Why China killed 2 billion sparrows: १९५८ साली आकाशातून चिमण्या खाली पडत होत्या… हे जगात इतरत्र कुठेही घडत नव्हते. हे फक्त चीनमध्ये घडत होते. या चिमण्या काही कोणत्याही नैसर्गिक कारणामुळे मरत नव्हत्या. तर, चिनी लोक गोफण किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी या चिमण्यांना मारत होते. ज्यांना चिमण्यांना मारायचे नव्हते, ते भांडी-कुंडी वाजवून आलेल्या चिमण्यांना उडवत होते, त्यामुळे त्या चिमण्यांना कुठेही थारा मिळत नव्हता. अनेक चिमण्या थकाव्यामुळे मरत होत्या. हे भयानक दृश्य ‘चार कीड मोहिमे’चा (Four Pests Campaign) भाग होते. माओ झेडोंग यांनी ही सार्वजनिक आरोग्य मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत माशा, डास, उंदीर आणि चिमण्या यांना लक्ष्य करण्यात आले होते. या मोहिमेचा हेतू फक्त किडींचा नायनाट करणे इतकाच होता की, निसर्गावर विजय मिळवण्याची मानवी महत्त्वाकांक्षा होती, याची चर्चा आजही सुरूच आहे.

चिमण्या आणि भयंकर दुष्काळाचा नेमका काय संबंध?

त्यावेळी झालेल्या चिमण्यांच्या नाशाचा संबंध चीनमध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळाशी (Great Chinese Famine) जोडला जातो. चिमण्या नष्ट झाल्याने धान्य पिकांवरील किडीचा एक महत्त्वाचा भक्षक नाहीसा झाला, त्यामुळे टोळधाड प्रचंड प्रमाणात वाढली आणि मोठ्या प्रमाणात पिकांच नुकसान झालं. तर इतर काही संशोधनाममध्ये चीनमध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळाचे मूळ तत्कालीन व्यवस्थापनामध्ये असल्याचे संगितले जाते.

४० दशलक्ष लोकांनी गमावले प्राण

त्याकाळात ग्रेट लीप फॉरवर्ड ही माओ यांनी सुरू केलेली मोहीम महत्त्वाची होती. ही खूप मोठी आणि महत्त्वाकांक्षी मोहीम होती. ‘जनता कम्यून’ म्हणजे मोठी सामूहिक गावे तयार करून चीनचा जड उद्योग खूप वेगाने वाढवायचा आणि शेती व उद्योग सामूहिक करायचे असा माओ यांचा हेतू होता. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आणि दुष्काळसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. या दुष्काळात सुमारे ४० दशलक्ष लोकांनी प्राण गमावले लागले होते.

Chinese poster reading "Exterminate The Four Pests", 1958 (विकिपीडिया)
Chinese poster reading “Exterminate The Four Pests”, 1958 (विकिपीडिया)

Four Pests Campaign

१९४९ साली चीनची सत्ता कम्युनिस्ट पक्षाच्या हाती गेली. त्याकाळात चिनी जनता सर्वत्र पसरलेल्या संसर्गजन्य आजारांशी झुंज देत होती. या संसर्गजन्य आजारांमुळे अनेकांचे मृत्यू झाले, तर अनेकजण अपंग झाले. या सार्वजनिक आरोग्य संकटाला आवर घालण्यासाठी माओ यांनी चार कीड मोहीम (Four Pests Campaign) सुरू केली, या मोहिमेचा उद्देश रोगवाहकांचा नाश करणे हा होता. विशेषतः डास, उंदीर आणि माशा यांचा नाश करणे हा हेतू होता. चौथी कीडवाहक म्हणून चिमणीलाही लक्ष्य करण्यात आले.

टोळधाडीने शेती गिळंकृत केली

चिमण्यांमुळे धान्य उत्पादनावर परिणाम होतो, असे त्यावेळी चीनमध्ये मानले जात होते. चिनी सरकारने नागरिकांना शक्य तितक्या चिमण्या पकडून मारण्याचे आदेश दिले. परिणामी शेकडो दशलक्ष चिमण्या मारल्या गेल्या. परिणामी त्या नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. परंतु, या सगळ्याचा भलताच परिणाम झाला. चिमण्या नष्ट झाल्याने टोळधाडीवर नियंत्रण ठेवणारा पक्षीच उरला नाही. टोळधाडीने धान्याची शेतेच्या शेते गिळंकृत केली. त्यामुळे कृषी उत्पादनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

1960, A poster used during the Four Pests Campaign
1960, A poster used during the Four Pests Campaign (विकिपीडिया)

महान सैनिक, पण विकासाची समज नव्हती

चिमण्या मारण्याची मोहीम हे दुष्काळासाठी एकमेव कारण नव्हते. तुम्ही निसर्गाला हात घालता तेव्हा काय घडू शकते याची प्रचिती आपल्याला या प्रसंगातून येते. ग्रेट लीप फॉरवर्डच्या काळात माओ यांनी अँटी-रायटिस्ट मोहिम सुरू केली. त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या विरोधाला जुमानले गेले नाही. किंबहुना चिमण्या मारल्यास शेतीचे उत्पादन घटेल, असा काही शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर आलेला दुष्काळ हा गुंतागुंतीचा कालखंड होता. निकृष्ट कृषी धोरणे, राजकीय दडपशाही आणि व्यवस्थापनातील त्रुटी अशी अनेक कारणे या दुष्काळामागे होती. “चीनचे लोक अनेकदा म्हणत की, माओ हे महान सैनिक होते, पण त्यांना विकासाची समज नव्हती,” असे Mao’s War Against Nature या पुस्तकाच्या लेखिका ज्यूडिथ शॅपिरो म्हणतात.

वरच्या आणि खालच्या पातळीवर घडवून आणलेली सामूहिक कृती चांगल्या हेतूने असू शकते, पण सम्राटच चुकीचा असेल तर काय करायचे? शॅपिरो यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तत्कालीन वैज्ञानिकांचा संदर्भ दिला आहे. आम्हाला माहीत होते, की हे चुकीचे आहे, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो, कारण आमच्यावरच टीका केली जात होती, असे मत तत्कालीन वैज्ञानिकांनी व्यक्त केले होते. दरम्यान, अवास्तव उत्पादन लक्ष्य पूर्ण करण्याच्या दबावाखाली तसेच ज्येष्ठ नेत्यांची कृपा मिळवण्यासाठी, “स्थानिक नेते किती धान्य उत्पादन होत आहे याबद्दल खोट बोलत होते,” असे शॅपिरो सांगतात.

…नंतर झुरळे आणि कुत्रेदेखील

ग्रामीण भागातील धान्य शहरी भागांना देण्यात येत होते. शिवाय आंतरराष्ट्रीय मित्रदेशांनाही पुरवण्यात आले होते. हेच दुष्काळाच्या मुळाशी होते, असे शॅपिरो सांगतात. दुष्काळाच्या बातम्या गुप्त ठेवल्या गेल्या. चिनी लोक ग्रामीण भागातील लोकांना काय सहन करावे लागते आहे, याबद्दल शहरवासीय पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यानंतर चीनने २००३ साली आलेल्या SARS साथीचा प्रतिकार करताना चार कीड मोहीम पुन्हा जिवंत केली. मात्र चिमण्यांच्या जागी आता झुरळं होती आणि कालांतराने त्यात कुत्र्यांचाही समावेश झाला…