Stiff-Person Syndrome Symptoms and Treatment: प्रसिद्ध गायिका सेलिन डिओनने एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपल्याला स्टिफ-पर्सन सिंड्रोम झाल्याचे सांगितले आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे निदान झाले आहे ज्यामुळे तिच्या गायनावर सुद्धा परिणाम होत आहे. सेलिन डीओनने आपल्याला होणाऱ्या त्रासाचे वर्णन करणे शब्दात शक्य नाही असे सांगितले आहे. याच आजारामुळे आपण फेब्रुवारीत होऊ घातलेला आपला युरोप दौरा सुद्धा रद्द करत असल्याचे तिने सांगितले आहे. पण नेमका हा आजार आहे तरी काय? आपल्याला याचा कितपत धोका आहे? हा सिंड्रोम नक्की कोणत्या लक्षणातून ओळखता येतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात..
स्टिफ-पर्सन सिंड्रोम म्हणजे काय?
स्टिफ-पर्सन सिंड्रोम किंवा SPS आणि Moersch-Woltman सिंड्रोम हा एक दुर्मिळ विकार आहे. हे सहसा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करते. प्रत्येकी दहा लाख लोकांपैकी एकालाच हा आजार होऊ शकतो. या आजारात संबंधित ओटीपोटाच्या क्षेत्राजवळील स्नायू कडक होणे तसेच पाय आणि शरीराच्या इतर स्नायूंभोवती कडकपणा जाणवू शकतो. सामान्यत: मध्यम-वयीन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
स्टिफ पर्सन सिंड्रोम सेंटरचे संचालक डॉ. स्कॉट न्यूजम यांनी संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोक) वेबसाइटवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे की १९५० च्या दशकात स्टिफ पर्सन सिंड्रोमचे पहिले प्रकरण नोंदवले गेले होते. पुरुषांपेक्षा दुप्पट महिलांना याचा त्रास होतो.
स्टिफ पर्सन सिंड्रोम कशामुळे होतो?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि स्ट्रोकच्या माहितीनुसार, स्टिफ पर्सन सिंड्रोम सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने होऊ शकतो. अद्याप या आजाराचे मूळ कारण समजलेले नाही. मात्र संस्था सांगते की या रुग्णांमध्ये मेंदूतील महत्त्वपूर्ण न्यूरोट्रांसमीटरमध्ये एन्झाइमची गुंतागुंत होऊ शकते. या आजाराचे निदान होण्यासाठी किमान ७ वर्षांचा कालावधी लागतो.
स्टिफ-पर्सन सिंड्रोमची लक्षणे आणि उपचार
स्टिफ-पर्सन सिंड्रोमची लक्षणे विकसित होण्यासाठी काही महिने किंवा वर्षे लागू शकतात कारण काही रुग्णांची स्थिती कालांतराने सुधारू शकते तर काही रुग्णांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते. यात प्रचंड तीव्र वेदना जाणवतात. याचा थेट प्रभाव आपल्याला आवाजावर होतो, इतकेच नव्हे तर यामुळे सतत मूड स्विंग व मानसिक त्रास, चिडचिड जाणवू शकते.
हे ही वाचा<< विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?
स्टिफ-पर्सन सिंड्रोमचे कोणतेही ज्ञात उपचार नाहीत, परंतु या सिंड्रोममध्ये होणारा त्रास औषधांनी कमी होऊ शकतो. या आजारावर स्नायू शिथिल करणारे, पेनकिलर औषध आराम देऊ शकते. स्टिफ पर्सन सिंड्रोम सेंटरद्वारे बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शन्स हे या आजारावरील झटपट आराम देणारे औषध म्हणून ओळखण्यात आले आहे. उपचार न केल्यास या आजारामुळे दैनंदिन जीवनात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.