-संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे वाचण्यासाठी लोकसत्ता अ‍ॅप डाउनलोड करून लॉग-इन करा

दिवाळी म्हणजेच प्रकाशाचा उत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असून भारतात त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भारतात मोठ्या थाटामाटात साजरा होणारा दिवाळीचा सण आता ‘ग्लोबल’ झाला असून जगातील अनेक देशांत हा प्रकाशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाऊस’मध्येही गेल्या दोन दशकांपासून दीपावली उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी यंदाही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे नुकतेच सांगितले. 

‘व्हाइट हाऊस’मध्ये दिवाळी सण कधीपासून साजरा केला जातो?

व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्याचे श्रेय जाते, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना. अमेरिकेतील हिंदू धर्मियांना आकर्षित करण्यासाठी बुश यांनी २००३मध्ये सर्वप्रथम अध्यक्षीय प्रासादात दीपावली साजरी केली. बुश आणि त्यांची पत्नी लॉरा बुश यांनी त्यावेळी अमेरिकेतील हिंदूना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर थेट २००९ मध्ये व्हाइट हाऊसमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यात आला.  

बुश यांच्यानंतर अध्यक्षपदी विराजमान झालेले बराक ओबामा यांनी २००९ मध्ये व्हाइट हाऊसमध्ये दीपोत्सव साजरा केला आणि त्यानंतर अमेरिकी अध्यक्षीय प्रासादात दिवाळी साजरी करण्याची परंपराच निर्माण झाली. ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये दीपावलीचा दिवा लावून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. त्यानंतर भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांसाठी विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. ओबामा यांनी ही दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आठ वर्षे कायम ठेवली. ओबामानंतर अध्यक्षपदावर विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही अमेरिकेत दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा कायम राखली आहे. 

ट्रम्प यांनी कशी साजरी केली होती दिवाळी?

भारतीय वंशाचे निवडक नागरिक, भारतीय-अमेरिकी समुदयातील काही नेते- अधिकारी यांना सोबत घेऊन व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची नवी परंपरा माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली. २०१७ मध्ये अध्यक्ष म्हणून पहिली दिवाळी साजरी करताना ट्रम्प यांनी तत्कालीन भारतीय राजदूत नवतेजसिंह सरना यांना रूझवेल्ट रूममध्ये आमंत्रित केले हाेते, त्यानंतर २०१९मध्ये ट्रम्प यांनी कमला हॅरिस, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, रोहित खन्ना आदी भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन दीपोत्सव साजरा केला.  

व्हाइट हाऊसमधील दिवाळीत खंड?

व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा २००३मध्ये सुरू झाली असली तरी त्यात २०२०मध्ये खंड पडला. २०२०मध्ये जगात करोना महासाथीने थैमान घातले होते, त्यावेळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने व्हाइट हाऊसमध्ये जनसमुदयासह दिवाळी साजरा न करण्याचा निर्णय व्हाइट हाऊस प्रशासनाने घेतला होता. मात्र तत्कालीन अमेरिकी अध्यक्षांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

व्हाइट हाऊसमध्ये यंदा दिवाळी कशी साजरी?

अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी यंदा व्हाइट हाऊसमध्ये मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव कॅरेन जीन- पियर यांनी सांगितले. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय-अमेरिकी नागरिक राहतात. त्याशिवाय अमेरिकेचे भारताबरोबरचे संबंध दृढ असल्याने यंदा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे पियर म्हणाले. 

अमेरिकेत दिवाळीची सार्वजनिक सुटी?

अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये दिवाळीला (फेडरल सुटी) सार्वजनिक सुटी घोषित करण्याविषयी एक विधेयक गेल्या वर्षी मांडण्यात आले. काँग्रेस सदस्य असलेल्या कॅरोलिना मॅलोनी यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकाला डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांसह इंडिया कॉकस, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आदी अधिवक्त्यांनी पाठिंबा दिला. मात्र याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया आणि टेक्सास या अमेरिकेतील राज्यांमध्ये दिवाळीच्या दिवसांत शाळा आणि काही खासगी कंपन्या बंद असतात. जगातील अनेक देशांमध्ये दिवाळीला सार्वजनिक सुटी दिली जाते. मलेशिया, फिजी, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर आणि श्रीलंका या देशांचा त्यात समावेश आहे. 

अमेरिकेशिवाय अन्य राष्ट्रांच्या नेत्यांकडूनही दिवाळी साजरी…

अमेरिकेशिवाय भारतीय नागरिकांची संख्या अधिक असलेल्या अनेक देशांमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. गतवर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि गृहमंत्री प्रिती पटेल यांनी लंडनमधील स्वामी नारायण मंदिराला भेट देऊन दिवाळीचा सण साजरा केला. जॉन्सन यांनी ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जॉन्सन यांचे पूर्वसुरी डेव्हिड कॅमेरून आणि थेरेसा मे यांनीही त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आपल्या निवासस्थानी दिवाळी मेजवानीचे आयोजन केले होते. त्याशिवाय मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस या देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडूनही दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीने ट्रुडो यांनी गेल्या वर्षी दीपप्रज्जवल करून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White house says joe biden has plans to celebrate diwali this year print exp scsg
First published on: 07-10-2022 at 07:56 IST