भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (२४ मार्च) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीतील सर्वांत ठळक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. बॉलीवूड क्वीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या कंगनाला भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौतसह या यादीत कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय, प्रसिद्ध रामायण या मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि उद्योगपती व माजी काँग्रेस खासदार नवीन जिंदाल या नावांचाही समावेश आहे.

भाजपाने या यादीत १११ लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काही राजकीय निरीक्षकांचे सांगणे आहे की, कंगना रणौतने राजकारणात प्रवेश करणे किंवा तिला उमेदवारी जाहीर होणे, आश्चर्यकारक नाही. कारण- ती राजकारणात प्रवेश करील, हे जवळजवळ निश्चित होते. कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळणे निश्चित होते का? तिला लोकसभा उमेदवारी देण्यामागे भाजपाची भूमिका काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Ajit pawar
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट
Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
Loksatta Chavdi Happening In Maharashtra Politics News On Maharashtra Political Crisis
चावडी: ओ शेट.. भाषणबाजीच ग्रेट
Nagpur Lok Sabha Constituency decision to reject nomination of Adv Pankaj Shambharkar is upheld by High court
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’

लोकसभा उमेदवारी मिळताच कंगना रणौतची प्रतिक्रिया

मंडीमधून तिला नामांकन मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना, रणौतने ‘एक्स’वर लिहिले्, ”माझा प्रिय भारत देश आणि भारतीयांचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पार्टी यांचं मी नेहमीच समर्थन केलं आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मला माझी जन्मभूमी हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून उमेदवारी दिली आहे. मी पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाचं स्वागत करते. मी पक्षात सहभागी झाले, याचा मला अभिमान आणि आनंद आहे. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक असेन,” असे ती म्हणाली.

कंगना रणौतचा जन्म हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भांबला या गावात झाला. कंगनाने गेल्या दोन वर्षांत अनेकदा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले होते, ”तिला हिमाचलमधून निवडणूक लढवायची नाही. कारण- हिमाचलची लोकसंख्या केवळ ६० ते ७० लाख आहे. इथे कोणतीही गरिबी वा गुन्हा नाही. जर मी राजकारणात आले, तर मला असे राज्य हवे आहे; ज्यावर मी काम करू शकेन,” असे ट्विट तिने मार्च २०२१ मध्ये ‘एक्स’वर एका वापरकर्त्याला उत्तर देताना केले होते. हीच पहिली वेळ होती, जेव्हा कंगनाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते.

काँग्रेसशी जुना संबंध

कंगना रणौतचा राजकारणाशी जुना संबंध आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, तिचे पणजोबा सरजू सिंह रणौत हे काँग्रेसचे आमदार होते. तिचे वडील अमरदीप रणौत हे व्यापारी आहेत आणि तिची आई आशा रणौत शाळेत शिक्षिका होत्या, ज्या आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. तिचे कुटुंब काँग्रेससमर्थक असले तरी त्यांनी अलीकडच्या काळात आपली भूमिका बदलली असल्याचे पाहायला मिळाले आहे. कंगना रणौतने गेल्या महिन्यात सांगितले होते की, राजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ आहे. ‘टीव्ही ९ भारतवर्ष’च्या एका कार्यक्रमात बोलताना तिने सांगितले की, ती लोकसभा निवडणूक लढविणार की नाही, हे ठरविणे तिच्या हातात नाही.

राजकारणात येण्याचे पूर्वसंकेत

कंगना म्हणाली की, ती एक जागरूक व्यक्ती आहे आणि तिने देशासाठी इतरांच्या तुलनेत बरेच काही केले आहे. “मी चित्रपटाच्या सेटवरून राजकीय पक्षांशी अक्षरशः भांडली आहे. मला माझ्या देशासाठी जे करायचे आहे, त्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. पण, जर मला राजकारणात यायचे असेल, तर कदाचित हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते,” असे तिने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.

कंगना कायमच चालू घडामोडी, राजकीय मुद्दे यांवर आपली भूमिका मांडत आली आहे. तिची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. “मी नेहमीच राष्ट्राशी संबंधित विषयांवर आपली भूमिका मांडत आली आहे. या भूमिकेचा परिणाम माझ्या अभिनय कारकिर्दीवरही झाला आहे,” असे ती म्हणाली. गेल्या नोव्हेंबरमध्ये कंगनाने म्हटले होते की, जर श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, तर ती लोकसभा निवडणूक लढवील. गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराला भेट दिल्यानंतर तिने हे वक्तव्य केले.

ऑक्टोबर २०२२ मध्ये ती निवडणूक लढवील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. ‘आजतक कॉन्क्लेव्ह’मध्ये तिला तिच्या संभाव्य राजकीय प्रवेशाबद्दल विचारले असता, रणौतने सांगितले की, जनतेची इच्छा असल्यास ती मंडीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास तयार आहे. ती म्हणाली, “हिमाचल प्रदेशातील लोकांनी मला सेवा करण्याची संधी दिली, तर खूप चांगले होईल”. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या एक महिना अगोदर तिने हे वक्तव्य केले होते.

२०२२ च्या ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, रणौतने निवडणुकीत उतरावे, अशी इच्छा काही हिमाचली महिलांनी व्यक्त केली होती. त्यांचे सांगणे होते, ”ती सुंदर व धाडसी आहे आणि ती राज्याच्या राजकारणात बदल घडवून आणू शकते. परंतु, पुरुषांनी याला समर्थन देण्यास नकार दिला. स्थानिक लोकांचे म्हणणे होते की, ती लोकप्रिय असली तरी चांगली राजकारणी होऊ शकेल, असे नाही.”

भाजपाच्या समर्थनार्थ तिची भूमिका

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)सह विविध मुद्द्यांवर कंगना रणौत भाजपाला पाठिंबा देत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याची ती एकही संधी सोडत नाही. जानेवारीमध्ये इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले की, पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी, कृती त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते. कंगनाने पंतप्रधानांचा महापुरुष, असाही उल्लेख केला होता. सध्या कंगना तिच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या रिलीजची तयारी करीत आहे. या चित्रपटात तिने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक समारंभालाही तिने हजेरी लावली होती.

राम मंदिर ६०० वर्षांच्या संघर्षानंतर पूर्ण झाले, अशा शब्दांत तिने भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक केले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्वाचा वादग्रस्त कायदा लागू केल्यानंतर रणौतने ‘सीएए’ला पाठिंबा दर्शविला होता. या कायद्याबाबत पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ शेअर करताना तिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “सीएएबद्दल गैरसमज करून घेण्यापूर्वी, त्याचा अर्थ काय आहे, ते आधी समजून घ्या.”

हेही वाचा : विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्य आणि भाजपाचा पाठिंबा

२०२० मध्ये मुंबईवर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये कंगनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाने मोहीम सुरू केली होती. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके) केल्याने, अनेकांनी तिच्यावर टीका केली. काँग्रेसने रणौतवर भाजपाचा राजकीय अजेंडा चालवीत असल्याचाही आरोप केला होता. सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यावेळी कंगनाला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली होती. हिमाचलचे तत्कालीन मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही त्यांच्या मनाली येथील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अनेक वर्षांच्या पाठिंब्यानंतर रणौत आता अधिकृतपणे भाजपात सामील झाली आहे. ती दिलेली जबाबदारी पार पाडण्यात कितपत खरी उतरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.