युरोपियन फुटबॉलमध्ये गेल्या आठवड्यात युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसच्या (ईसीजे) निर्णयानंतर युरोपियन सुपर लीग व युरोपियन फुटबॉलची प्रशासकीय संस्था असलेल्या ‘युएफा’ यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. नक्की हा संघर्ष काय आहे, याचा युरोपियन फुटबॉलवर काय परिणाम काय होईल, याचा आढावा.
युरोपियन सुपर लीगची नेमकी संकल्पना काय?
एप्रिल २०२१ मध्ये युरोपमधील आघाडीच्या क्लबनी मिळून युरोपियन सुपर लीग तयार केली. यामध्ये स्पेनमधील रेयाल माद्रिद, बार्सिलोनासोबत मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, आर्सेनल, चेल्सी, मँचेस्टर सिटी, टॉटनहॅम अशा सहा मोठ्या प्रीमियर लीग संघांचाही सहभाग होता. यासोबतच इटलीतील युव्हेंटस, इंटर मिलान व एसी मिलानसारखे संघही यामध्ये सहभागी होते, मात्र चाहत्यांकडून विरोध झाल्यानंतर ही कल्पना बारगळली. यानंतर १२ पैकी १० क्लबनी युरोपियन सुपर लीगमधून माघार घेतली. तर, ‘युएफा’ने त्यांच्यावर मोठा दंड आकारण्याचा निर्णय घेतला. मात्र, रेयाल माद्रिद व बार्सिलोना या स्पॅनिश क्लबनी माघार घेतली नाही. चॅम्पियन्स लीगमधूनच या लीगची संकल्पना समोर आली. युरोपमधील आघाडीच्या क्लबची संरचना विकसित करणे हे या लीगचे उद्दिष्ट होते. सध्या चॅम्पियन्स लीगच्या संरचनेनुसार युरोपातील एक क्लब दुसऱ्या क्लबविरुद्ध फक्त साखळी किंवा बाद फेरीत स्पर्धा करू शकतो. एका गटात केवळ चार संघ असतात. त्यांना सहा साखळी सामने खेळण्यास मिळतात. काही गट वगळल्यास युरोपमधील आघाडीच्या क्लबना एका गटात खेळण्यास मिळत नाही.
युरोपियन सुपर लीगची रचना कशी?
या लीगच्या माध्यमातून आघाडीच्या युरोपियन क्लबना स्पर्धा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. या लीगला मान्यता मिळाल्यास संपूर्ण युरोपमधील आघाडीचे संघ चॅम्पियन्स लीगपेक्षाही अधिक सामने एकमेकांविरुद्ध खेळू शकतात. रेयाल माद्रिद व मँचेस्टर युनायटेड यांच्यात गेल्या दशकभरात एकदाच सामना झाला. मात्र, या लीगच्या माध्यमातून हे संघ प्रत्येक हंगामात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. सध्याच्या संरचनेनुसार एकाच देशातील संघ प्रत्येक हंगामात एकमेकांविरुद्ध खेळतात. तसेच, वेगवेगळ्या देशांच्या लीग संरचनेचा भाग असलेले संघ केवळ चॅम्पियन्स लीग किंवा युरोपा लीगमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. नवीन रचनेनुसार यामध्ये बदल झाल्यास अनेक आघाडीच्या क्लबचे स्पर्धात्मक सामने पाहण्याची संधी चाहत्यांना सातत्याने मिळणार आहे.
युरोपियन सुपर लीगची कार्यपद्धती कशी असेल?
युरोपियन सुपर लीगमध्ये ६४ संघांचा समावेश असेल आणि त्यांची विभागणी तीन विभागांत केली जाईल. यामध्ये गोल्ड (आघाडीचा विभाग), सिल्व्हर (द्वितीय विभाग) आणि ब्लू (तिसरा विभाग) असे तीन विभाग असतील. गोल्ड व सिल्व्हर लीगमध्ये प्रत्येकी १६ संघांचा समावेश असणार आहे, तर ब्लू विभागात ३२ संघ (एक गटात आठ संघांचा समावेश) असतील. यासह आणखी एक विभाग असेल तो म्हणजे स्टार. यामध्ये १६ क्लबचा समावेश असेल आणि त्यामध्ये दोन गट असतील.
हेही वाचा… विश्लेषण: वरळी, कुर्ल्यासह मुंबईत लवकरच तीन ‘मिनी-बीकेसी’? काय आहे प्रकल्प?
प्रत्येक गटात आठ संघ सहभागी होतील. सर्व लीगमध्ये प्रत्येक संघाचे १४ सामने होतील ज्यातील सामने घरच्या व सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर पार पडतील. पुरुष व महिलांच्या स्पर्धांमध्ये स्टार आणि गोल्ड लीगमधील प्रत्येक गटातील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच करतील. म्हणजे प्रत्येक स्तरातील आठ संघ बाद फेरीत सहभाग घेतील. पुरुषांच्या ‘ब्लू’ लीगमध्ये आठ संघांचा बाद फेरीचा (नॉकआऊट) टप्पादेखील असेल. त्यामधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.
युरोपियन सुपर लीगमध्ये कोण सहभागी होते?
सध्या केवळ रेयाल माद्रिद व बार्सिलोना हे संघ लीगचा भाग आहे. चाहत्यांच्या टीकेनंतर इतर संघांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रीमियर लीगमधील मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, चेल्सी, लिव्हरपूल, आर्सेनल आणि टॉटेनहॅम हॉटस्पर या सहा संघांचा समावेश होता. तीन स्पॅनिश संघांपैकी एक ॲटलेटिको माद्रिदचा यामध्ये समावेश होता, तर इंटर मिलान, एसी मिलान आणि युव्हेंटस हे तीन इटालियन संघ लीग संरचनेचा भाग होते. प्रीमियर लीग क्लबशिवाय इतर कोणत्याही क्लबनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जर्मनी आणि फ्रान्समधील कोणताही क्लब या योजनेचा भाग नव्हता, परंतु प्रीमियर लीगच्या क्लबनी माघार घेतल्यास ‘सुपर लीग’ त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. युरोपियन सुपर लीगला मान्यता मिळाल्यास युरोपियन फुटबॉलमधील हा निर्णायक टप्पा ठरू शकेल. यासह जागतिक स्तरावर लीग आयोजित करण्याचाही त्यांचा विचार आहे, ज्यामध्ये विविध खंडांमधील संघ एकाच संरचनेत स्पर्धा करताना दिसू शकतात.