संदीप कदम
युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही उद्योन्मुख खेळाडूंसाठीचे व्यासपीठ समजले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघाला मिळाले. मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ व यश धुल यांच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. यावेळी भारतीय संघ चांगला असून अंतिम सामन्यातही त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. यावेळच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत, अनेक खेळाडूंनी विजयात निर्णायक भूमिका पार पाडली. त्यांतील काही प्रमुख खेळाडूंचा आढावा.
उदय सहारन (फलंदाज)
सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत उदय सहारनकडे भारताचे नेतृत्व असून आपल्या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ६४.८३च्या सरासरीने ३८९ धावा केल्या आहेत. सहारनने बांगलादेशविरुद्ध ६४, आयर्लंडविरुद्ध ७५, नेपाळविरुद्ध १०० व निर्णायक उपांत्य सामन्यात ८१ धावांची खेळी केली आहे. त्याच्या या सर्व खेळी निर्णायक क्षणी आल्याने महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा असतील. वयाच्या १२व्या वर्षापर्यंत उदयने क्रिकेट गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली उदय सराव करत होता. यानंतर वयाच्या १४ वर्षापर्यंत त्याला पंजाबला पाठविण्यात आले. यानंतर उदयने पंजाबकडूनच १४ वर्षांखालील व १६ वर्षांखालील स्पर्धेत सहभाग नोंदवत भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले.
मुशीर खान (अष्टपैलू)
भारताच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात मुशीर खानने संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडली. त्याने आयर्लंडविरुद्ध ११८ व न्यूझीलंडविरुद्ध १३१ धावांच्या शतकी खेळी केल्या. तर, अमेरिकेविरुद्ध त्याने ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ६७.६०च्या सरासरीसह ३३८ धावा केल्या आहेत. मुशीरने गोलंदाजीतीही योगदान दिले आहे. त्याने सहा गडी बाद केले आहेत. मोठा भाऊ सर्फराज खानप्रमाणे मुशीरने विश्वचषक स्पर्धेत छाप पाडली. सर्फराजने २०१४ व २०१६मध्ये विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मुशीर स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो. त्याने तीन प्रथम श्रेणी सामन्यांत ९६ धावा केल्या असून दोन गडी बाद केले आहेत.
सचिन धस (फलंदाज)
सचिन धस हा स्पर्धेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ७३.५०च्या सरासरीने २९४ धावा केल्या आहेत. सचिनने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली ९६ धावांची भागीदारी संघासाठी निर्णायक ठरली होती. त्यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध ११६ धावांची शतकी खेळी केली. सचिनने अजूनपर्यंत ‘लिस्ट-ए’ आणि प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. सचिन तेंडुलकरच्या नावे आपण मुलाचे नाव ठेवले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले होते. तसेच, आपल्या मुलाला क्रिकेटचा सराव करता यावा याकरिता त्यांनी ‘टर्फ’ची खेळपट्टी तयार केली. महाराष्ट्राच्या बीडचा असलेल्या सचिनने पुणे येथे एका निमंत्रित १९ वर्षांखालील स्पर्धेत षटकार मारण्याच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्या कामगिरीकडे लक्ष राहील.
हेही वाचा >>>विश्लेषण : इम्रान यांच्या ‘बाउन्सर’समोर पाकिस्तानी लष्कर, शरीफ-भुत्तो हैराण? निवडणुकीत अनपेक्षित मुसंडी कशी?
सौमी पांडे (फिरकीपटू)
फिरकीपटू सौमी पांडेने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात बळी मिळवले आहेत. स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांमध्ये सौमी पांडे तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत सहा सामन्यांत १७ फलंदाजांना बाद केले आहे. आपली हीच लय तो अंतिम सामन्यातही कायम राखेल, अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंडविरुद्ध १९ धावांत ४ बळी ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. यासह बांगलादेश (४/२४) व नेपाळविरुद्ध (४/२९) देखील त्याने चार गडी बाद करण्याची किमया साधली. मध्य प्रदेशचा गोलंदाज असलेल्या सौमीची तुलना ही भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत केली जात आहे. मात्र, जडेजासोबत तुलना करणे योग्य नाही व आपण आताच कारकीर्दीला सुरुवात केली आहे, असे सौमीने सांगितले.
नमन तिवारी (गोलंदाज)
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या नमन तिवारीने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आतापर्यंत विश्वचषकाच्या पाच सामन्यांत १० गडी बाद केले आहे. या कामगिरीसह तो भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. त्याने अमेरिका (४/२०) व आयर्लंडविरुद्ध (४/५३) चमकदार कामगिरी केली. लखनऊचा नमन हा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला आपला आदर्श मानतो. डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी करणाऱ्या नमनने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे.
राज लिम्बानी (गोलंदाज)
विश्वचषक स्पर्धेत आपल्या ‘स्विंग’ आणि वेगाने राज लिम्बानी याने सर्वांचे लक्ष वेधले. पाच सामन्यांत राजने ८ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात ६० धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. गुजरातच्या कच्छमधील राजचे आई-वडील हे शेतकरी असून त्याचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास हा संघर्षपूर्ण आहे. कच्छच्या वाळवंटी प्रदेशात राज आपल्या क्रिकेटच्या आवडीला जोपासत होता. यानंतर तो बडोदा येथे आला आणि तिथे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अंतिम सामन्यातही संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील.