Gold prices are rising इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा आज सोन्याचा भाव वायदा भाव प्रति औंस ४,००७ अमेरिकी डॉलरपर्यंत वाढल्याचे दिसून आले. सोन्याने ४,००० डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आठवड्यात किमती ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. बुधवारी (८ ऑक्टोबर) भारतात दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख २१ हजार रुपयांहून अधिक झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किंमतींने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. भारतात सणासुदीला, लग्नाच्या काळात सोन्याची मागणी वाढते. त्यामुळे सोन्याच्या दारात आणखी वाढ होणार का? असा प्रश्न ग्राहकांना, गुंतवणूकदारांना सतावत आहे. सोन्याच्या किंमती का वाढत आहेत? पाच वर्षांत सोने दोन लाखांवर पोहोचणार का? सोने खरेदी करावे की नाही? याविषयी सविस्तर समजून घेऊयात…

गेल्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किंमतींने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

सोन्याच्या दरात वाढ

सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत बाबी कारणीभूत आहेत. अमेरिकेतील सध्या सुरू असलेल्या सरकारी कामकाजाच्या बंदीने (U.S. government shutdown) बाजारात अनिश्चितता निर्माण केली आहे. त्याच वेळी, फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. ‘यूएस फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात कपात केली तर गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वळतो. अधिक लोक सोन्यात गुंतवणूक कारत असल्यानेदेखील सोन्याच्या किंमती वाढतात.

यात जागतिक तणावदेखील कारणीभूत आहे. फ्रान्स आणि जपानमधील राजकीय अशांतता, तसेच रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या सततच्या संघर्षांमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. चीनच्या पीपल्स बँक (People’s Bank of China) सारख्या मध्यवर्ती बँका मोठ्या सोने खरेदी करत आहेत, ज्यामुळे किमती आणखी वाढत आहेत.

विश्लेषक इशारा देतात की, सोन्यामध्ये अल्पावधीत अस्थिरता दिसू शकते. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) सारखे तांत्रिक निर्देशक दर्शवतात की, सोन्याच्या किंमती एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यावर सोन्याच्या दारात किरकोळ घट होऊ शकते. आर्थिक अस्थिरता, भू-राजकीय धोके आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी यामुळे सोन्याचे भाव २०२५ पर्यंत उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. कमकुवत झालेला अमेरिकन डॉलर परदेशी खरेदीदारांसाठी सोने स्वस्त करतो, ज्यामुळे मागणी आणखी वाढते. वित्तीय संस्था सोन्याच्या व्यापाराच्या प्रमाणात वाढ नोंदवत आहेत. ४,००० डॉलर्सचा टप्पा ओलांडणे हा गुंतवणूक जगात एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

सोन्याच्या दरात वाढ होण्याची कारणे काय?

सोन्याच्या सध्याच्या तेजीमागे आर्थिक, भू-राजकीय आणि धोरणात्मक घटक कारणीभूत ठरत आहे. अमेरिकेतील सरकारी कामकाजाच्या बंदीमुळे आर्थिक अनिश्चितता वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. त्याच वेळी, फेडरल रिझर्व्हने संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने बाँड्स आणि बचत खात्यांसारख्या उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक मालमत्तांचे आकर्षण कमी झाले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.

फ्रान्स आणि जपानमधील अशांतता आणि रशिया-युक्रेन संघर्ष यांसारख्या जागतिक तणावामुळे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी अधिक वाढली आहे. मध्यवर्ती बँका, विशेषतः चीनची पीपल्स बँकदेखील त्यांचे सोन्याचे साठे वाढवत आहेत, ज्यामुळे किंमतीत आणखीनच वाढ होत आहे. चीनची मध्यवर्ती बँक पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी), सलग ११ महिन्यांपासून सोने खरेदी करत आहे. सप्टेंबरमध्येच, पीबीओसीने सुमारे १.२४ टन सोने खरेदी केले, ज्यामुळे तिचा एकूण सोन्याचा साठा अंदाजे २,३०३.५ टन झाला आहे.

नोव्हेंबर २०२४ पासून चीनने सुमारे ३९.२ टन सोने जमा केले आहे. २०२५ मध्ये आत्तापर्यंत पीबीओसीने सुमारे २२.७ टन खरेदी केली आहे. चीनच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे मूल्य जवळपास ३६९ अब्ज डॉलर्स झाले आहे, जे एकूण साठ्याच्या ७.७ टक्के आहे. भारताच्या मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) सोने खरेदी चीनच्या तुलनेत लहान प्रमाणात असली तरी तीदेखील लक्षणीय आहे. आरबीआय वैविध्यीकरण आणि महागाईपासून बचाव करण्याच्या धोरणांचा भाग म्हणून सातत्याने सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहे. अलीकडील खरेदीचे अचूक आकडे कमी वेळा जाहीर केले जातात, परंतु २०२५ च्या मध्यापर्यंत आरबीआयचा सोन्याचा साठा सुमारे ७७० टन आहे. भारताच्या सोन्याच्या साठ्याची पातळी आशियामध्ये चीन आणि अमेरिकेनंतर, जागतिक स्तरावर उच्च धारकांमध्ये आहे.

पुढील १२-१८ महिन्यांसाठी सोन्यात तेजीचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामध्ये नफ्याच्या संधी आहेत परंतु किमती कमी होण्याचा धोकाही आहे. सोने खरेदी करायचे असल्यास गुंतवणूकदारांनी सोन्याच्या भविष्यातील किमतीच्या मार्गाचे मूल्यांकन करून आर्थिक धोरण, महागाईचे कल, मध्यवर्ती बँकांचे निर्णय आणि भू-राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

सोन्याचा भाव पाच वर्षांत दोन लाखांवर?

ट्रेडेजिनीचे सीओओ त्रिवेश डी म्हणतात की, भारतात ईटीएफ स्वरूपात सोन्याची मागणी वाढल्याने पुढील काही वर्षांत सोन्याची मागणी आणखी वाढेल. त्रिवेश यांच्या मते पुढील ५ वर्षांसाठी, सोन्याच्या दरातील वाढ विविध देशांतर्गत तसेच जागतिक घटकांवर अवलंबून असेल. “पुढील पाच वर्षांमध्ये, पुरवठ्याचे गतिशील स्वरूप, जागतिक कर्जाची पातळी आणि चीन व भारतासारखे देश त्यांचे साठे कसे व्यवस्थापित करतात या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतील. याव्यतिरिक्त, युद्धे असोत वा व्यापारी संघर्ष, कोणताही मोठा भू-राजकीय धक्क्यामुळे सोन्याच्या किंमतीत बदल होईल,” असे ते सांगतात.

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेडमधील मनीष शर्मा म्हणतात की, पुढील ५ वर्षांत सोन्याच्या किमतीतील वाढ भू-राजकीय घटकांवर अवलंबून आहे. “अमेरिकेची अर्थव्यवस्था पुढील १-२ वर्षांत एकतर मंदीच्या टप्प्यात किंवा चलनवाढ-मंदीच्या परिस्थितीत प्रवेश करेल, ज्यामुळे असुरक्षिततेचा काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतील.”

ते पुढे म्हणतात की, सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे इतर घटक म्हणजे कमी व्याजदरांचे वातावरण. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतील. येत्या काही वर्षांत जागतिक एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) प्रवाह, विशेषतः अमेरिकेकडून येणारा प्रवाह सुरू राहील. त्यांच्या अंदाजानुसार, सोन्याचा भाव १ वर्षात प्रति १० ग्रॅम १.२० लाख आणि ५ वर्षांत १.७ लाख पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.