China Destroy 300 Dams जगातील सर्वात मोठे आणि उंच धरण बांधत असल्याने चीनची सतत चर्चा होत आहे. या धरणाच्या वजनाने पृथ्वीच्या वेगावर परिणाम होईल, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. मात्र, चीनच्या एका निर्णयाची पुन्हा एकदा सर्वत्र चर्चा होत आहे. चीनने आपल्या सर्वात लांब नदीवरील तब्बल ३०० धरणे पाडली आहेत. एका पर्यावर्णीय उपक्रमात चीनने ही धरणे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने चिशुई नदीवरील ३५७ पैकी ३०० धरणे पाडली आहेत आणि ३७३ पैकी ३४२ लहान जलविद्युत केंद्रे बंद केली आहेत. या नदीला चीनमध्ये रेड रिव्हर म्हणूनही ओळखले जाते. परंतु, चीनने इतकी धरणे एकत्र पाडण्याचा निर्णय का घेतला?
३०० धरणे पाडण्याचा निर्णय
- चिशुई नदी यांगत्से नदीची प्रमुख उपनदी आहे. रेड रिव्हर म्हणून ओळखली जाणारी ही नदी ४०० किलोमीटरपेक्षा जास्त भागात पसरलेली आहे.
- ही नदी नैऋत्य चीनमधील युनान, गुइझोऊ आणि सिचुआन प्रांतांमधून वाहते. धरणे पाडण्याचा निर्णय हा २०२० मध्ये सुरू झालेल्या पुनर्संचयित मोहिमेचा भाग असल्याचे वृत्त ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिले आहे.
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, माशांचे स्थलांतर मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी, नदीचा प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी आणि माशांचे प्रजनन चक्र पुन्हा व्यवस्थापित करण्यासाठी ही पावले आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

यांग्त्झी नदी आशियातील सर्वात लांब नदी आहे आणि ही नदी चीनची अन्न सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु, गेल्या काही दशकांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे विशेषतः धरण बांधणी आणि जलविद्युत केंद्रांमुळे जलचर जीवनावर परिणाम झाला आहे. एकेकाळी यांग्त्झी नदीच्या काही भागात दुर्मीळ आणि स्थानिक माशांच्या प्रजाती आढळत होत्या, हे त्या माशांचे प्रमुख केंद्र मानले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांमुळे नदीतील या दुर्मीळ माशांच्या प्रजातींवर परिणाम झाला आहे.
धरणे आणि वीज केंद्रांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. खालच्या प्रवाहात पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि नदीचे काही भाग कोरडे पडले आहेत. धरणांच्या जाळ्यामुळे प्रजनन आणि माशांचे स्थलांतर मार्गदेखील तुटले आहेत आणि त्यामुळे स्थानिक माशांचे जीवनचक्र विस्कळीत झाले आहेत. जैवविविधतेचे नुकसान आणि प्रमुख जलचर प्रजाती जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने चीन सरकारने ही धरणे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
यांग्त्झे स्टर्जन नामशेष
चिनी पॅडलफिशसह यांग्त्झे स्टर्जन ही प्रजाती नामशेष झाल्याचे २०२२ मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN)ने घोषित केले आहे. त्यातून जैवविविधतेचा किती नाश होतो हे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने धरण बांधणी, जास्त मासेमारी आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची संख्या पूर्णपणे कमी झाली. २००० पासून यांग्त्झेमध्ये नैसर्गिकरित्या प्रजनन केलेली कोणतीही स्टर्जन आढळली नाही. परंतु, रेड रिव्हरच्या पुनर्संचयन प्रकल्पामुळे एक दुर्मीळ घटना घडली आहे. ‘एससीएमपी’च्या मते, चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोबायोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी २०२३ आणि २०२४ मध्ये काही यांग्त्झे स्टर्जन नदीत सोडल्या आणि या माशांनी नैसर्गिक वातावरणाशी यशस्वीरित्या जुळवून घेतले.
त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये संशोधकांनी प्रजनन व्यवहार्यतेची चाचणी घेण्यासाठी गुइझोउ प्रांतातील रेड रिव्हरच्या एका भागात २० स्टर्जन सोडल्या, त्यांनीही या वातावरणाशी जुळवून घेतले. सिंघुआ विद्यापीठातील हायड्रॉलिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक झोउ जियानजुन यांच्या मते, धरण बंद करणे म्हणजे संरचना पाडणे असे नाही. यामागचा उद्देश मुख्य म्हणजे वीज निर्मिती थांबवणे आणि पर्यावरणीय गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी नियंत्रणाची पद्धत बदलणे आहे.
रेड रिव्हरची जैवविविधता
इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोबायोलॉजीच्या देखरेखीच्या आकडेवारीवरून रेड रिव्हरच्या विविध विभागांमध्ये माशांच्या प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यांग्त्झे स्टर्जनसारखी इतर दुर्मीळ प्रजाती, उभयचर प्राण्यांचीदेखील संख्या वाढताना दिसत आहे. जलविद्युत केंद्रे नष्ट केल्याने नैसर्गिक पाण्याची पातळी पुन्हा स्थापित होण्यास मदत झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये जारी केलेल्या एका सरकारी अहवालात सांगण्यात आले आहे की, पर्यावरणीय धोरणे लागू झाल्यापासून यांग्त्झे खोऱ्यातील जैवविविधतेत सुधारणा झाली आहे. अधिकाऱ्यांनी वाळू उत्खननासारख्या हानिकारक गोष्टीत घट नोंदवली आणि त्यामुळे जलचरांच्या अंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेड रिव्हरसह यांग्त्झे आणि त्याच्या उपनद्यांच्या अनेक भागांमधील पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे.
याचे महत्त्व काय?
रेड रिव्हरची गुणवत्ता सुधारणे हे चीनमधील मोठ्या पर्यावरणीय धोरणातील बदलाचा एक भाग आहे. या धोरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे २०२० मध्ये लादण्यात आलेली १० वर्षांची मासेमारी बंदी. या बंदीनंतर मुख्य खोड आणि प्रमुख उपनद्यांमध्ये व्यावसायिक मासेमारी प्रतिबंधित आहे. जलविद्युत केंद्रांसाठी नियम निर्धारित करण्याचा निर्णयदेखील महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, सिचुआन प्रांतात अधिकाऱ्यांनी २०२१ च्या अखेरीस ५,१३१ लहान जलविद्युत केंद्रांमध्ये सुधारणा केली होती, त्यापैकी १,२२३ बंद केली होती, असे स्थानिक अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारने प्रजनन आणि खाद्य अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी नदीच्या असुरक्षित भागात वाळू उत्खनन बंदी लागू केली आहे.
चीनच्या जलविद्युत योजनांचा अर्थ काय?
चीन हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत उत्पादक देश आहे. परंतु, अनेक प्रकल्प पुरेसे पर्यावरणीय देखरेखीशिवाय बांधले गेले आहेत. रेड रिव्हरवरील ही केंद्रे पाडण्याचे पाऊल एका धोरणात्मक बदलाचे संकेत आहेत. त्यातून हे स्पष्ट दिसून येते की, आता अल्पकालीन ऊर्जेच्या गरजांपेक्षा पर्यावरणीय शाश्वततेला अधिक महत्त्व दिले जात आहे, विशेषतः पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशांमध्ये.