Assam bureaucrat arrested आसाममध्ये भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्याने केलेला घोटाळा समोर आणला आहे. नुपूर बोरा ही आसाममधील एक सनदी अधिकारी आहे. आता त्यांना उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी पोलिसांना जवळपास २ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने आढळल्यानंतर नूपुर बोरा यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, नुपूर बोरा या हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित करत असल्याचा संशय असल्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. गुवाहाटी येथील बोरा यांच्या घरात पोलिसांनी छापा टाकून रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. बारपेटा येथील त्यांच्या भाड्याच्या घरासह इतर तीन ठिकाणीही छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, नूपुर बोरा नक्की आहेत कोण? त्यांच्यावरील आरोप काय? पोलिसांच्या तपासात आणखी काय समोर आले? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
नेमके प्रकरण काय?
सोमवारी त्यांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ९० लाख रुपये रोख आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. जप्त केलेल्या एकूण मालमत्तेचे मूल्य सुमारे २ कोटी रुपये आहे. माध्यमांशी बोलताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वादग्रस्त जमीन व्यवहारांमध्ये त्यांच्या कथित भूमिकेबद्दल तक्रारी मिळाल्यानंतर सहा महिन्यांपासून त्यांच्यावर नजर ठेवली जात होती.

ते म्हणाले की, मुस्लीम बहुल बारपेटा जिल्ह्यात नियुक्ती मिळाली असताना नुपूर बोरा यांनी केलेल्या जमीन हस्तांतर प्रकरणांवर सरकारची नजर होती. मुस्लीम बहुल जिल्ह्यांत गेल्या काही काळापासून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही या अधिकाऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. बारपेटा जिल्ह्यात नियुक्ती मिळाली असताना तिने (बोरा) पैशांच्या मोबदल्यात हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांच्या नावे केल्या.
शिवसागरचे आमदार अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ‘कृषक मुक्ती संग्राम समिती’ (KMSS) या स्थानिक सामाजिक संस्थेने त्यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, भूखंडाच्या नकाशेसाठी १,५०० रुपये आणि जमिनीच्या नोंदींमध्ये नावे जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जात होती, असे वृत्त ‘न्यूज १८’ने दिले आहे. मुख्य म्हणजे नुपूर बोरा यांचा कथित सहकारी लॅट मंडल सुरजित डेका यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. सुरजित डेका बारपेटा येथील महसूल कार्यालयात काम करतो.
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, डेकावर आरोप आहे की, बोरा बारपेटा येथे सर्कल अधिकारी म्हणून काम करत असताना, त्यांनी तिच्या मदतीने अनेक भूखंड विकत घेतले. मुख्यमंत्र्यांच्या दक्षता विभागाच्या पोलीस अधीक्षक रोझी कलिता यांनी या छाप्याचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारींची चौकशी सुरू आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जप्त केलेली रोकड आणि सोने ही फक्त सुरुवातीच्या छाप्यातील आहे आणि पुढील तपासामध्ये आणखी पुरावे समोर येऊ शकतात.
विशेष म्हणजे, सुरुवातीला हा छापा रविवारी रात्री टाकण्याची योजना होती, परंतु अधिकारी घरी नसल्याने आणि गेस्ट हाऊसमध्ये राहत असल्याने छाप्याची वेळ बदलण्यात आली. बोरा परतल्यानंतर सोमवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई त्यांच्या गुवाहाटी येथील घरात सुरू झाली आणि नंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर तीन ठिकाणीही छापा टाकण्यात आला.
नूपुर बोरा कोण आहेत?
- नूपुर बोरा २०१९ च्या बॅचच्या आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी आहेत.
- बोरा यांचा जन्म ३१ मार्च १९८९ रोजी झाला असून, त्या आसाममधील गोलाघाट जिल्ह्याच्या कार्यरत आहेत.
- त्यांनी कामरूप जिल्ह्यातील गोरोइमारी येथे सर्कल अधिकारी म्हणून काम केले आहे.
- त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून पदवी घेतली आहे आणि कॉटन कॉलेजमध्येही शिक्षण घेतले आहे.
- त्यांच्या फेसबुक प्रोफाइलनुसार, नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (DIET) व्याख्याता म्हणून काम केले.
- त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात मार्च २०१९ मध्ये कार्बी आंगलोंगमध्ये सहायक आयुक्त म्हणून झाली. हे पद त्यांनी जून २०२३ पर्यंत सांभाळले.
- त्यानंतर जून २०२३ मध्ये बारपेटा येथे सर्कल अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली आणि नंतर त्यांची कामरूप येथे बदली झाली.
नुपूर बोरा आणि मुख्यमंत्री सरमा यांची भेट
नुपूर बोरा यांच्या फेसबुक प्रोफाइलवरील सर्वात नवीन पोस्ट दोन दिवसांपूर्वीची आहे. बोरा त्यांच्या मुलाबद्दल, घरातील फोटो आणि व्हिडिओ नियमितपणे पोस्ट करतात. त्यांच्या पोस्टमध्ये घराच्या सजावटीचे प्रकल्प, निसर्गात घालवलेले क्षण किंवा बागेची काळजी घेतानाचे फोटो आहेत. एका पोस्टमध्ये ‘Handmade with love’ अशा कॅप्शनसह एक लाकडी स्टँड आणि फोटो फ्रेम दिसत आहे. मात्र, त्यांच्या फेसबुकवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आगे. १७ एप्रिल २०२२ रोजी पोस्ट केलेल्या फोटोंच्या एका कलेक्शनमध्ये नुपूर बोरा मुख्यमंत्री सरमा यांच्याबरोबर उभ्या असल्याचे दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे: “आदरणीय मुख्यमंत्री सर आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर.”