scorecardresearch

विश्लेषण : भारतीय दूतावासाने भारतीयांना युक्रेन सोडण्याचा का दिला सल्ला?

युक्रेनमध्ये जवळपास २० हजारांहून जास्त संख्येत भारतीय असल्याची माहिती आहे.

(फोटो सौजन्य – AP)

रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या सीमेवर मोठ्या संख्येने रशियन सैन्य जमलेले आहे. शिवाय, युद्ध थांबवण्यासाठी झालेले प्रयत्न देखील निष्फळ ठरल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितलेले आहे. त्यानंतर आता युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ही येथील भारतीय दूतावासाने देखील एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली असून, त्यानुसार युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना, विशेषकरून विद्यार्थ्यांना तात्पुरता देश सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये जवळपास २० हजारांहून जास्त संख्येत भारतीय असल्याची माहिती आहे.

याचबरोबर भारतीय दूतावासाकडून हे देखील सांगितले आहे की, जर आवश्यकता नसेल तर विद्यार्थ्यांनी तिथे राहू नये. त्यांनी तत्काळ युक्रेन सोडून भारतात परतावे. तर, जे युक्रेनमध्ये रहाणार आहेत त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं दुतावासाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटलं आहे. युक्रेनमधील भारतीयांना त्यांच्या उपस्थितीबद्दलची माहिती देण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. जेणेकरून दूतावासातून त्यांच्याशी संपर्क साधता येईल. भारतीय दुतावास हा नेहमीप्रमाणे काम सुरु ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

भारतीय दूतावासाने का घेतला हा निर्णय?

रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करण्याची भीती आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाने जवळपास १ लाख ३० हजारांहून अधिक सैन्य जमवले आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेने देखील त्यांच्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिलेला आहे. शिवाय, रशियाने आक्रमण केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही अमेरिकेने दिलेला आहे. रशियाकडून युद्ध टाळण्याबाबतचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. या आधीच अमेरिकेसह अनेक देशांनी युक्रेनचा प्रवास टाळण्याच्या सूचना संबंधित देशांच्या नागरिकांना केल्या आहेत. अनेक देशांनी प्रवासी विमान सेवा देखील स्थगित केली आहे, तर अनेक देशांनी मार्ग बदलले आहेत. तेव्हा आता साऱ्या जगाचे लक्ष रशिया काय पावले उचलते याकडे लागलं आहे.

युक्रेनमध्ये भारतीयांची संख्या किती?

युक्रेनची राजधानी असलेल्या कीव येथील भारतीय दूतावासाने आपल्या अंदाजानुसार २०२० पासून सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी असल्याचे, म्हटले आहे. तर यूएनमधील भारतीय राजदूताकडून गेल्या महिन्यात ही संख्या २० हजार असल्याचे सांगितले गेले होते. या मधील बहुतांश विद्यार्थी हे तेथील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.

भारतीय दूतावासाच्या म्हणण्या मागचा नेमका अर्थ काय आहे?

युक्रेनमध्ये ज्यांची उपस्थिती आवश्यक नाही त्यांनी देश सोडावा, असे दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की कीव विमानतळ अजूनही कार्यरत असल्याने आणि युक्रेनमधून नियमित उड्डाणे सुरू असल्याने भारतीय नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. डच राष्ट्रीय ध्वजवाहक केएलएम ने कीवला जाणारी सर्व उड्डाणे थांबवली आणि सांगितले की, ते युक्रेनियन एअरस्पेसमध्ये काम करणार नाहीत. हे लक्षात घेऊन अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे, कारण याचा अर्थ युक्रेन सोडून जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी कदाचित लवकरच मार्ग देखील कमी उरू शकतात. आतापर्यंत, भारतीय दूतावास युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची माहिती गोळा करत आहे. काही आठवड्यांपूर्वी प्रसारित केलेल्या गुगल फॉर्मद्वारे भारतीयांना भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करण्यास सांगितले गेले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why did indian embassy issue advisory for indians to leave ukraine msr

ताज्या बातम्या