमाणे छातीची हाडे सपाट असून, ती बरगडीच्या पुढील भागाची रचना करतात. या हाडामध्येही ऑसिफिकेशनची प्रक्रिया घडून येत असते. ओटीपोट आणि मांड्यांना जोडणाऱ्या हाडाच्या संरचनेत वयोमानानुसार लक्षणीय बदल होत असतात. त्यात अनेक हाडे विकासादरम्यान एकत्रित होतात. याचा वापर एखाद्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी केला जाऊ शकतो. ओटीपोटाच्या वरच्या भागावर प्रमुख हाडांची एक रांग असते. जिचा वापर करून ऑसिफिकेशनची डिग्री निर्धारित केली जाते.

आणखी वाचा-विश्लेषण : रॉकेट उडाले.. फिरुनी परतले.. स्थिरावले प्रक्षेपणस्थळी! स्पेसएक्स स्टारशिपच्या अद्भुत पाचव्या चाचणीची चर्चा जगभर का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑसिफिकेशन चाचणीच्या मर्यादा काय?

ऑसिफिकेशन चाचणी फॉरेन्सिक मानववंशशास्त्रज्ञांमार्फत केली जाते. ही चाचणी करण्यासाठी सामान्यत: शरीरातील संबंधित हाडांचे क्ष-किरण काढले जातात. या क्ष-किरणांची नंतर ऑसिफिकेशनच्या लक्षणांसाठी तपासणी केली जाते. ऑसिफिकेशनच्या निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावता येऊ शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या हाडांच्या ऑसिफिकेशनच्या संरचनेत फरक असल्याने अचूक वय काढणे अशक्य असते. त्याचप्रमाणे काही रोग, दुखापत आणि कुपोषण यांसारखे घटक हाडांच्या ऑसिफिकेशनच्या निकषांवर परिणाम करू शकतात, त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वयाचा अचूक अंदाज लावणे अधिक कठीण होते. या मर्यादा असूनही, ऑसीफिकेशन चाचणी फॉरेन्सिक मानववंशशास्त्रज्ञांसाठी उपयुक्त ठरत आहे.