देवेश गोंडाणे

गेल्या काही महिन्यांपासून वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ चर्चेत आहे. कुलगुरू प्रा. रजनिशकुमार शुक्ल यांचे एका महिलेला कथित व्हॉट्सॲप संदेश, कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेले आंदोलन, राष्ट्रपतींनी रद्द केलेला विद्यापीठाचा दौरा अशी पार्श्वभूमी या चर्चेस आहे. कुलगुरू शुक्ल यांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी अंतर्गत राजकारणात या विद्यापीठाची बदनामी हाेत आहे का, असा प्रश्न पुढे आला आहे.

आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे महत्त्व काय?

हिंदी केवळ साहित्य आणि चिंतनाची भाषा न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषांप्रमाणे विकसित व्हावी, यासाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. हिंदी भाषा आणि साहित्याची उत्तरोत्तर प्रगतीसह ज्ञानाच्या विविध विषयांमध्ये अध्ययन, शोध आणि प्रशिक्षणाचे समर्थ माध्यम म्हणून हिंदीचा सम्यक विकास हा या विद्यापीठाचा मुख्य हेतू आहे. देशी आणि विदेशी भाषांसह हिंदीचे तुलनात्मक अध्ययन आणि आधुनिक आणि अद्ययावत ज्ञान-सामग्रीचे हिंदीत भाषांतर व विकास करणे हेही या विद्यापीठाच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. वर्धेशिवाय कोलकाता आणि अलाहाबाद येथेही विद्यापीठाची प्रादेशिक केंद्रे आहेत.

वादाची पार्श्वभूमी काय?

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा ६ जुलैला दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार हाेती. मात्र, त्यांनी अचानक दौरा रद्द केला. त्यानंतर एका महिलेने विद्यापीठातील एका प्रमुख अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याची बाब समोर आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी या महिलेला पाठवलेले आक्षेपार्ह संदेश समाजमाध्यमांवर पसरले. संबंधित महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तिची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा मलीन होत असल्याने कुलगुरूंनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काही सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. यावरून विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांमधील वाद वाढत चालला आहे.

वादाचे स्वरूप काय?

कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी या प्रकारणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कुलगुरू शुक्ल यांनी डास मारण्याचे औषध प्राशन केल्याचे आणि त्यासाठी त्यांनी नजीकच्या एका रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली. कुलगुरूंनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने, कुलगुरू शुक्ल उपचारासाठी आल्याची कबुली दिल्याने विद्यार्थी संघटना अधिकच आक्रमक झाल्या. विद्यापीठ परिसरात कुलगुरूंच्या वाहनाला घेराव घालण्याच्या प्रकाराने तणावही निर्माण झाला होता.

वादाचे परिणाम काय?

विद्यापीठाची प्रतीमा मलीन होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विद्यापीठातील शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. धर्वेश कथेरिया यांनी केली होती. सत्यता पडताळणी करण्यासाठी त्यांनी वर्धा येथील रामनगर सायबर ठाण्यात तक्रार दिली. मात्र, ही मागणी लावून धरणाऱ्या डॉ. कथेरिया यांनाच ८ ऑगस्टला निलंबित करण्यात आले. कुलसचिव कादर नवाज यांनी तसे पत्र काढले. विद्यापीठ प्रशासनाची परवानगी न घेता त्यांनी तक्रार केल्याचा आरोप निलंबन पत्रात करण्यात आला. याचे तीव्र पडसाद उमटले. डॉ. कथेरिया यांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी विद्यार्थी संघटना आंदोलन करीत आहेत.

सुडाचे राजकारण होत आहे का?

हिंदी विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असताना कुलगुरूंच्या समर्थनार्थही विद्यार्थ्यांच्या एका गटाने घोषणाबाजी केली, तर दुसरा एक गट कुलगुरूंच्या विरोधात आहे. विद्यापीठामध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या पदभरतीतही कुलगुरू शुक्ल यांनी आपल्या मर्जीतील लोकांना संधी दिल्याचा आरोप होता. त्यामुळे काही संघटना सुडाच्या भावनेने कुलगुरूंना विरोध करीत आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

कुलगुरूंवरील आरोपात तथ्य आहे का?

विद्यापीठात कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी नुकतीच पत्रपरिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी कथित संदेशाचे आरोप करणारी महिला ही त्यांना पैशांंसाठी फसवत असल्याचा दावा केला. तिने आपल्याकडे नोकरी आणि पैशांची मागणी केली. मात्र, ती मान्य न केल्यानेच तिने खोटे आरोप करून फसवल्याचे प्रा. शुक्ल यांचे म्हणणे आहे. तसेच सामाजमाध्यमांवर खोटी माहिती पसरवून कुलगुरूपदाची आणि विद्यापीठाची बदनामी केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.