गणेशमूर्तींचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण मधून यंदा ३५ ते ४० लाख गणेशमूर्ती देशाविदेशात पाठवल्या गेल्या. परदेशातूनही मागणीत मोठी वाढ झाली. प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी गणेशमूर्तींवर यंदा बंदीचे सावट होते. मात्र सर्व अडचणींवर मात करत या मूर्ती देशभरात विक्रीसाठी रवाना झाल्या. या वर्षीच्या उलाढालीचा थोडक्यात आढावा…
पेणमधून यंदा किती गणेशमूर्तींची निर्मिती?
साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी पेणमध्ये गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली. कै. वामनराव देवधर आणि कै. राजाभाऊ देवधर यांनी या व्यवसायाला चालना दिली. सुरवातीला मुंबईत या गणेशमूर्ती विक्रीसाठी जाऊ लागल्या. आकर्षक रंगसंगती आणि सुबक गणेशमूर्तींमुळे पेणच्या गणेशमूर्तींचे प्रस्थ वाढत गेले. आधी राज्यातील विविध भागांत आणि नंतर देशभरात येथील गणेशमूर्ती जाऊ लागल्या. आता तर विदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तींना मागणी होऊ लागली आहे. पेण शहर आणि हमरापूर जोहे परिसरात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या साडेपाचशे कार्यशाळा आहेत, ज्यांमध्ये वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. दरवर्षी साधारणपणे ३५ लाख गणेशमूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात. या वर्षी मात्र एक लाख गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत.
निर्मिती घटण्यामागची कारणे?
दरवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींचे निर्मितीचे प्रमाण घटले आहे. पीओपी गणेश मूर्तीवरील बंदीचे संकट यास कारणीभूत ठरले आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार २०१० साली पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यानंतर २०२० साली सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे पीओपी गणेशमूर्तींवर बंदीचे सावट निर्माण झाले. वर्षभर पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत संभ्रम कायम होता. अडीच महिन्यांपूर्वी निर्बंधांचे सावट दूर झाले. पण या सर्व घडामोडींचा परिणाम गणेशमूर्तींच्या उत्पादनावर झाला.
किमतींमध्ये ३० टक्क्यांनी वाढ?
पीओपीच्या गणेशमूर्तींवरील बंदी ९ जूनला उठवण्यात आली. त्यामुळे पेणमध्ये गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला पुन्हा वेग आला. मात्र दोनच महिने मिळाल्याने दरवर्षीच्या तुलनेत कमी गणेशमूर्तींची निर्मिती झाली. बंदी उठल्यानंतर पीओपीच्या गणेशमूर्तींना असलेली मागणी अचानक वाढली. मात्र त्या तुलनेत गणेशमूर्ती तयार होऊ शकल्या नाहीत. मागणीच्या तुलनेत बाजारात कमी मूर्ती असल्याने, गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ झाली. दरवर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत साधारणपणे दहा ते बारा टक्क्यांची वाढ होत असते, मात्र यावर्षी मूर्ती कमी असल्याने त्यात आणखी पंधरा टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे यावर्षी किमतीत जवळपास तीस टक्क्यांची वाढ झाल्याचे मूर्तिकार सांगतात.
शाडू की पीओपी?
पूर्वी पेणमध्ये फक्त शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवल्या जात असत, मात्र मागणी वाढत गेल्याने पीओपीच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा कल वाढत गेला. ८० टक्के गणेशमूर्ती या पीओपीच्या बनवल्या जाऊ लागल्या. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी लागणारा वेळ, त्यांचा नाजूकपणा, त्यातून वाहतुकीत असलेली जोखीम या घटकांमुळे पीओपीच्या गणेशमूर्तींची संख्या वाढत गेली. पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या असल्याने आणि त्यांची सुबकता अधिक असल्यानेही त्यांची संख्या वाढत गेली. पीओपी गणेशमूर्तींबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे गणेशमूर्तिकार पुन्हा एकदा शाडूच्या मातीपासून गणेशमूर्तींकडे वळले. पेण शहरातील बहुतांश कार्यशाळांमधून शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती पुन्हा सुरू झाली. पर्यावरणविषयक जागृतीमुळे महानगरामधून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. मात्र तरीही पीओपी गणेशमूर्तींची बाजारपेठ मातीच्या गणेशमूर्तींच्या तुलनेत मोठी आहे.
यंदा किती गणेशमूर्तींची निर्यात?
जगभरातून पेणच्या गणेशमूर्तींना असलेली मागणी वाढत चालली आहे. ज्या देशात भारतीय स्थायिक होतात, तेथून ते पेणच्या गणेशमूर्ती मागवत असतात. पूर्वी मोजक्या देशांमधून पेणच्या गणेशमूर्तींना मागणी होती. मात्र अलीकडच्या काळात जगभरातील विविध भागांमधून गणेशमूर्ती मागवल्या जाऊ लागल्या. यावर्षी जवळपास ४५ हजार गणेशमूर्ती पेणमधून परदेशात पाठवण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींची निर्यात दुपटीने वाढली आहे. अमेरिका, थायलँड आणि कॅनडातून मागणी वाढल्याने, निर्यातीचे प्रमाण वाढले. यावर्षी इंग्लड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरिशियस, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, कॅनडा आणि थायलँड येथे दहा इंचांपासून ते सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या.
उलाढाल किती?
केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तीव्यवसायाची व्याप्ती वाढली. जगभरात पेणच्या गणेशमूर्तींचे ब्रँण्डीग होण्यास मदत झाली. आज पेण आणि आसपासच्या परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या साडेपाचशेहून अधिक कार्यशाळा आहेत. दरवर्षी साधारणपणे ३५ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात, ज्यातून शंभर कोटींच्या आसपास उलाढाल होत असते. २५ हजार लोकांना यातून रोजगार संधी उपलब्ध होते. आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे.
harshad.kashalkar@expressindia.com