२८ सप्टेंबर १९०७ हा  भगतसिंग यांचा जन्मदिवस आहे. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली तो दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. भगत सिंग यांची क्रांतिकारी भूमिका नेहमीच अनेकांच्या टीकेस कारणीभूत ठरली आहे. तत्कालीन काँग्रेस देखील भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेच्या विरोधातच होती. त्यांचे क्रांतिकारी तत्वज्ञान काँग्रेसच्या अहिंसेच्या तत्त्वाला छेद जाणारे होते. काँग्रेसने स्वातंत्र्याच्या लढ्यात अहिंसेचा मार्ग निवडला होता, असे असले तरी तत्कालीन काँग्रेसमध्ये असे अनेक तरुण नेते होते ज्यांना भगतसिंग यांच्या विचारसरणीचा आणि त्यांच्या अफाट धैर्याचा आदर होता. त्याच तरुण नेत्यांपैकी एक जवाहरलाल नेहरू होते. ते स्वतः गांधींच्या अहिंसेच्या विचारांचे समर्थक करत होते, परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्यांनी भगतसिंग यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि त्यांच्या क्रांतिकारक पद्धती देखील समजून घेतल्या होत्या. 

भगतसिंग यांना फाशी का देण्यात आली?

२३ मार्च १९३१ रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव थापर आणि एस राजगुरू यांना लाहोर तुरुंगाच्या आवारात संध्याकाळी ७.३० वाजता फाशी देण्यात आली. १९२८ मध्ये ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉंडर्स यांच्या हत्येप्रकरणी या तिघांना ‘लाहोर कॉन्स्पिरसी केस’ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते.

आणखी वाचा: पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना दोषी ठरवणारा खटला वादग्रस्त होता. या प्रक्रियेला गती देण्यासाठी व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांचा (ट्रिब्युनल) समावेश असलेले विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अध्यादेश काढला. कायदेतज्ज्ञांनी- इतिहासकारांनी या अध्यादेशाकडे अन्यायकारक म्हणून पाहिले आहे. 

आयर्विनच्या अध्यादेशाला बेकायदेशीर म्हणून आव्हान देणार्‍या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, तरी हा खटला चालवला गेला. ७ ऑक्टोबर १९३० रोजी न्यायाधिकरणाने ३०० पानांचा निकाल दिला आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सॉंडर्सच्या हत्येत भाग घेतल्याचा निष्कर्ष काढला. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा बंदुकीची गोळी झाडून पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती केली होती, तरीही त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भगतसिंग त्यांच्या शेवटच्या एका पत्रात ते लिहितात, “मला युद्ध करताना अटक करण्यात आली आहे. माझ्यासाठी फाशी असू शकत नाही. मला तोफेच्या तोंडी ठेवा आणि  उडवून द्या.”

भगतसिंगांबद्दल नेहरू काय म्हणाले होते?

सतविंदर सिंग जुस यांनी त्यांच्या द ट्रायल ऑफ भगतसिंग या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, जवाहरलाल नेहरू यांनी ट्रिब्युनलच्या निर्णयाचा रागाने निषेध केला. १२ ऑक्टोबर १९३० रोजी अलाहाबाद येथील भाषणात त्यांनी केवळ न्यायाधिकरणावरच नव्हे तर व्हाईसरॉय आणि एकूणच ब्रिटिश राजवटीवर टीका केली. “जर इंग्लंडवर जर्मनी किंवा रशियाने आक्रमण केले तर लॉर्ड आयर्विन लोकांना आक्रमकांविरुद्ध हिंसाचारापासून दूर राहण्याचा सल्ला देईल का? जर तो तसे करण्यास तयार नसेल तर त्याने हा मुद्दा येथे उपस्थित करू नये. महात्मा गांधी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍या इतरांनी असे करणे आवश्यक आहे … परंतु त्यात कोणतीही चूक होऊ नये. 

मी त्यांच्याशी सहमत असो वा नसो, भगतसिंगांसारख्या माणसाच्या धैर्य आणि आत्मत्यागाने माझे हृदय कौतुकाने भरलेले आहे. भगतसिंग प्रकारातील साहस अत्यंत दुर्मिळ आहे. या अद्भूत धैर्याचे आणि त्यामागील उच्च हेतूचे कौतुक करण्यापासून आपण परावृत्त व्हावे अशी अपेक्षा व्हाईसरॉयने केली असेल तर तो चुकीचा आहे. भगतसिंग जर इंग्रज असते आणि इंग्लंडसाठी काम केले असते तर त्याला काय वाटले असते हे त्याला स्वतःच्या हृदयाला विचारू द्या,” असे जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या मोठ्या जनसमुदायाला सांगितले.

नेहरूंनी आपल्या भाषणात क्रांतिकारकांनी केलेल्या हिंसेचे समर्थन केले नाही तर त्यांनी स्वतः केलेल्या युक्तिवादांचा वापर करून त्यांनी खुलेपणाने त्यांचे मित्र आणि गुरू महात्मा गांधी यांच्याशी मतभेद व्यक्त केले.

आणखी वाचा: एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

नेहरूंना क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती होती का?

नेहरूंनी नेहमीच भारतीय क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती, जरी ते स्वतः हिंसेवर विश्वास ठेवत नव्हते किंवा प्रचार करत नव्हते तरी  त्यांच्या समाजवादी पार्श्वभूमीमुळे त्यांना क्रांतिकारक हिंसाचाराचे औचित्य समजू शकले आणि त्यांनी क्रांतिकारकांच्या धैर्याबद्दल वारंवार लिहिले.

गांधीजींनी अनेकदा क्रांतिकारी कारवायांचा सपशेल निषेध केला, तर नेहरूंनी क्रांतिकारकांना स्वतःचा संघर्ष करताना पाहिले आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. १९२९ मध्ये, ते भगतसिंग आणि सहकारी कैद्यांना मियांवली तुरुंगात भेटले,त्यावेळेस भगतसिंग आणि त्यांचे सहकारी  ‘राजकीय कैदी’ म्हणून चांगल्या वागणुकीच्या मागणीसाठी उपोषणावर होते. या भेटीनंतर नेहरू  म्हणाले, “वीरांची व्यथा पाहून मला खूप दुःख झाले. या संघर्षात त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. राजकीय कैद्यांना राजकीय कैदी समजावे, अशी त्यांची इच्छा आहे. मला आशा आहे की त्यांच्या बलिदानाला यश मिळेल.”

याविषयी  नंतर नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले की, “या विलक्षण धाडसी तरुणांना भेटणे आणि त्यांचे दुःख पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. मला असे वाटते की ते त्यांच्या संकल्पाचे पालन करतील, त्यांचे वैयक्तिक परिणाम काहीही असोत. खरंच, त्यांना  स्वतःची फारशी पर्वा नव्हती,”

फाशीनंतर, काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात नेहरूंनी अधिकृत ठराव मांडला, ज्याला मदन मोहन मालवीय यांनी दुजोरा दिला. या ठरावाने फाशीचा निषेध केला. त्यात लिहिले होते की, “ही तिहेरी फाशी केवळ सूडाची कृती आहे तसेच राष्ट्राच्या परिवर्तनाच्या सर्वसंमतीच्या मागणीची जाणीवपूर्वक अवहेलना आहे” असे  काँग्रेसचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.