Who is Jitender Pal Singh : पहगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सूड म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही लष्करी मोहीम राबवीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळे उद्ध्वस्त केले. या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करप्रमुखांना फोन करून युद्धविरामासाठी विनंतीवजा याचनेची झोळी पसरली. आता इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असताना भारताने ‘ऑपरेशन सिंधू’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारताचे राजदूत जितेंद्र पाल सिंह (जेपी) हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दरम्यान, भारताच्या या नवीन मोहिमेचा उद्देश काय? जितेंद्र पाल सिंह यांची का होतेय चर्चा? ते जाणून घेऊ…

ऑपरेशन सिंदूरच्या काही महिन्यांनंतरच भारताने ऑपरेशन सिंधू ही नवीन मोहीम सुरू केली आहे. या दोन्ही मोहिमांची नावे एकसमान असल्याने त्याविषयी अनेकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इस्रायल आणि इराणमधील लष्करी तणाव वाढत असताना भारताने पश्चिम आशियाई देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. यादरम्यान, इस्रायलमधील राजदूत जितेंद्र पाल सिंह हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या गुंतागुंतीच्या संघर्षात भारताचे धोरण आखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

कोण आहेत जितेंद्र पाल सिंह?

  • जितेंद्र पाल सिंह हे २००२ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत.
  • सध्या ते इस्रायलमधील भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
  • जानेवारी २०२५ मध्ये संजीव सिंह यांच्या जागी जितेंद्र पाल सिंह नियुक्ती करण्यात आली होती.
  • त्यांच्या नियुक्तीच्या वेळी इस्रायल आणि हमास या दोन देशांमध्ये गाझामध्ये संघर्ष सुरू होता.
  • इस्रायलमध्ये भारतीय कामगारांची संख्या वाढत असताना जितेंद्र पाल सिंह यांची भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • सध्या इस्रायलमध्ये सुमारे ३२,००० भारतीय नागरिक आहेत. त्यातील बरेच जण नोकरी व व्यवसायासाठी तेथे स्थायिक झालेले आहेत.

आणखी वाचा : Sejjil Missile : इराणचं ‘सेज्जिल क्षेपणास्त्र’ किती शक्तिशाली? त्याने इस्रायलचं किती नुकसान केलं?

पश्चिम आशियातील भारताचे संकटमोचक

जितेंद्र पाल सिंह यांना पश्चिम आशियातील भारताचे संकटमोचक म्हणून ओळखले जाते. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण (PAI) विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहिले आहे. त्याशिवाय रशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान व तुर्कीमधील महत्त्वाच्या पदांवरही सिंह यांनी काम केले आहे. २०२३ मध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी व परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियन यांच्या निधनानंतर भारताचे इराणशी संबंध सांभाळण्याची जबाबदारीही जितेंद्र पाल सिंह यांच्याच खांद्यावर होती.

iran israel war india operation sindhu launched (PTI Photo)
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११० भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाला इराणमधून मायदेशी परत आणण्यात आलं आहे. (पीटीआय फोटो)

२००८ ते २०१२ या काळात जितेंद्र पाल सिंह हे अफगाणिस्तानातील काबूलमध्ये भारताचे पहिले सचिव होते. याच काळात तेथील भारतीय दूतावासावर तालिबानकडून दोन आत्मघातकी हल्ले करण्यात आले. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर सिंह यांनी तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी (भारतीय दूतावासावरील हल्ल्यांचा सूत्रधार) यांची भेट घेतली. त्यांनी तालिबानच्या संरक्षणमंत्र्यांशीही चर्चा केली, ज्यामुळे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे दुबईतील पुढील उच्चस्तरीय संवाद शक्य झाले.

पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका

२०१४ ते २०१९ या काळात जितेंद्र पाल सिंह हे पाकिस्तानमधील भारताचे उपउच्चायुक्त होते. त्यांनी उरी, पठाणकोट व पुलवामा हल्ल्यांनंतर भारत-पाकिस्तानमधील संबंधांत निर्माण झालेला तणाव अतिशय योग्य पद्धतीने हाताळला. करतारपूर कॉरिडॉरसाठी झालेल्या वाटाघाटींचेही नेतृत्वही अमृत पाल सिंह यांनीच केले. २०१४ मध्ये भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामाबादमध्ये SCO बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये थोडासा संवाद सुरू झाला होता. परंतु, २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली.

दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी

भारताच्या या लष्करी मोहिमेदरम्यान जितेंद्र पाल सिंह यांनी पाकिस्तानकडे हाफिज सईद, लखवी व साजिद मीर यांच्यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत सिंह म्हणाले, “नवीन धोरणानुसार भारत आता फक्त संरक्षणात्मक भूमिका न घेता, दहशतवादाविरोधात आक्रमक पावले उचलत आहे.” त्यांनी हेही स्पष्ट केलं होते की, भारतानं सध्या ऑपरेशन सिंदूर थांबविलं असलं तरी ते पूर्णपणे संपलेलं नाही. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ही मोहीम सुरूच राहील.

आणखी वाचा : अमेरिकेने १९५३ मध्ये इराणमधील सत्ता कशी उलथवून टाकली होती? ४ दिवसांत काय घडलं होतं?

‘द डिप्लोमॅट’ चित्रपटात झळकलेले पात्र

२०१७ मध्ये पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय महिला उझमा अहमदच्या सुटकेसाठी जितेंद्र पाल सिंह यांनी मोलाची भूमिका बजावली. त्या प्रकरणावर आधारित ‘The Diplomat’ हा नेटफ्लिक्सवरील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात अभिनेता जॉन अब्राहमने जितेंद्र पाल सिंग यांची प्रमुख भूमिका केली आहे. जेपी सिंग हे एक अनुभवी व कठोर निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. इस्रायल-इराण संघर्षाच्या काळात भारताच्या भूमिकेला दिशा देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सध्या इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांनाही ते सुखरूप मायदेशी पाठवीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ऑपरेशन सिंधू’ सुरू करण्यामागील उद्देश काय?

१३ जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधू ही नवीन मोहीम सुरू केली आहे. इस्रायल-इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळत असल्याने तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून इराणच्या संघर्षग्रस्त भागात राहणारे भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक,पर्यटक आणि इतरांना देशात परत आणण्यात येत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११० भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाला सुखरूप भारतात आणण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी गुरुवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांमधील ९० जण जम्मू आणि काश्मीरचे आहेत. वृत्तानुसार, १३,००० हून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या इराणमध्ये आहेत. या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.