अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक जगाला हादरवणारे निर्णय घेत आहेत. त्यांच्या आयात शुल्कवाढीच्या निर्णयाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. आता नुकताच त्यांनी आपल्या सोशल मीडिया साईटवर एक एआय जनरेटेड व्हिडीओ शेअर केला होता, ज्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ नंतर डिलीट करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेला व्हिडीओ ‘मेडबेड’ नावाच्या एका कथित भविष्यकालीन तंत्रज्ञानाबद्दलचा होता. ‘मेडबेड’ म्हणजे एक असे तंत्रज्ञान, जे प्रत्येक आजारावर उपचार करू शकते, असा दावा केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत नक्की काय होते? ‘मेडबेड’ म्हणजे नक्की काय? त्यावरून वाद का निर्माण झाला आहे? त्याविषयी जाणून घेऊया…
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत नक्की काय होते?
शनिवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्रुथ सोशल (Truth Social) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या एआय व्हिडीओमध्ये ते अमेरिकन नागरिकांना लवकरच मेडबेड कार्ड मिळेल, असे आश्वासन देताना दिसत होते. हा व्हिडीओ एखाद्या बातमीच्या प्रसारणासारखा होता. रविवार सकाळपर्यंत हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला होता. पोस्ट डिलीट केली असली तरी ऑनलाइन याबद्दल बरीच चर्चा झाली आणि ‘मेडबेड’ नेमके काय आहेत आणि हा इतका चर्चेचा विषय का ठरत आहे, याबद्दलचे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले.

या एआय व्हिडीओमध्ये त्यांची सून लारा ट्रम्प सूत्रसंचालन करीत असल्याचे दर्शवले होते. एआय-जनरेटेड असलेल्या त्या सेग्मेंटमध्ये लारा असे जाहीर करताना दिसल्या, “ब्रेकिंग. आता, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी एका ऐतिहासिक नवीन आरोग्य सेवा प्रणालीची घोषणा केली आहे. अमेरिकेतील पहिल्या ‘मेडबेड’ रुग्णालयांचे उदघाटन आणि प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय ‘मेडबेड’ कार्ड देण्यात येणार आहे.” त्यानंतर व्हिडीओमध्ये ट्रम्प यांची स्वतःची एक बनावट प्रतिमा दिसली.
“प्रत्येक अमेरिकन नागरिकाला लवकरच त्याचे स्वतःचे मेडबेड कार्ड मिळेल. त्या कार्डामुळे तुम्हाला देशातील सर्वोत्तम डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील आमच्या नवीन रुग्णालयांमध्ये प्रवेशाची हमी मिळेल. जगातील सर्वांत प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या सुविधा सुरक्षित, आधुनिक आहेत. अमेरिकन आरोग्य सेवेतील एका नवीन युगाची ही सुरुवात आहे,” असे त्या म्हणताना दिसल्या. त्यात लारा ट्रम्प असेही बोलताना दाखवण्यात आले की, ‘मेडबेड कार्ड्स’ची केवळ मर्यादित संख्या पहिल्या टप्प्यात जारी केली जाईल. ‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडीओमध्ये अनेक त्रुटी होत्या. व्हिडीओचे कमी रिझोल्यूशन, ट्रम्प यांचा आवाज आदी त्रुटींमुळे हा व्हिडीओ डिलीट करण्यात आल्याचा अंदाज आहे.
‘मेडबेड’ काय आहे?
मेडबेड क्यूअनॉन चळवळीचा एक भाग आहे. मेडबेड ही एक काल्पनिक वैद्यकीय उपकरण प्रणाली आहे, ज्यामुळे दम्यापासून कर्करोगापर्यंत सर्व काही बरे करण्याचा दावा केला जातो. क्यूअनॉन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विचारसरणीच्या समुदायांचा एक गट आहे. त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनुसार, ही उपकरणे जीवघेणे रोग बरे करू शकतात, तारुण्य परत आणू शकतात. काहींच्या मते, ही उपकरणे आयन, टेराहर्ट्झ प्रकाशलहरी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम ऊर्जा यांसारख्या भविष्यकालीन पद्धतींद्वारे काम करतात; तर काही जण हे मशीन परग्रहींद्वारे (Alien) तयार करण्यात आल्याचा दावा करतात.
क्यूॲनॉन समर्थकांचा असा दावा आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर ‘मेडबेड’च्या मदतीने त्यांना अनेक वर्षे जिवंत ठेवण्यात आले होते. अमेरिकेत मेडबेड-आधारित रुग्णालय बांधण्याची योजना बऱ्याच काळापासून सुरू आहे. अनेकांचे असे सांगणे आहे की, ‘बिग फार्मा’ त्यांचा आधीच वापर करत आहेत; परंतु नफा टिकवून ठेवण्यासाठी ते लोकांपासून याला लपवून ठेवत आहेत. २०२३ च्या रोलिंग स्टोन अहवालानुसार, काही कंपन्या या लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत. काही कंपन्या महागडी ‘मेडबेड कार्ड्स’ किंवा सदस्यत्व विकत आहेत; तर काही जण महागडी उपकरणे विकत आहेत. उदाहरणार्थ- IonicCare चा दावा आहे की, त्यांचे उत्पादन चार मिनिटांत तणाव कमी करू शकते आणि आरोग्य सुधारू शकते.
तसेच टेस्ला बायोहीलिंग सुमारे ९.१७ लाखांपर्यंतची मशीन विकत आहे. परंतु २०२३ मध्ये यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने या कंपनीला त्यांच्या उपकरणांच्या वैद्यकीय दाव्यांची सिद्धता देण्यात अपयशी ठरल्याबद्दल इशारा दिला आहे. तेव्हापासून टेस्ला बायोहीलिंगने त्यांच्या वेबसाइटवर बदल केले आहेत, ज्यात हे मशीन रोग बरे करण्यासाठी नाही, तर काही काळ आरामासाठी आहे, असे स्पष्ट केले आहे.
‘मेडबेड’ सिद्धांत आला कुठून?
‘मेडबेड’ सिद्धांत काही वर्षांपूर्वी उजव्या विचारसरणीच्या समुदायांमध्ये उदयास आला. क्यूअॅनॉन फोरम्समध्ये त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर फेसबुक ग्रुप्सनेदेखील हे दावे पसरवण्यात मोठी भूमिका बजावली. मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या ऑफिस फॉर सायन्स अँड सोसायटीने अहवाल दिला की, अनेक ग्रुप्स ‘मेडबेड’पर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांकडून शेकडो डॉलर्स आकारत आहेत. एका सिद्धांतानुसार तर, १९९९ मध्ये निधन झालेले जॉन एफ. केनेडी ज्युनियर या गुप्त मशीनमुळे जिवंत आहेत. या चर्चेमुळे यापूर्वी गदारोळ निर्माण झाला होता.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘मेडबेड’ला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. एका विश्लेषकाने बीबीसीला म्हटले आहे, “अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची व्याख्या करणे खरोखरच कठीण आहे.” या एआय व्हिडीओवरून डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल करण्यात आले आहे. एक वापरकर्ता म्हणाला, “जर ‘मेडबेड’ खरी असती, तर ती आतापर्यंतची सर्वांत मोठी वैद्यकीय व्यवस्था ठरली असती.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही फक्त फॉक्स न्यूज चॅनलचा प्रचार करीत आहात.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ट्रम्पने हा व्हिडीओ कोणत्या कारणाने डिलीट केला? आधी हे स्पष्ट करावे.”