Why Irani Women Burning Hijab: इराणी तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूचा निषेध म्हणून अनेक इराणी स्त्रियांनी बंड पुकारले आहे. इराणमधील गश्त-एरशाद (संस्कृतीरक्षक पोलिसांनी) महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला हिजाब नीट परिधान न करण्यावरून अटक केली होती. जगभरातील प्रसारमाध्यमातुन समोर आलेल्या माहितीनुसार अटकेच्या पश्चात अचानक या तरुणीची प्रकृती खालावली व ती कोमात गेली. यानंतर तिला तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांच्या दरम्यान तिने आपला जीव गमावला. कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनीचा जीव घेतला असल्याचा आरोप करत इराणमधील महिला संतापाने पेटून उठल्या आहेत. महसा अमिनी या इराणी तरुणीच्या मृत्यूच्या निषेधार्थ या महिलांनी आपले हिजाब जाळून तसेच केस कापून आंदोलन पुकारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मसिह अलिनेजाद या इराणी पत्रकार आणि कार्यकर्तीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये इराणमधील महिलांचे आक्रमक आंदोलन पाहायला मिळते. या व्हिडिओत महिला स्वत:चे केस कापताना दिसत आहेत. काही महिला त्यांचे हिजाब जाळतानाही दिसत आहेत. काही महिलांनी पुरूषी वेष परिधान करत अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.

रॉयटर्सच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरुद्ध आंदोलकांनी घोषणा दिल्या असून काही महिलांनी घोषणा देत असताना डोक्यावरचा हिजाब काढून जाळला.

पाहा आंदोलनाचा व्हिडीओ

इराणमध्ये हिजाबचे नियम

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणे इस्लामिक हिजाब नियमांनुसार दंडनीय गुन्हा आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून, इराणच्या कायद्यानुसार, राष्ट्रीयत्व किंवा धार्मिक श्रद्धेचा विचार न करता सर्व महिलांनी केस, डोके व मान झाकणारा हिजाब घालणे आवश्यक आहे. परंतु अनेकांनी गेल्या दोन दशकांमध्ये याविरुद्ध अनेकदा निषेध केला आहे.

संस्कृतीरक्षक पोलिसांचे काम काय?

इराणमध्ये लागू केलेल्या इस्लामसमर्थक कायद्याचं जबरदस्ती पालन करायला लावण्याचे काम हे पोलीस करतात. इराणमधील रस्त्यांवर हे संस्कृतीरक्षक पोलीस – ज्यामध्ये केवळ पुरुषांचा समावेश आहे – गाडीतून गस्त घालतात. सार्वजनिक ठिकाणी जसे की बाजारात, चौकात, रेल्वे स्थानकात उपस्थित असणाऱ्या महिलांनी योग्य पद्धतीने हिजाब परिधान केला आहे का हे पाहणे या पोलिसांचे काम असते. महिलांनी चुकीच्या पद्धतीने हिजाब परिधान केल्याचे आढळल्यास त्यांना थेट पोलीस ठाण्यात नेले जाते. या पोलिसांकडून सहसा महिलांना हिजाबचे महत्त्व समजावून त्यांच्या घरातील पुरुषांच्या हवाली केले जाते.

या घटनेनंतर इराणच्या संस्कृती रक्षक पोलिसांचे प्रमुख कर्नल अहमद मिर्झाई यांना पदावरून निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रमुख इराणी वृत्तपत्रांनी दिली आहे, मात्र तेहरान पोलिसांनी याबाबत पुष्टी केलेली नाही.

संस्कृती रक्षकांच्या मारहाणीत अमिनीने गमावला जीव?

कट्टर पुरूषप्रधान अशा या संस्कृतीरक्षक गटाने २२ वर्षीय कुर्दिश तरुणीला अटक केल्यावर तिला समजावण्यापेक्षा मारहाण केली असावी असा आरोप या तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. अमिनीच्या डोक्याच्या सीटी स्कॅनमध्ये हाड फ्रॅक्चर, रक्तस्त्राव आणि मेंदूला सूज आल्याचे आढळले होते, यावरूनच तिच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे.

अमिनीला अटक होण्यापूर्वी ती ठणठणीत होती, मात्र अटक झाल्यानंतर लगेचच ती कोमात गेली व तिला रुग्णालयात नेण्यात आल्याचं अमिनीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. अमिनीला मारहाण झाली नसून ते वृत्त चुकीचे असल्याचा दावा अंतर्गत व्यवहार मंत्री अब्दुलरेझा रहमानी फझील यांनी इराणच्या सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is really happening in iran who is mahsa amini women take to the streets cut their own hair burn hijabs svs
First published on: 20-09-2022 at 16:28 IST