तुम्हाला ज्योती मौर्य लक्षात आहे का? उत्तर प्रदेशातली उपविभागीय दंडाधिकारी (sub-divisional magistrate), जिच्या पतीने तिला नोकरी मिळाल्यावर विश्वासघाताचा आरोप केला होता. ज्योती मौर्य हिच्या पतीचा आरोप होता की, सरकारी अधिकारी झाल्यानंतर ज्योतीच्या स्वभावात बदल झाला आणि तिचे एका अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. वरवर हे प्रकरण जरी घरगुती किंवा साधं वाटत असलं तरी ते तसं नाही. कारण या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. ज्योती मौर्य हिचा पती आलोक मौर्य याने अलाहाबाद हायकोर्टात पोटगीसाठी धाव घेतली आहे.

काय आहे कायदा?

हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम २४ आणि २५ नुसार पती आर्थिकदृष्ट्या पत्नीपेक्षा कमकुवत असल्यास किंवा उदरनिर्वाहासाठी पत्नीवर अवलंबून असल्यास किंवा पुरेसे उत्पन्न नसल्यास पोटगीची मागणी करू शकतो. या कायद्यानुसार पती किंवा पत्नी कोणीही घटस्फोटानंतर पोटगी मागू शकतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे सिद्ध केल्यास पोटगी मागता येऊ शकते.
कलम १४४ बीएनएस कायद्यानुसार दोन्ही बाजूंकडून पोटगीची मागणी करता येते.
अशा प्रकरणांमध्ये न्यायालय पती व पत्नी दोघांचेही उत्पन्न पाहते. कोणाचीही आर्थिक बाजू सक्षम नसल्यास दुसऱ्या पक्षाला पोटगी मागण्याचा अधिकार असतो आणि तो सिद्धही करावा लागतो. आलोक हा चतुर्थ श्रेणी कामगार असल्याने त्याने पोटगीची मागणी केल्याचे म्हटले जात आहे.

स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आलोकने पत्नी ज्योती हिला शिक्षणासाठी आणि तिच्या अधिकारी होण्याच्या प्रवासाला पाठिंबा दिला होता. मात्र, सरकारी पद मिळाल्यानंतर तिने त्याला सोडून दिल्याचा आरोप आलोकने केला होता. त्याचा भावनिक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि ज्योती मौर्य बेवफा है असा ट्रेंडही व्हायरल झाला होता.

कोण आहे ज्योती मौर्य?

२०२३ मध्ये बरेलीमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत असलेले ज्योती मौर्य नाव अचानक चर्चेत आले. प्रसारमाध्यमांसमोर तुटून पडल्याचा आलोकचा व्हिडीओ सर्वत्र पसरला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आलोकने त्याच्या पत्नीवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.
वृत्तानुसार, हे जोडपे मूळचे वाराणसीचे रहिवासी आहेत. २०१० मध्ये त्यांनी लग्न केले आणि २०१५ मध्ये ते जुळ्या मुलींचे पालक झाले. ज्योतीने २०१५ मध्ये उत्तर प्रदेश प्रांतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि १६ वा क्रमांक मिळवला. यावर तिच्या शिक्षणाला आणि तिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला आणि पैसाही दिला, ते ज्योती विसरल्याचा आरोप आलोकने केला.

आलोक मौर्य याचे आरोप काय?

प्रतापगडमधील पंचायती राज विभागात आलोक चतुर्थ श्रेणी कामगार आहे. आलोकने ज्योतीवर होमगार्ड कमांडंट मनीष दुबे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. त्याने दावा केला की, २०२० मध्ये त्याने दोघांना एकत्र हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले होते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विश्वासघाताच्या आरोपांव्यतिरिक्त आलोकने ज्योती आणि मनीषवर त्याला मारण्याचा कट रचल्याचाही आरोप केला. या आरोपांबाबतचा पुरावा म्हणून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज असल्याचेही आलोकने सांगितले. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतीने केलेल्या लाचखोर प्रकरणांची नोंद असलेली डायरीदेखील आलोकने सादर केली. प्रयागराजच्या धूमनगंज पोलिस ठाण्यात आलोकने जीवाला धोका असल्याची तक्रारही दाखल केली होती.

महत्त्वाचे मुद्दे:

  • भारतात पोटगीचे कायदे हिंदू विवाह कायदा १९५५ नमूद केलेले आहेत
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा पती किंवा पत्नी कोणालाही पोटगी मागण्याचा हक्क
  • पोटगी एक रकमी किंवा मासिक आधारावर दिली जाते
  • पोटगीची रक्कम पती-पत्नीचे उत्पन्न, राहणीमान आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली जाते
  • पोटगी टाळण्यासाठी पती-पत्नी काही कायदेशीर पर्यायही स्वीकारू शकतात

ज्योती मौर्य हिची प्रतिक्रिया काय?

आलोकने केलेले सर्व आरोप ज्योतीने फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की, लग्नाच्या वेळी आलोकने ग्रामपंचायत अधिकारी असल्याचे खोटे सांगितले. त्यांच्या लग्नाच्या कार्डमध्ये आलोकचा उल्लेख ग्रामविकास अधिकारी म्हणून केला होता. ज्योतीचे वडील प्रशांत यांनी तिच्या समर्थनार्थ दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, लग्नाच्या आधी खोटी माहिती देण्यात आली होती. त्याचे कुटुंब खोटे आहे.
दुसरीकडे आलोकने ती लग्नाची पत्रिका बनावट असल्याचे सांगितले होते. त्यानी हे निदर्शनास आणून दिले की, ज्योतीने त्यावेळी तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पत्रिकेत ती शिक्षिका असल्याचे छापले होते.

दरम्यान, आलोकने उल्लेख केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेजही खोटे असल्याचे ज्योतीने म्हटले आहे. तसंच तिने आयटी अ‍ॅक्टअंतर्गत तक्रारही दाखल केली आहे. “माझे वैयक्तिक चॅट्स लीक केल्याबद्दल माझ्या पतीविरूद्ध आयटी कायद्यांतर्गत आधीच तक्रार दाखल केली आहे. पोलिस याबाबत पुरावे गोळा करतीलच, असे तिने म्हटले आहे. तसंच ज्योतीच्या नावाने दोन्ही ऑनलाईन ट्रोलिंगही होऊ लागलं. ज्योती बेवफा है असा ट्रेंड व्हायरल झाला. याविषयी सांगताना तिने हे सर्व दुर्दैवी असल्याचे म्हटले. पतीच्याच संशयामुळे नाते तुटल्याचे ज्योतीने म्हटले आहे. तसंच आलोकने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला. दैनिक जागरणच्या एका वृत्तात असे म्हटले होते की, २०२३ मध्ये ज्योतीने आलोक आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध धूमनगंज पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलोकने याआधी आझमगडच्या कौटुंबिक न्यायालयात अंतरिम पोटगीसाठी अर्ज केला होता. त्याने आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणींची सबब पुढे केली. मात्र, त्याची याचिका ४ जानेवारी रोजी फेटाळण्यात आली. त्यानंतर आता त्याने पोटगीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून न्यायालयाने ज्योती मौर्य हिला नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे