Mussoorie hotel registration हिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर असलेले मसुरी नैसर्गिक सौंदर्यांनी वेढलेले आहे. या भागात मसुरीला ‘पहाडो की राणी’ असे म्हणतात. हे थंड हवेचे ठिकाण त्याच्या विलोभनीय सौंदर्यासाठी ओळखले जाते. मसुरी अनेकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. आता मसुरीतील हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि होमस्टेच्या मालकांना आता पर्यटकांची नोंदणी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या एका इंटरनेट पोर्टलवर करावी लागेल. यामागील नेमकं कारण काय? सरकारी पोर्टलवर पर्यटकांची नोंद करण्यामागील उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

पर्यटकांची सरकारी पोर्टलवर नोंदणी

मसुरीतील हॉटेल्सना आता पर्यटकांची नोंदणी सरकारी पोर्टलवर करावी लागणार आहे. यामागील कारण म्हणजे या भागाच्या नाजूक परीसंस्थेला (ecology) नुकसान पोहोचू नये आणि वहन क्षमता मर्यादेपलीकडे जाऊ नये म्हणून. वहन क्षमता म्हणजेच नैसर्गिक संसाधनांची गुणवत्ता कमी न करता किंवा पर्यावरणाची मोठी हानी न करता, एखादी परिसंस्था किंवा विशिष्ट क्षेत्र किती लोकांना आधार देऊ शकते, याची कमाल मर्यादा.

हा आदेश नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (एनजीटी) ने नेमलेल्या समितीने २०२३ च्या अहवालात केलेल्या १९ प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपायांचा एक भाग म्हणून लागू करण्यात आला आहे. या उपायांचा उद्देश हिमालयात वसलेल्या या लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे. ८ मे रोजी, ट्रिब्युनलकडून राज्य सरकारने या अहवालावर केलेल्या कार्यवाहीची दखल घेण्यात आली आणि या उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देश दिले.

काय असेल नोंदणीची प्रक्रिया?

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (एनजीटी) ने नेमलेल्या समितीने २०२३ च्या अहवालात म्हटले होते, “पर्यटकांची नोंदणी परिसराच्या वहन क्षमतेनुसार, विशेषतः उपलब्ध पार्किंगची जागा आणि गेस्ट रूम्सची संख्या लक्षात घेऊन केली पाहिजे. मसुरी परिसरात येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क आकारले जाऊ शकते आणि हे पैसे कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी वापरले जाऊ शकतात.”

काही काळ हा निर्णय प्रलंबित ठेवल्यानंतर, राज्य पर्यटन विभागाने बुधवारी पर्यटकांच्या नोंदणीसाठी चाचण्या सुरू केल्या. ही शिफारस अहवालातील इतर १९ शिफारसींपैकी एक होती. जिल्हा पर्यटन विकास अधिकारी ब्रिजेंद्र पांडे यांनी सांगितले की, हॉटेल्स आणि होमस्टेच्या मालकांना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशाची माहिती देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पांडे म्हणाले, “आम्ही मॅनेजर्स आणि मालकांना त्यांच्या युनिट्सची सिस्टीममध्ये नोंदणी कशी करायची आणि पर्यटकांची माहिती कशी भरायची याचा थेट डेमो दिला. पर्यटक चेक-इन करतील तेव्हा ही नोंदणी त्याच वेळी केली जाईल.”

मसुरीवर वाढता पर्यटनाचा भार

दिल्लीपासून सुमारे ३२० किलोमीटर अंतरावर असलेले आणि रस्ते व रेल्वेने डेहराडूनपर्यंत जोडलेल्या मसुरीमध्ये पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. १९५८ मध्ये दरवर्षी या ठिकाणी अंदाजे १.५ लाख पर्यटक भेट द्यायचे. १९६६ मध्ये ही संख्या तीन लाखांवर पोहोचली आणि २००० पर्यंत ही संख्या वाढून ८.५ लाख झाली. कोविड-१९ महामारीच्या आधी म्हणजेच २०१९ मध्ये, ३० लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी मसुरीला भेट दिली होती. पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे मसुरीच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडला आहे. २०२३ पर्यंत या भागात नोंदणीकृत निवासस्थानांमध्ये ३०३ हॉटेल्स, २०१ होमस्टे आणि सहा धर्मशाळा होत्या. सार्वजनिक आणि खाजगी पार्किंग मिळून फक्त १,२४० वाहनांसाठी जागा होती. मुख्य म्हणजे समितीने २०२३ मध्ये सुचवले होते की, पर्यटक वाहनांची संख्या या मर्यादेपर्यंतच असावी.

मसुरी समुद्रसपाटीपासून २००५ मीटर उंचीवर, गढवाल हिमालयाच्या पायथ्याशी आणि भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय असलेल्या सिस्मिक झोन IV मध्ये येते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२०११ च्या जनगणनेनुसार, मसुरीची रहिवासी लोकसंख्या ३०,११८ होती. २०२३ च्या अहवालानुसार, २०३७ पर्यंत ही संख्या २३ टक्के आणि २०५२ पर्यंत ५२ टक्के वाढण्याची शक्यता आहे. मसुरीमध्ये आधीच पाण्याची कमतरता आहे. मसुरी नगरपालिकेच्या सहा पंपिंग स्टेशन्स आणि सहा पाण्याच्या स्रोतांद्वारे दररोज ७.७९ दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. त्याव्यतिरिक्त मसुरीला यमुना पाणीपुरवठा योजनेचीही मदत घ्यावी लागते.

डोंगराळ प्रदेशाची नाजूक परिसंस्था

मसुरी समुद्रसपाटीपासून २००५ मीटर उंचीवर, गढवाल हिमालयाच्या पायथ्याशी आणि भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय असलेल्या सिस्मिक झोन IV मध्ये येते. २००७ च्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढला गेला होता की, इथले भेगा असलेले, तुटलेले आणि झिजलेले कार्बोनेट खडक, तीव्र उतार आणि त्यात मुरणारे जास्त पाणी या सर्व बाबींमुळे या परिसरात भूस्खलनासाठी परिस्थिती निर्माण होते. या भागात अनेक इमारती ४० अंशांपेक्षा जास्त तीव्र उतारांवर उभ्या आहेत आणि अनेक इमारतींची उंची उत्तराखंड बिल्डिंग बाय-लॉज अँड रेग्युलेशन, २००१ नुसार परवानगी असलेल्या १२ मीटरपेक्षा जास्त आहे.

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने यापूर्वी २००१ मध्ये लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनच्या मसुरीच्या वहन क्षमतेवरील अहवालाचा उल्लेख केला होता. त्या अहवालात असे म्हटले होते की, इथे आता कोणतीही नवीन बांधकामे शक्य नाहीत. डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीमधील ‘सायंटिस्ट एफ’ डॉ. विक्रम गुप्ता यांनीही या निष्कर्षाला पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते की, मसुरीतील चुनखडक मायक्रोक्रेक्समुळे (सूक्ष्म भेगांमुळे) कमकुवत झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ मध्ये जोशीमठ येथील भूस्खलनाच्या घटनेनंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने मसुरी आणि आसपासच्या भागांनाही असेच धोक्याचे इशारे दिले होते. ते म्हणाले होते, “जास्त सिमेंट काँक्रिटीकरणामुळे भूस्खलन होते. मसुरीच्या खालील एक बोगदा धोकादायक आहे. डेहराडून ते मसुरी प्रस्तावित रोपवेदेखील धोकादायक आहे. रोपवे आणि बोगद्यामुळे जोशीमठला हानी पोहोचली आहे. वाहतूक कोंडीमुळे डोंगरावरील रस्त्यांवर ताण वाढतो. जास्त बांधकाम मसुरीच्या क्षमतेपलीकडचे आहे.