Who is Balen Shah Nepal Protest News in Marathi : नेपाळमधील तरुणांनी सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी मंगळवारी अधिकच उग्र स्वरूप धारण केलं. संतप्त आंदोलकांनी संसद भवनासह इतर महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर तेथील लष्करप्रमुखांनी आंदोलकांना शांतता आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं आवाहन केलं. या आंदोलनानंतर बालेन शाह यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. शाह यांनी पंतप्रधानपद स्वीकारून देशाची सूत्रं आपल्या हाती घ्यावीत, अशी मागणी काही आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे नेपाळसह संपूर्ण जगभरात त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. दरम्यान, कोण आहेत बालेन शाह? ते ‘जेन झी’ आंदोलनाच्या केंद्रस्थानी कसे आले? त्याबाबत जाणून घेऊ…
बालेन शाह कोण आहेत?

३५ वर्षीय बालेन शाह हे सध्या नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर आहेत. मे २०२२ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून महापौरपदाची निवडणूक जिंकली होती. नाट्यमयरीत्या राजकारणात सक्रिय झालेले बालेन शाह अत्यंत कमी कालावधीतच तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले. त्यांनी कर्नाटकातील विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेलं आहे. पेशानं अभियंता असलेल्या शाह यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला अभियांत्रिकी क्षेत्रात काम केलं. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी शाह हे नेपाळच्या ‘हिप-हॉप’ क्षेत्रात सक्रिय होते.

भ्रष्टाचाराविरोधात उठवला आवाज

आपल्या गाण्यांमधून ते भ्रष्टाचार आणि असमानतेविरोधात आवाज उठवीत होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर शाह काठमांडूचे महापौर म्हणून निवडून आले. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर परखड मत मांडून तरुणाईचा विश्वास जिंकला. २०२३ मध्ये टाइम मॅगझिनमधील १०० प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये शाह यांच्या नावाचा समावेश होता. ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या प्रतिष्ठित मीडिया संस्थांनीही त्यांची दखल घेतली आहे. बालेन शाह यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट्सची अनेकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा झालेली आहे. त्यांची एकूण संपत्ती पाच ते सहा कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचं मासिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

आणखी वाचा : France Prime Minister : गेल्या २० महिन्यांत फ्रान्समधील सरकार चौथ्यांदा कोसळलं; कारण काय?

चित्रपटावरून भारताला दिला होता इशारा

रामायणाच्या कथेवर आधारित असलेला आदिपुरुष हा चित्रपट २०२३ मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बालेन शाह यांनी या चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला होता. हे संवाद तातडीने हटविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. इतकंच नाही, तर नेपाळ आणि काठमांडूमध्ये कोणताही भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशाराही त्यांनी भारताला दिला होता. सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत हा आक्षेप होता. त्यानंतर या चित्रपटावर काठमांडू व पोखरामध्ये बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे कुठलाही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही हे निश्चित करण्यासाठी काठमांडूतील १७ चित्रपटगृहांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते.

बालेन शाह यांनी आंदोलकांना काय आवाहन केलं?

मंगळवारी आंदोलनं तीव्र झाल्यानंतर बालेन शाह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि इतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची तुमची मागणी पूर्ण झाली आहे. आता सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं आणखी नुकसान होऊ नये. देशाच्या संपत्तीचं नुकसान म्हणजे आपल्या स्वतःच्या संपत्तीचं नुकसान आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगणं आवश्यक आहे,” असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.

who is balen shah
काठमांडूचे विद्यमान महापौर बालेन शाह (छायाचित्र बालेन शाह फेसबुक)

नेपाळमधील हिंसक आंदोलनाचे सूत्रधार कोण?

नेपाळमध्ये सुरू असलेल्या निषेध आंदोलनांपैकी एका आंदोलनाचे आयोजन ‘हामी नेपाळ’ या स्वयंसेवी संस्थेनं केलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही संस्था २०१५ मध्ये अनधिकृतपणे स्थापन झाली होती आणि २०२० मध्ये तिची अधिकृतरीत्या नोंदणी झाली. या संस्थेचे अध्यक्ष सुधन गुरुंग (वय ३६) असून ते परोपकारी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या दशकभरापासून गुरुंग हे आपत्ती निवारण, सामाजिक सेवा आणि आपत्कालीन भागात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. भूकंप, पूर व भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य उभारणं, आंतरराष्ट्रीय निधी संकलन, देणग्या गोळा करणं आणि आवश्यक वस्तूंचं वितरण करण्याचं काम ते करीत आले आहेत.

हेही वाचा : अमेरिकन सैनिकांनी दक्षिण कोरियातील महिलांना वेश्याव्यवसायात ढकललं? काय आहे नेमकं प्रकरण?

बालेन शाह आंदोलनाचं केंद्रबिंदू कसे झाले?

नेपाळ सरकारनं समाजमाध्यमांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेथील तरुणांनी सरकारविरोधात तीव्र निदर्शनं सुरू केली. या आंदोलनानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत गोळीबार केला. या गोळीबारात जवळपास २२ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. त्यानंतर बालेन शाह यांनी या कारवाईचा निषेध करीत तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे ते आंदोलनाचे नायक म्हणून पुढे आले. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यांनी महापौरपदाचा मेयरपदाचा राजीनामा देऊन देशाचं नेतृत्व करावं, असा आग्रह तरुण आंदोलकांनी धरला. त्यामुळे बालेन शाह हे नेपाळचे पुढील पंतप्रधान होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.