scorecardresearch

विश्लेषण: अदानी ठरले पहिले भारतीय सेंटीबिलेनियर; पण Centibillionaire म्हणजे काय?, यात कोणत्या १० व्यक्तींचा समावेश आहे?

अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

Gautam Adani Centibillionaire Club
गौतम अदानी ठरले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (फाइल फोटो)

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांचा १०० बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत समावेश झालाय. अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आलीय. मागील वर्षभरापासून त्यांची संपत्ती प्रत्येक आठवड्याला सहा हजार कोटींची वाढत आहे. एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. म्हणजेच अदानींचा सेंटीबिलेनियर्स क्लबमध्ये समावेश झालाय. सेंटीबिलेनियर्स म्हणजे नेमकं काय?, त्यात कोणाकोणाचा समावेश आहे यावर टाकलेली ही नजर…

सेटीबिलेनियर्स म्हणजे कोण?
ज्या व्यक्तींची एकूण संपत्ती ही १०० बिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक असते त्यांना सेंटीबिलेनियर्स असं म्हणतात. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १९९९ पासूनच १०० बिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक होती. मात्र त्यावेळी सेंटीबिलेनिर्यस हा शब्द फारसा वापरला जात नव्हता. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस यांची २०१७ साली एकूण संपत्ती ही ११२ बिलीयन अमेरिकन डॉलर्स झाली. तेव्हापासूनच सेंटीबिलेनियर्स या शब्द प्रत्यक्षात आणि जास्त वेळा वापरला जाऊ लागला. बेझोस यांना पाहिले सेंटीबिलेनियर्स मानलं जातं.

कोणकोण आहे या यादीत?
हळूहळू या सेंटिबिलेनियर्सची संख्या वाढू लागली. २०२० मध्ये या यादीमध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा समावेश झाला. मात्र तोपर्यंत या यादीमध्ये चार जणांची आधीपासूनच समावेश होता. यात

‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष बिल गेट्, जेफ बेझोस, लक्झरी प्रोडक्ट बनवणाऱ्या लुईस व्हींटो कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बरनार्ड आरनॉल्ट यांचा समावेश होता.

सेंटिबिलेनियर्सच्या यादीमध्ये सध्या १० जणांचा समावेश असून मस्क हे अव्वल स्थानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस, तिसऱ्यावर आरनॉल्ट, चौथ्यावर गेट्स, पाचव्यावर प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचा अव्वल पाचमध्ये समावेस आहे. या यादीत अदानी दहाव्या स्थानी असून त्यांच्या आधी म्हणजेच नवव्या स्थानावर ओरॅकलचे लेरी एलिसन यांचा समावेश असून त्यांची संपत्ती १०३ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच ते अदानींहून ३ मिलियन डॉर्लसने अधिक श्रीमंत आहेत.

अंबानी कितव्या स्थानी?
अदानी यांच्या संपत्तीमध्ये २४ बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरलेत. मागील वर्षभरापासून त्यांची संपत्ती प्रत्येक आठवड्याला सहा हजार कोटींची वाढत आहे. एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये अंबानी हे ११ व्या स्थानी आहेत. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात अव्वल दहामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र सध्या त्यांच्या स्थानामध्ये थोडी घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ९९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या यादीत फेसबुकला मार्क झुकरबर्ग हा १२ व्या स्थानी आहे. अंबानींचा समावेस सेटिंबिलेनियर्सच्या यादीत नाही कारण त्यांची एकूण संपत्ती ही १०० बिलियन किंवा त्याहून अधिक नाहीय.

अदानींची वाटचाल…
अदानी समूहाच्या खाण प्रकल्पाला ऑस्ट्रेलियामध्ये मोठा विरोध झाला. तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गपासून अनेकांनी या खाण प्रकल्पांना विरोध केल्याने अदानी समूहाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली. मात्र अदानींनी केवळ खनिजांवर लक्ष केंद्रीत न करता हरित ऊर्जा क्षेत्रामध्येही काम केलं. त्यांनी विमानतळ, डेटा सेंटर्स, शस्त्रनिर्मीती उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करुन वाटचाल सुरु ठेवली. हीच क्षेत्र देशाचे दिर्घकालीन आर्थिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्वाची असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा व्यक्त केलंय.

मागील दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत ६०० टक्क्यांनी वाढलीय. २०७० मध्ये भारताचं झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत असल्याने भविष्यातही अदानी समूहाला अच्छे दिन येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सेंटिबिलेनियर्स स्टेटस जपणं कठीण
सेटिबिलेनियर्स हे स्टेटस टिकवून ठेवणं फार कठीण मानलं जातं. एवढी संपत्ती असल्यास बाजारामधील छोट्या मोठ्या घडामोडींचा संपत्तीवर थेट परिणाम होतो आणि काही तासांमध्ये अर्श से फर्श पर परिस्थिती निर्माण होऊन व्यक्ती या मानाच्या यादीतून बाहेर फेकली जाऊ शकते. असाच अनुभव जेफ बेझोस यांना नुकताच आलाय. २०२० साली ते २०० बिलियन संपत्ती असणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले होते. आज त्यांची संपत्ती ही १७९ बिलियन इतकी आहे. ते या यादीत दुसऱ्या स्थानी असून मस्क हे २६० बिलियनसहीत पहिल्या स्थानी आहेत.

एकूण श्रीमंत भारतीय किती?
अब्जाधीशांच्या यादीमध्ये एकूण २१५ भारतीय आहेत जे देशात वास्तव्यास आहेत. जगभरातील मूळचे भारतीय असणाऱ्या अब्जाधीशांची संख्या गृहित धरल्यात अब्जाधीश भारतीयांची एकूण संख्या २४९ इतकी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the centibillionaires club which gautam adani became the newest member of scsg

ताज्या बातम्या