Chaitanyananda Saraswati Case in Marathi : स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वती एका वादाच्या भोवऱ्यात अडकला. दिल्लीतील आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. त्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अटक वॉरंट निघताच स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला. सध्या पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. स्वयंघोषित बाबाचा हा ‘प्रताप’ उघड होताच राजधानी दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. नेमका कोण आहेत स्वामी चैतन्यानंद सरस्वती? त्याच्यावर विद्यार्थिनींसह महिलांनी कोणकोणते आरोप केले? त्या संदर्भातील हा आढावा…
आरोपी चैतन्यानंद सरस्वती हा दिल्लीतील ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’ या खासगी संस्थेचे संचालक आहे. या आश्रमात शिकणाऱ्या तब्बल १७ विद्यार्थिनींनी चैतन्यानंद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मोबाईलवर अश्लील मजकूर पाठवणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि बळजबरीने शारीरिक स्पर्श करणे यांसारख्या आरोपांचा तक्रारींत समावेश आहे. काही तरुणींनी तर चैतन्यानंद याच्यावर ब्लॅकमेलिंगचेही आरोप केले आहेत. पोलिसांनी सर्व विद्यार्थिनींचे जबाब नोंदवून घेतले असून, आरोपीला अटक करण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत. चैतन्यानंद हा शेवटी आग्रा येथे दिसला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
कोण आहेत चैतन्यानंद सरस्वती?
स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचे खरे नाव डॉ. पार्थसारथी असून, तो मूळचे ओडिशातील रहिवासी आहेत. स्वत:ला धर्मगुरू म्हणणारा चैतन्यानंद १२ वर्षांपासून श्री शृंगेरी मठाद्वारे चालविल्या जाणाऱ्या आश्रमात राहत होता. दिल्लीतील वसंत कुंज परिसरात असलेल्या ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’ या खासगी संस्थेचा तो संचालक असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. चैतन्यानंद याचा भूतकाळ हा वादग्रस्त राहिलेला आहे. २००९ मध्ये त्याने दिल्लीतील एका महिलेचा विनयभंग केला होता. त्यावेळी पोलिसांनी चैतन्यानंद याला अटक करून, त्याची तुरुंगात रवानगी केली होती. २०१६ मध्ये वसंत कुंज परिसरात एका महिलेने त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांनी त्याला अटक केली होती. महिलांना सतत लक्ष्य करणारा चैतन्यानंदला गंभीर गुन्ह्यानंतरही तुरुंगातून का सोडण्यात आले, असा प्रश्न काहीजण विचारत आहे.
आणखी वाचा : गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? डोनाल्ड ट्रम्प नक्की काय म्हणाले? तज्ज्ञ काय सांगतात?
चैतन्यानंद सरस्वतीच्या संपत्तीवरही प्रश्नचिन्ह
चैतन्यानंद याच्या संपत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या मते, गेल्या काही वर्षांत त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. चैतन्यानंदकडे भगव्या रंगाची आलिशान सेदान कार असून, ही गाडी ‘डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स’द्वारे वापरली जात होती. आरोपीच्या वसंत कुंज आश्रमाच्या तळघरात जप्त करण्यात आलेल्या या कारवर संयुक्त राष्ट्रांतील ‘३९ यूएन १’ अशी बनावट प्लेट लावण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर मालकी हक्काचा गैरवापर करून, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे व खोटे दस्ताऐवज तयार करणे अशा आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीची कार जप्त करण्यात आली असून, आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चैतन्यानंद सरस्वतीवर नेमके कोणते आरोप?
स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने आश्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यातील अनेक विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मॅनेजमेंट डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आश्रमातील ३२ पैकी १७ विद्यार्थिनींनी चैतन्यानंदवर अश्लील संदेशांपासून ते शारीरिक छळापर्यंत अनेक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी काही विद्यार्थिनींच्या मोबाईलवरील मेसेज पुरावा म्हणन जमा केले आहेत. एका संदेशात आरोपीने विद्यार्थिनीला, “माझ्या खोलीत आलीस आणि माझे ऐकलेस, तर तुला परदेशात घेऊन जाईन,” असे प्रलोभन दाखवले होते. तर दुसऱ्या संदेशात एका विद्यार्थिनीला, “माझे ऐकले नाहीस, तर तुला नापास करीन,” अशी धमकी आरोपीने दिली होती.
चैतन्यानंदच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके
विद्यार्थिनींनी असाही आरोप केला की, आश्रमातील वॉर्डनने त्यांची आरोपीशी ओळख करून दिली होती. आश्रमातील काही महिला प्राध्यापक आणि कर्मचारीही विद्यार्थिनींवर दबाव आणून, आरोपीच्या मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडत होते. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आश्रम व आरोपीच्या निवासस्थानी धाडीही टाकल्या आहेत. फरारी झालेल्या चैतन्यानंदचा शोधण्यासाठी पोलिसांनी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. आरोपी मोबाईल फोन क्वचितच वापरत असल्याने त्याचा माग काढणे कठीण जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : I Love Muhammad’: ‘आय लव्ह मोहम्मद’- का सुरू झालाय यावरून देशभरात नवा वाद?
आश्रमाकडून चैतन्यानंद सरस्वतीची हकालपट्टी
विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आश्रम प्रशासनाने तत्काळ कारवाई करीत चैतन्यानंद सरस्वतीची सर्व पदांवरून हकालपट्टी केली आहे. त्याच्याकडे दिल्लीतील ज्या युनिटची जबाबदारी होती, तो दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध आश्रम आहे. त्या संदर्भात दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठा शृंगेरी यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. चैतन्यानंद याचे वर्तन बेकायदा तसेच अयोग्य असून, ते पीठाच्या हिताच्या विरोधातील आहे. त्याच्याबरोबरचे सर्व संबंध आता तोडण्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत चैतन्यानंद याच्याविरोधात असंख्य डिजिटल पुरावे गोळा केले आहेत. या प्रक्रियेत तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापकांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.