India has withdrawal in Tajikistan Ayni Air Base : भारताने ताजिकिस्तानमधील ‘अयनी’ हवाई तळ अखेर रिकामा करण्याचा निर्णय घेतला. २००२ पासून या तळाला चालवण्यासाठी भारताकडून मदत केली जात होती. भारतीय लष्करी कारवायांसाठी हा हवाई तळ एक महत्त्वाचा मानला जात होता. जवळपास २२ वर्षे या हवाई तळावर भारतीय सैन्यदलाचे नियंत्रण होते. या तळामुळे मध्य आशियामध्ये भारताला आपले महत्त्वाचे स्थान निर्माण करता आले. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा तळ सोव्हिएत संघाच्या काळात उभारला गेला होता. दरम्यान, भारतीय सैन्यदलाने अयनी हवाई तळ रिकामा करण्याचा निर्णय का घेतला? नेमकी काय आहेत त्यामागची कारणे? त्याचाच हा आढावा…
२००२ मध्ये झाला होता करार
मिळालेल्या माहितीनुसार, अयनी हवाई तळ चालवण्यासाठी भारत आणि ताजिकिस्तानमध्ये २००२ साली द्विपक्षीय करार झाला होता. हा करार २०२२ मध्ये संपुष्टात आल्यानंतर ताजिकिस्तानने त्याचा कालावधी वाढवून देण्यास नकार दिला, त्यामुळेच भारताला येथून माघार घ्यावी लागली आहे. या हवाई तळाचे भौगोलिक स्थान पाहता पाकिस्तानवर प्रभाव ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. या ठिकाणामुळे भारताला पाकिस्तानवर दबाव ठेवता येत होता. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा प्रभाव वाढत असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतासाठी हे एक महत्त्वाचे स्थान होते. आता या तळावरून माघार घेतल्यामुळे मध्य आशियातील भारताच्या लष्करी उपस्थितीबद्दल नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. आयनी हवाई तळावर भारताकडून हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स, दुरुस्ती सुविधा आणि देखभाल यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या.
ताजिकिस्तानवर चीन आणि रशियाचा दबाव
करार संपुष्टात आल्यानंतर भारताने या तळावरील आपले सैन्य आणि इतर उपकरणे मागे घेतल्याची माहिती आहे. भारत आणि ताजिकिस्तान सरकारमधील या हवाई तळाच्या विकास आणि संयुक्त ऑपरेशन्ससाठीचा करार चार वर्षांपूर्वीच संपुष्टात आला होता, अशी माहिती पीटीआयला संबंधित सूत्रांनी दिली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर या तळाचे भारतासाठी असलेले महत्त्व कमी झाले. ताजिकिस्तानने करार न वाढवण्यामागे रशिया आणि चीनचा दबाव असल्याचे सांगितले जाते. या दोन देशांनी हवाई तळावर गैर-प्रादेशिक लष्कराच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. भारताच्या माघारीनंतर रशियन सैन्याने या तळाचा ताबा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडीनंतरही भारत या प्रदेशात आपली उपस्थिती कायम ठेवणार असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
आणखी वाचा : Rohit Arya : १७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण होता? त्याने सरकारवर काय आरोप केले होते?
अयनी हवाई तळ भारताकडे कसा आला होता?
भारताने ताजिकिस्तानमधील अयनी हवाई तळ सुमारे २५ वर्षे चालवला. २००२ मध्ये भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार या तळाचा विकास आणि संचालन भारताने हाती घेतले होते. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेच्या पश्चिमेस असलेला हा हवाई तळ मुळात सोव्हिएत संघाच्या काळात उभारला गेला होता. मात्र, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तो पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत पडला होता. २००१ साली भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तळाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रकल्पाला तत्कालीन भारतीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा जोरदार पाठिंबा होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि माजी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनीदेखील या हवाई तळाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हवाई तळासाठी भारताने किती खर्च केला होता?
भारत सरकारने सीमा रस्ते संघटना आणि एका खासगी ठेकेदाराच्या मदतीने हा तळ पुन्हा बांधला. एका अहवालानुसार या तळाच्या विकासासाठी आणि आधुनिकीकरणासाठी भारताला सुमारे १० कोटी अमेरिकन डॉलर (सुमारे ₹८३० कोटी रुपये) खर्च आला. काही वर्षांपूर्वी भारताने या हवाई तळावर अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स तात्पुरते तैनात केली होती, असे अहवाल सांगतात. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे सुमारे २०० जवान या तळावर तैनात होते. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारताने तिथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना याच हवाई तळाच्या माध्यमातून मायदेशी परत आणले होते.
भारतासाठी हा हवाई तळ महत्त्वाचा का होता?
अयनी हवाई तळावरील नियंत्रणामुळे मध्य आशियात भारताला मोठी लष्करी आणि भू-राजकीय ताकद मिळत होती. हे हवाई तळ पुन्हा उभारण्याचा भारताचा मुख्य उद्देश अफगाणिस्तानमधील तत्कालीन उत्तरी आघाडीला पाठिंबा देणे हा होता. अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी तालिबानशी लढणारी प्रमुख लष्करी संघटना होती. १९९० च्या दशकात भारताने ताजिकिस्तानच्या फरखोर शहरात एक रुग्णालय चालवले होते, जिथे २००१ मध्ये आत्मघाती हल्ल्यात जखमी झालेल्या मसूद यांच्यावर उपचार करण्यात आले होते. हा तळ अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरपासून फक्त २० किमी अंतरावर आहे, ज्याची सीमा पाकव्याप्त काश्मीरशी जोडलेली आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार, अयनी हवाई तळावरून भारतीय सैन्यदल पाकिस्तानच्या पेशावर शहराला लक्ष्य करू शकत होते. परिणामी, युद्धकाळात पाकिस्तानवर मोठा दबाव येत होता. या हवाई तळाने भारताला मध्य आशियातील आपला प्रभाव वाढविण्यात मोठी मदत केली आहे. भारतीय सैन्यदलाने हा तळ रिकामा करण्याचा निर्णय घेतल्याने या भागात रशिया आणि चीनचा प्रभाव वाढू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.