Who is Akhil Patel: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यूके दौऱ्यातील काही खास फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये पंतप्रधान भारतीय वंशाचे उद्योजक आणि यूकेस्थित चहा बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक यांनी दिलेला चहाच्या कपचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या चेकर्स इथला हा फोटो आहे. याच ठिकाणी बहुचर्चित आणि भारतासाठी महत्त्वाच्या अशा मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मात्र, इथे चहापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतले ते चहा देणाऱ्या माणसाने. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणात येण्याआधी त्यांच्या सुरुवातीच्या काळात चहा विक्रेते म्हणून प्रसिद्ध होते, त्यानंतर पंतप्रधानपदी आल्यावर त्यांचा ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रमही लोकप्रिय झाला आहे.
लंडनमधील अमला चायचे संस्थापक अखिल पटेल यांनी साधा कुर्ता परिधान केला होता. त्यांनी स्मित हास्यासह दोन्ही नेत्यांना ताजा चहा दिला. चहाचा कप देताना पंतप्रधान मोदींकडे पाहत ते म्हणाले, “एका चहावाल्याकडून दुसऱ्या चहावाल्याला…”
पंतप्रधान मोदी आणि अखिल पटेल यांच्यातील हे क्षण काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळेच अखिल पटेल आणि त्यांच्या चहाच्या कंपनीची कहाणी सर्वांसमोर आली. कोण आहे हा लंडन चहावाला अखिल पटेल आणि लंडनमध्ये त्यांनी कशी जागा निर्माण केली याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कोण आहेत अखिल पटेल?
अखिल पटेल हे अमला चायचे संस्थापक आहेत. ही एक लंडनस्थित चहाची कंपनी आहे. अखिल पटेल यांनी या कंपनीच्या माध्यमातून भारताचा मसाला चहा यूकेमध्ये आणला आहे. अखिल हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत. पाच दशकांपूर्वी अखिल यांची आजी रोजगाराच्या संधीच्या शोधात ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या, तेव्हापासून त्यांचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक आहे. अखिल यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आणि डेटा एनालिस्ट म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या आजीसोबतच्या असलेल्या चहाच्या आठवणींना उजाळा देत एक वेगळा मार्ग निवडला.
आजीसोबतच्या खास आठवणी लिंक्डइनवर पोस्ट करत अखिल यांनी लिहिले की, “मी मसाला चहाचा आस्वाद घेतच मोठा झालो. माझे वडील दररोज सकाळी चहा बनवायचे आणि मी माझ्या आजीकडे येताना प्रत्येक वेळी ती मला चहा देत असे.”
लंडनमध्ये राहात असताना त्यांच्या लक्षात आले की, बहुतेक ब्रिटीश कॅफेमध्ये दिल्या जाणाऱ्या चहाची चव बरोबर नव्हती. घरात बनवल्या जाणाऱ्या चहाची गोडी आणि तो स्वाद त्यात नव्हता, त्यामुळे अखिल यांनी आसाममधून त्यांच्या नातेवाईकांकडून शेतातून खास चहा मागवला. तसंच केरळमधून आणलेल्या मसाल्यांपासून बनवलेल्या त्यांच्या आजीच्या मूळ रेसिपीचा वापर करून ‘अमला चहा’ची सुरुवात केली.
या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटीश म्युझियमने शेअर केलेल्या मुलाखतीत बोलताना अखिल पटेल यांनी सांगितले होते की, “यूकेमध्ये चहाचे चुकीचे वर्णन कसे केले जाते हे पाहून त्यांना धक्का बसला होता. तो चहा अनेकदा दुधाळ, साखरयुक्त आणि खऱ्या मसाला चहासारखा चवदार नव्हता.” लिंक्डइनवरच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, की आजी अजूनही विचार करत आहे की मी चहाच्या व्यवसायात का आहे. पण, मला अभिमान आहे की तिची मसाला चहाची रेसिपी आता हजारो लोकांना आवडते.”
अमला चहाची कहाणी
२०१९ मध्ये लंडनमधील सर्वात गर्दीच्या अशा स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिक लेनवर एका लहानशा स्टॉलपासून सुरुवात झाली. या स्टॉलवर विकला जाणारा चहाचा प्रत्येक कप स्टोव्हवर पारंपरिक पद्धतीने आणि ताजा बनवला जात असे. भारतात प्रत्येक घरात जसा बनवला जातो त्या पद्धतीने तो बनवला जातो. या लहानशा स्टॉलने लक्ष वेधण्यास फार वेळ लागला नाही. अमला हे नाव संस्कृतमधून आले आहे, याचा अर्थ शुद्ध असा होतो.
अमला चहा कंपनी चहाच्या पानांचे मिश्रण, मसाल्यांचे मिश्रण आणि दूध बनवण्याचे भांडे तसंच गाळणी असे चहा बनवण्यासाठीचे साहित्य पुरवते. त्यांच्या सोशल मीडिया पेजनुसार, या कंपनीने आतापर्यंत चार लाखांहून अधिक कप चहा विकला आहे. मे महिन्यात ब्रिटीश संग्रहालयाने अमला चहा या कंपनीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी थेट शोतातून खरेदी करण्याची आणि यूकेमध्ये ही कंपनी भारतीय चहा परंपरा जपण्याची त्यांची कल्पना कशी पुढे नेत आहे हे दाखवण्यात आले.
अखिल पटेल यांनी स्वत: पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत काहीही पोस्ट केलेले नाही. त्यांनी त्यांच्या अमला चाय या कंपनीच्या इन्स्टाग्रामवर या मौल्यवान क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासाठी चहा देणे हे खूप सन्माननीय आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही तुमच्यासोबत संपूर्ण कहाणी शेअर करू”, असे कंपनीच्या हँडलवर शेअर करण्यात आले आहे