Kapil Sharma cafe shooting प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या कॅनडामधील ब्रिटीश कोलंबिया येथील सरे शहरातील कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा कॅफे काहीच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र, बुधवार आणि गुरुवारी (९-१० जुलै) मध्यरात्री या कॅफेवर गोळीबार करण्यात आल्या. अज्ञात हल्लेखोरांनी या कॅफेवर किमान नऊ गोळ्या झाडल्याची माहिती आहे. बंदी घातलेला दहशतवादी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) चा कार्यकर्ता हरजीत सिंग ऊर्फ लड्डी याने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. कॅप्स कॅफेमध्ये नक्की काय घडले? गोळीबार करणारा हरजीत सिंग लड्डी कोण आहे? त्याने हा हल्ला का केला? त्याविषयी जाणून घेऊयात.
कॅप्स कॅफेमध्ये काय घडले?
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी पहाटे २ वाजता सरे येथील १२० स्ट्रीटच्या ८४०० ब्लॉकवर असलेल्या शर्मा याच्या नव्याने उद्घाटन झालेल्या कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आला. काही वेळातच सरे येथील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना असे आढळून आले की, या गोळीबारात त्यांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. या घटनेदरम्यान कॅफेमधील कर्मचारी आत उपस्थित होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरे पोलिसांच्या स्टाफ सार्जंट लिंडसे हॉटन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, अधिकारी या परिस्थितीची चौकशी करत आहेत, परंतु या हल्ल्यामागील हेतूविषयी आताच सांगितले जाऊ शकत नाही.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आठ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये कॅफेवर हँडगनमधून गोळ्या झाडल्या जात असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडीओ एका गाडीतून शूट करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, सरेमध्ये दक्षिण आशियाई व्यवसायांना लक्ष्य करण्यात आल्याची ही पाचवी घटना आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सरे येथील रहिवाशांपैकी एक सतीश कुमार यांनी ‘व्हँकुव्हर सन’ला सांगितले की, सध्या सर्रेमध्ये राहणे खूप कठीण आहे. या शहरात खूप गुन्हे घडत आहेत. दररोज गोळीबार होत आहेत.”
कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “ग्राहकांना टेस्टी कॉफी देण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण भावनेने सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा कॅफे सुरू केला आहे. जे स्वप्न आम्ही पाहिलं त्या गोष्टीला हिंसाचाराला सामोरं जावं लागलं आहे, हे हृदयद्रावक आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत, पण आम्ही हार मानणार नाही.
कपिल शर्माच्या एका टेलिव्हिजन शोदरम्यान निहंग शिखांच्या पोशाखाबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द व्हँकुव्हर सन’ने वृत्त दिले आहे की, शर्माच्या कॅफेवरील हल्ला सर्रेमध्ये लक्ष्य करण्यात येणाऱ्या व्यवसायांच्या हल्ल्याचा एक भाग आहे. खरं तर, जूनपासून शहरातील दक्षिण आशियाई व्यावसायिक समुदायावर परिणाम करणाऱ्या अशा पाच घटना घडल्या आहेत. पोलिस आता या हल्ल्याचा तपास करत आहेत.
कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारामागे कोणाचा हात?
- कॅनेडियन पोलिसांनी गुन्ह्याच्या सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
- मात्र, हल्ल्याच्या काही तासानंतरच खलिस्तानी दहशतवादी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) चा सदस्य हरजीत सिंग ऊर्फ लड्डी याने फेसबुक पोस्टमध्ये या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.
- बीकेआय ही सर्वात जुनी खलिस्तानी दहशतवादी संघटना आहे.
- या संघटनेला बेकायदा क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार (यूएपीए) २०१८ मध्ये भारतात दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.
लड्डी नक्की कोण आहे?
हरजीत सिंग ऊर्फ लड्डी पंजाबमधील नवांशहरच्या गरपधाना गावचा रहिवासी आहे. लड्डी हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. भारताच्या केंद्रीय दहशतवादविरोधी कायदा अंमलबजावणी संस्थेने (एनआयए) गेल्या वर्षीच त्याच्या नावावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सध्या तो जर्मनीमध्ये राहत आहे. त्याच्यावर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर लक्ष्यित हल्ले करून पंजाबमध्ये अनेक हिंसक हल्ले घडवून आणल्याचा आरोप आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, एप्रिल २०२४ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) नेते विकास प्रभाकर यांच्या हत्येसाठीही तो जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विकास बग्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाकरची १३ एप्रिल २०२४ रोजी हत्या करण्यात आली. पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील नांगल येथे त्यांच्या मिठाईच्या दुकानात बीकेआय दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि हत्या केली. प्राप्त माहितीनुसार असे म्हटले आहे की, लड्डी हा पाकिस्तानस्थित बीकेआयचा प्रमुख वधवा सिंग बब्बर याच्या निर्देशानुसार काम करतो. याव्यतिरिक्त त्याला भारतीय शहरांमधील कार्यकर्त्यांना शस्त्रे, आर्थिक मदत पुरवण्याचे काम देण्यात आले आहे.
लड्डीने कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार करण्यामागचा हेतू काय आहे?
कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टमध्ये लड्डीने दावा केला आहे की, कपिल शर्मा शोमध्ये केलेल्या स्टँड-अप कॉमिकच्या एका वक्तव्यामुळे हा हल्ला करण्यात आला आहे. पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की, शोमधील एका पात्राने निहंग शिखांवर टीका केली होती. लड्डीने याबद्दल शर्माच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या कॉलला उत्तर मिळाले नाही.
या पोस्टमध्ये त्याने पुढे इशारा दिला की, शर्माने जाहीरपणे माफी मागितली नाही तर अधिक परिणाम भोगावे लागतील. कॅनेडियन पोलिसांनी शर्माच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराशी खलिस्तानच्या संबंधाबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. एका पत्रकाराने म्हटले की, “कॅनडामध्ये या स्वरूपाच्या वाढत्या घटनांचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. त्यांनी पुढे असे निदर्शनास आणून दिले की, कॅप्स कॅफेमधील गोळीबार ही हिंसाचार वाढवणारी घटना होती. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन म्हणाले, “कॅनडामध्ये अशा घटना अधिक वाढत आहेत. अतिरेकी हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. खलिस्तानी हल्ले वाढले आहे. आपण सिनेगॉगवरील बॉम्बस्फोट, ज्यू प्ले स्कूलवरील गोळीबार आणि खलिस्तानींनी मंदिरावर केलेला हल्ला पाहिला आहे,” असे ते म्हणाले.