निमा पाटील
उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची बहुचर्चित बैठक बुधवारी व्होस्तोकनी कॉस्मोड्रोम या रशियाच्या अगदी पूर्वेकडील शहरामध्ये झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चार ते पाच तास चर्चा झाली. या भेटीनंतर किम हे कोम्सोमोल्स्क-ऑन-आमुर आणि व्लादिवोस्तोक या दोन शहरांना भेट देणार असल्याचे पुतिन यांनी जाहीर केले. त्यानंतर ते मायदेशी परततील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात किम यांनी आपला रशिया दौरा आणखी काही दिवसांनी वाढवल्याचे वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय पटलावर इतरांपासून वेगळे पडलेल्या या दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटीचे महत्त्व काय आणि त्याचे परिणाम काय होतील हे पाहूया.
किम आणि पुतिन भेटीबद्दल अभ्यासकांचे काय मत आहे?
उत्तर कोरिया आणि रशिया हे दोन्ही देश सध्याच्या आंतरराष्ट्रीय पटलावर इतरांपासून दुरावल्याचे चित्र आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशियाला आपले सैन्य सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. मात्र ते वापरण्यासाठी आवश्यक असलेला पूरक दारूगोळा संपत आला आहे. त्यामुळे हा दारूगोळा मिळवण्यासाठी रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यादरम्यान लष्करी करार होण्याची शक्यता आहे असे अभ्यासकांना वाटते.
उत्तर कोरिया आणि रशियात काय साम्य आहे?
शेजारी देशाविरोधात आक्रमक भूमिका आणि अमेरिकेबरोबर शत्रुत्व मानले जाईल इतके ताणलेले संबंध हे दोघांमधील काही समान घटक आहेत. त्याबरोबरच एक महत्त्वाचा घटक म्हणजे दोन्ही देशांबरोबर चीनचे संबंध चांगले आहेत. अमेरिकेला शह देण्यासाठी चीनने स्वतःच्या प्रभावाचा जो विस्तार केला आहे, त्यामध्ये उत्तर कोरिया आणि रशिया या दोन्ही देशांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्याशिवाय दोन्ही देशांवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. युक्रेन युद्धामुळे रशियावर तर आक्रमक आण्विक धोरणामुळे उत्तर कोरियावर निर्बंध आहेत.ॉ
आणखी वाचा-आशियाई स्पर्धेसाठी भारतावर दुसऱ्या फळीचा फुटबॉल संघ खेळविण्याची नामुष्की का आली?
किम आणि पुतिन यांची भेट कुठे झाली?
किम जोंग उन यांनी व्लादिमिर पुतिन यांना भेटण्यासाठी तब्बल दोन दिवस त्यांच्या वैयक्तिक रेल्वेने प्रवास केला. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील व्होस्तोकनी कॉस्मोड्रोम या शहरामध्ये दोन्ही नेते भेटले. या शहरामध्ये रशियाचे सर्वात महत्त्वाचा उपग्रह प्रक्षेपण तळ आहे. किम जोंग उन यांनी पुतिन यांच्यासह या प्रक्षेपण तळाची पाहणी केली. यावेळी पुतिन यांनी किम यांचे आपुलकीने स्वागत केले असे निरीक्षण माध्यमांनी नोंदवले.
पाहणीनंतर दोन्ही नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
पाहणीनंतर पुतिन यांनी भूतकाळात सोव्हिएत रशियाने उत्तर कोरियाला मदत केल्याची आठवण करून दिली. तर, किम यांनी युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा व्यक्त केला. रशिया आपले सार्वभौमत्वाचे अधिकार, सुरक्षा आणि हितसंबंध यांचे संरक्षण करण्यासाठी वर्चस्ववादी शक्तींविरोधात हे युद्ध लढत असल्याचे ते म्हणाले.
भेटीसाठी व्होस्तोकनी कॉस्मोड्रोम शहर का निवडले?
उत्तर कोरिया काही काळापासून लष्करी हेरगिरी उपग्रह अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आतापर्यंत त्यांना त्यामध्ये यश आलेले नाही. त्यामुळे उत्तर कोरिया लष्करी सहाय्य करण्याच्या बदल्यात रशियाकडून हेरगिरी उपग्रह विकसित करण्याचे तंत्रज्ञान मिळवेल असा अंदाज आहे. किम यांच्या दृष्टीने अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा धोका वाढवण्यासाठी हे उपग्रह महत्त्वाचे आहेत. रशियानेही उत्तर कोरियाला उपग्रह तंत्रज्ञान देण्याचे मान्य केले आहे.
आणखी वाचा-केरळमध्ये निपाचा वाढता प्रादुर्भाव? धोका किती गंभीर?
उत्तर कोरिया रशियाला लष्करी मदत करू शकतो का?
पूर्वी सोव्हिएत रशियाने केलेल्या मदतीमुळे उत्तर कोरियाकडे आजही सोव्हिएत रशियन बनावटीचे कोट्यवधी तोफांचे गोळे आणि प्रक्षेपक असावेत असा अंदाज आहे. दोन्ही देशांदरम्यान अद्याप लष्करी कराराची घोषणा झालेली नाही. मात्र तो नक्की होईल असे विश्लेषकांना वाटत आहे. पुतिन यांनी बुधवारी द्विपक्षीय चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना यासंबंधी बरेच संकेत दिले असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर, दोन्ही देशांदरम्यान संवेदनशील विषयांवरील चर्चा सार्वजनिक करता येणार नाही असे रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांनी सांगितले.
दोन्ही देशांच्या संबंधांचा इतिहास काय आहे?
उत्तर कोरियाने १९५०-५३ दरम्यान दक्षिण भागावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी सोव्हिएत रशियाने त्यांना शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने आणि प्रशिक्षित वैमानिकांचा पुरवठा केला होता. त्यावेळी दोन्ही देश साम्यवादी होते. या आक्रमणानंतर अनेक दशके उत्तर कोरिया सोव्हिएत रशियाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून होता. मात्र, तसे ते कायम राहिले नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर आक्रमक अणुकार्यक्रमामुळे लादलेल्या निर्बंधांना रशियानेही पाठिंबा दिला होता. मात्र, बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत दोन्ही देश जवळ येत आहेत.
आणखी वाचा-फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी, नेमके कारण काय? जाणून घ्या….
भारताचे दोन्ही देशांशी संबंध कसे आहेत?
रशियाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिल्यापासून दोन्ही देश मित्र आहेत. स्वातंत्र्योत्तर भारताच्या औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी रशियाने बरीच मदत केली. अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ झाले तरी रशिया हा भारताचा मित्र देश आहे. दुसरीकडे, उत्तर कोरियाशी भारताचे संबंध तटस्थ आहेत. दक्षिण कोरियाची सार्वभौमत्वाची भूमिका आणि तेथील लोकशाहीचे संरक्षण याला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे.
nima.patil@expressindia.com