पृथ्वीभोवती केवळ एकच चंद्र फिरत असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र शास्त्रज्ञांनी आता एक धक्कादायक खुलासा केला आहे की, पृथ्वीच्या कक्षेत आणखी एक चंद्र असून हा छुपा चंद्र गेल्या ६० वर्षांपासून स्थिर कक्षेत फिरत आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘अर्जुन २०२५ पीएन७’ असे नाव दिले आहे. या अर्ध-चंद्राचा कक्षीय कालावधी पृथ्वीसारखाच असतो, तो सूर्याभोवती सुमारे एक वर्ष प्रदक्षिणा घालतो, परंतु त्याचा मार्ग थोडा वेगळा असतो.
शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नव्या चंद्राविषयी…
शास्त्रज्ञांनी ‘अर्जुन २०२५ पीएन७’ नावाचा एक नवीन अर्ध-चंद्र (क्वासी मून) शोधला आहे, जो सुमारे ६० वर्षांपासून पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनीही यास पुष्टी केली आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेतच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो, ज्यामुळे तो पृथ्वीच्या जवळ असल्याचे दिसून येते. पण तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने बांधलेला नाही. हे खगोलीय पिंड चंद्राप्रमाणेच फिरत असल्यामुळे याला ‘क्वासी-मून’ असे म्हटले जाते. ‘मीट अर्जुन २०२५ पीएन७’ या नवीन संशोधन पत्रानुसार, हा अंतराळ खडक १९६० पासून पृथ्वीभोवती एका जटिल कक्षेत फिरत आहे आणि २०८३ पर्यंत तो असाच फिरत राहण्याची शक्यता आहे.
नव्या चंद्राची वैशिष्ट्ये काय?
‘अर्जुन २०२५ पीएन७’ हा आकाराने खूपच लहान आहे. अंदाजानुसार त्याचा आकार १८-३६ मीटर (एका सामान्य इमारतीच्या उंचीइतका) इतका आहे. एक वर्षापूर्वी, शास्त्रज्ञांनी जाहीर केले की, ‘२०२४ पीटी५’ हा लहान लघुग्रह पृथ्वीभोवती कक्षेत फिरत आहे. आता तो लघुचंद्रात रूपांतरित झाला आहे. वास्तविक चंद्राप्रमाणे हा नवा चंद्र थेट पृथ्वीभोवती फिरत नाही, त्याऐवजी तो पृथ्वीसारख्या मार्गाने सूर्याभोवती फिरतो. हवाईतील पॅनस-स्टार्स १ या दुर्बिणीद्वारे २ ऑगस्ट २०२५ रोजी या नव्या चंद्राचा शोध लागला. या अर्ध-चंद्रांचा कक्षीय कालावधी पृथ्वीसारखाच असतो, ते सूर्याभोवती सुमारे एक वर्ष प्रदक्षिणा घालतात; परंतु थोड्या वेगळ्या मार्गांमुळे ते कालांतराने जवळ येतात आणि दूर जातात. शास्त्रज्ञांच्या मते ‘अर्जुन २०२५ पीएन७’ हा पृथ्वीच्या सहकक्षेत सुमारे २०८३ पर्यंत राहील. म्हणजेच आपल्या ग्रहाशी त्याचा सहवास काही दशकांचाच आहे. त्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे तो सध्या मार्गापासून दूर जाईल.
अर्ध-चंद्र म्हणजे काय?
अर्ध-चंद्र म्हणजेच क्वासी-मून हा एक प्रकारचा लघुग्रह आहे, जो पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे. हा ग्रह पृथ्वीच्या चंद्रासारखा दिसतो, परंतु तो प्रत्यक्षात सूर्याच्या कक्षेत असतो. हे लघुग्रह कायमच पृथ्वीभोवती राहणार नाहीत, तर त्यांचा विशिष्ट कालावधी असतो. कालांतराने ते निघून जातात. नवा अर्ध-चंद्र २०८३ पर्यंत पृथ्वीबरोबर राहील, असा शास्त्रज्ञांना अंदाज आहे. पृथ्वीला आधीच सात ज्ञात अर्ध-चंद्र आहेत. कामो’ओलेवा (२०१६ एचओ३), कार्डिया (२००४ जीयू९) आणि २०२३ एफडब्ल्यू१३ हे पृथ्वीचे काही लघुचंद्र आहेत. नव्याने सापडलेला ‘अर्जुन २०२५ पीएन७’ हा सर्वात लहान आणि कमी स्थिर असलेला अर्ध-चंद्र आहे.
नवा चंद्र साथीदार की धोकादायक?
आता पृथ्वीला दोन चंद्र आहेत, याचा अर्थ आपल्या चंद्राला नवा साथीदार मिळाला आहे. मात्र या नव्या अर्ध-चंद्रामुळे सध्याच्या चंद्राला किंवा पृथ्वीला धोका आहे का, अशी भीती काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. मात्र नव्या चंद्राचा पृथ्वीला कोणताही धोका नाही, असे काही खगोलतज्ज्ञांनी सांगितले. नव्या चंद्राचा आकार लहान आहे आणि त्याची कक्षा स्थिर आहे. नवा चंद्र खरोखर वैज्ञानिकदृष्ट्या हिताचा आहे. ‘अर्जुन २०२५ पीएन७’ हा दुर्मीळ वर्गातील वस्तूंपैकी एक आहे. असे खगोलीय पदार्थ ग्रहाच्या कक्षेत असतात, परंतु गुरुत्वाकर्षणाने त्याच्याशी बांधलेले नसतात. ते पृथ्वीपासून तुलनेने जवळ असल्याने कक्षीय गतिमानता, पृथ्वीजवळील लघुग्रह, सौर मंडळातील लहान ग्रहांची स्थिती याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असतात.
सौरमालेत सर्वाधिक चंद्र कोणत्या ग्रहाचे?
सौरमालेत आतापर्यंत सर्वाधिक चंद्र शनीचे आहेत. शनीभोवती १४६ नैसर्गिक उपग्रह फिरत आहेत. २०२५ च्या सुरुवातीला खगोलशास्त्रज्ञांनी १२८ नवीन लघुचंद्र शोधले, ज्यामुळे त्यांची एकूण संख्या २७४ झाली आहे. गुरूचे ९५ पुष्टीकृत चंद्र आहेत. शनीच्या नवीनतम शोधांपूर्वी गुरू चंद्रांच्या बाबतीत आघाडीवर होता. मात्र आता निश्चितपणे शनीचे सर्वाधिक चंद्र आहेत. युरेनेसला २८, तर नेपच्यूनला १६ ज्ञात चंद्र आहेत. जर क्वासी मूनचा विचार केला तर गुरूच्या कक्षेत सर्वाधिक क्वासी मून असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ६००च्या आसपास अर्ध-चंद्र गुरूच्या कक्षेत आहेत, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
