Donald Trump aide Charlie Kirk killed अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ३१ वर्षीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. बुधवारी उटाह येथील एका महाविद्यालयात एका कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांसमोर भाषण करीत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ट्रम्प यांना तरुण मतदारांमध्ये असलेला पाठिंबा मजबूत करण्याचे श्रेय कर्क यांना दिले जाते. टर्निंग पॉइंट या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे चार्ली कर्क सह-संस्थापक होते.
ट्रुथ (Truth Social) या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले, “आपण सर्वांनी चार्ली कर्कसाठी प्रार्थना केली पाहिजे. तो एक उत्तम माणूस होता. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.” त्यांनी असेही जाहीर केले की, रविवार सायंकाळपर्यंत देशभरातील सर्व अमेरिकन ध्वज अर्ध्यावर फडकावले जातील. चार्ली कर्क नक्की कोण होते? त्यांनी ट्रम्प यांना कशी मदत केली? त्यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय होती? जाणून घेऊयात…
चार्ली कर्क कोण होते?
- वयाच्या १८ व्या वर्षी कर्क यांनी ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ (Turning Point USA) या संस्थेची सह-स्थापना केली. ही संस्था विद्यार्थी आणि तरुण मतदारांमध्ये पुराणमतवादी (Conservative) विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करते.
- २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरुवातीच्या समर्थकांमध्ये त्यांचादेखील समावेश होता. या संघटनेने ट्रम्प रिपब्लिकन उमेदवार झाल्यानंतर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला.
- निवडणुकीदरम्यान, कर्क यांनी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे वैयक्तिक सहायक म्हणूनही काम केले. ते अनेकदा ‘कल्चर वॉर्स’ (culture wars) बद्दल बोलताना ट्रम्प यांची प्रशंसा करीत असत.
- ट्रम्प आणि त्यांचा मुलगा दोघेही नियमितपणे ‘टर्निंग पॉइंट’च्या कार्यक्रमांमध्ये भाषण देत असत. त्यामुळे या संघटनेचे नाव आणखी वाढले.

२०१९ मध्ये त्यांनी ‘टर्निंग पॉइंट ॲक्शन’ (Turning Point Action) ही संस्था सुरू केली. ही संस्था पुराणमतवादी (conservative) उमेदवारांसाठी प्रचार करते. हा गट ट्रम्प यांच्यासह प्रमुख उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींना घेऊन मोठ्या रॅली आयोजित करण्यासाठी ओळखला जातो. कर्क यांना ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (Make America Great Again) चळवळीचा एक प्रमुख आवाज मानले जात होते. २०२० च्या निवडणुकीत मतदार फसवणुकीमुळे आपला पराभव झाला, या ट्रम्प यांच्या खोट्या दाव्याला त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. ट्रम्प यांनी जाहीरपणे कर्क यांना २०२४ च्या विजयी मोहिमेदरम्यान तरुण आणि कृष्णवर्णीय मतदारांमध्ये पाठिंबा मिळवून दिल्याबद्दल श्रेय दिले. त्यात टर्निंग पॉइंटचे केंद्र असलेल्या ॲरिझोनामध्ये (Arizona) पाच गुणांच्या फरकाने मिळालेल्या विजयाचाही समावेश होता. २०२० मध्ये ट्रम्प यांना तिथे फार कमी फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
कर्क यांनी त्यांच्या पॉडकास्ट, रेडिओ कार्यक्रम व रॅलींमध्ये एक आक्रमक शैली विकसित केली होती. गेल्या वर्षी जॉर्जियामध्ये (Georgia) ट्रम्प यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, देव ज्याचा तिरस्कार करतो, अशा प्रत्येक गोष्टीसाठी डेमोक्रॅट्स उभे आहेत. त्यांनी ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्यातील लढाईचे वर्णन ‘एक आध्यात्मिक युद्ध’ असे केले होते.
त्यांचा पॉडकास्ट ५,००,००० पेक्षा जास्त लोक महिन्याभरात ऐकायचे आणि ‘एक्स’ (X)वर त्यांचे ५.३ दशलक्ष (5.3 million) फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे ते अनेकदा कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात ‘सेकंड अमेंडमेंट’चे (Second Amendment) समर्थन करणाऱ्या एका पुस्तकाचाही समावेश आहे.
अमेरिकेतील भारतीयांबाबत कर्क यांची भूमिका
भारतीय स्थलांतरितांबद्दल कर्क यांनी केलेले वक्तव्य चर्चेत असायचे. विशेष म्हणजे ते एकदा म्हणाले होते, “अमेरिकेला भारतातून आलेल्या लोकांसाठी अधिक व्हिसाची गरज नाही आणि अमेरिकेने आपल्या नागरिकांना प्राधान्य दिले पाहिजे.” त्यांनी २ सप्टेंबर रोजी ‘एक्स’वर पोस्ट केले होते, “अमेरिकेला भारतातून आलेल्या लोकांसाठी अधिक व्हिसाची गरज नाही. कदाचित भारताकडून आलेल्या कायदेशीर स्थलांतरामुले (Legal immigration) अमेरिकन कामगारांना सर्वाधिक विस्थापित केले आहे. आता पुरे झाले. शेवटी आपल्या लोकांना प्रथम प्राधान्य देऊया,” असे ते म्हणाले होते.
चार्ली यांच्या मृत्यूवर ट्रम्प यांची प्रतिक्रिया
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कर्क यांचे वर्णन देशभक्त (patriot) असे केले आणि त्यांच्या मृत्यूला अमेरिकेसाठी एक ‘काळा दिवस’, असे म्हटले. एका व्हिडीओ निवेदनात ते म्हणाले, “चार्लीने लाखो लोकांना प्रेरणा दिली. चार्ली एक देशभक्त होते, ज्यांनी आपले जीवन मुक्त चर्चेसाठी (open debate) आणि ज्या देशावर त्यांचे खूप प्रेम होते, त्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासाठी समर्पित केले होते.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “ते सत्य आणि स्वातंत्र्याचे एक आदर्श आहेत. तरुणांकडून एवढा आदर मिळालेली दुसरा कोणीही व्यक्ती नाही.” ट्रुथ सोशलवर (Truth Social) त्यांनी पोस्ट केले, “चार्ली यांना अमेरिकेतील तरुणांच्या मनात काय, हे चांगले समजले होते. त्यांच्यावर सर्वांचे प्रेम होते आणि ते सर्वांना आवडत होते, विशेषतः मला आणि आता ते आपल्यात नाहीत.” ट्रम्प म्हणाले, “एका खऱ्या महान अमेरिकन देशभक्त असलेल्या चार्ली कर्क यांच्या सन्मानार्थ, मी युनायटेड स्टेट्समधील सर्व अमेरिकन ध्वज रविवार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ध्यावर खाली आणण्याचे आदेश देत आहे.”