जगातील तिसरी सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या इंडोनेशियात सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (१४ फेब्रुवारी) मतदान पार पडले. इंडोनेशियातील २०.४ कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. इंडोनेशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आहेत; ज्यांना जोकोवी म्हणूनही ओळखले जाते. जोकोवी दोनदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे यंदाची निवडणूक एका दशकाच्या नेतृत्वात बदल घडवेल, असे सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. त्यात माजी जनरल प्रबोवो सुबियांतो यांचे नाव आघाडीवर आहे. २०१४ व २०१९ मध्ये सुबियांतो यांचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोकोवी यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी जकार्ताचे माजी राज्यपाल अनिस बास्वेडन व मध्य जावाचे माजी राज्यपाल गंजर प्रणोवो या दोघांच्या नावांचाही समावेश आहे.

इंडोनेशियातील २७ कोटी लोकसंख्येपैकी २४ कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. इंडोनेशियात निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होणार असल्याचे इंडोनेशियाच्या सार्वत्रिक निवडणूक आयोगाचे म्हणणे होते. इंडोनेशियामध्ये १८ राष्ट्रीय पक्ष आहेत. संसदेत ५७५ इतकी सदस्यसंख्या आहे. नवीन राष्ट्राध्यक्ष निवडण्याबरोबरच इंडोनेशियन नागरिकांनी राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय स्तरावरील खासदारांसाठीही मतदान केले. ही निवडणूक जगातील सर्वांत मोठी एकदिवसीय निवडणूक ठरली. इंडोनेशियात कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ या दोन्ही शाखा कायदा बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणताही कायदा किंवा निर्णय पारित करण्यासाठी दोन्ही शाखांची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे येथे राष्ट्राध्यक्ष निवडण्याबरोबरच खासदार निवडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

इंडोनेशियातील महत्त्वाचे पक्ष

इंडोनेशियन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ स्ट्रगल (पीडीपी-पी) या पक्षाचे संसदेत सध्या नऊ सदस्य असून, इंडोनेशियातील हा सर्वांत मोठा पक्ष आहे. २०१९ मधील शेवटच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून इंडोनेशियन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ स्ट्रगल या पक्षाची लोकप्रियता कमी झाली आहे. या पक्षातील राष्ट्रपती पदाचे उमेदवार गंजर प्रणोवो हे सर्वेक्षणांमधील निकालात पिछाडीवर आहेत. दुसरा पक्ष म्हणजे ग्रेट इंडोनेशिया मूव्हमेंट पार्टी, गेरिंद्रा. हा पक्ष सर्वेक्षणानुसार आघाडीवर असलेल्या प्रबोवो सुबियांतो यांचा आहे. पक्षाला निवडणुकीत १७ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. तिसरे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार अनिस बास्वेडन यांनाही इंडोनेशियन जनतेचा पाठिंबा मिळत आहे.

इंडोनेशियात एकूण १८ पक्ष निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीत इंडोनेशिया सॉलिडॅरिटी पार्टी (पीएसआय) पक्ष नव्या रूपात दिसत आहे. या पक्षाचे नेतृत्व विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांचा मुलगा करीत आहे. राष्ट्रीय संसदेत प्रतिनिधित्वास पात्र ठरण्यासाठी पक्षांना देशभरातील किमान चार टक्के मतांची आवश्यकता असते; तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे नामनिर्देशन करण्यासाठी संसदेत पक्षाने किंवा पक्षांच्या युतीने संसदेत किमान २० टक्के जागा मिळविणे आवश्यक असते.

राष्ट्रपतींना संसदीय समर्थनाची हमी असते का?

नवे राष्ट्राध्यक्ष किती यशस्वी होऊ शकतील? हे ठरविण्यात संसदेचा मोठा वाटा असतो. राष्ट्राध्यक्षांच्या धोरणाला विरोध करून किंवा समर्थन देण्यास टाळाटाळ करून, विरोधी पक्ष ही प्रक्रिया गुंतागुंतीची करू शकतात. विद्यमान राष्ट्राध्यक्ष विडोडो इंडोनेशियातील प्रमुख पक्षांसोबत युती करण्यात यशस्वी झाले. त्यामुळेच विडोडो यांना त्यांच्या धोरणांनुसार पुढे काम करता आले.

इंडोनेशियातील निवडणूक जगासाठी महत्त्वाची का?

इंडोनेशिया एक उदयोन्मुख राष्ट्र आहे. गेल्या वर्षी अमेरिकन वृत्तसंस्था ‘फॉरेन पॉलिसी’ने इंडोनेशियाला जागतिक राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या सहा स्विंग स्टेट्सपैकी एक म्हटले आहे. त्यासह ‘डिप्लोमॅट’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२७ पर्यंत इंडोनेशियाची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर येण्याची अपेक्षा आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराचे देशाच्या प्रगतीसाठी वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार प्रबोवो यांनी राजकीयदृष्ट्या प्रत्येक देशाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे वचन दिले आहे. गंजर यांनी आंतरराष्ट्रीय घडमोडींना आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे; तर अनिस यांनी, इंडोनेशियाने जागतिक स्तरावरील विषयांवर निर्णायक भूमिका घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केल्याचे ‘द डिप्लोमॅटच्या’ वृत्तात दिले आहे.

हेही वाचा : बहुमत चाचणी म्हणजे काय? नितीश कुमारांना बहुमत चाचणी का द्यावी लागली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष आणि अमेरिका-चीन यांच्यातील भूराजकीय शत्रुत्व या प्रश्नांबाबत सध्या राष्ट्रपती या पदासाठी इच्छुक असलेल्या तिन्ही नेत्यांची भूमिका सारखी आहे. तिघेही पॅलेस्टाईन राष्ट्राच्या बाजूने आहेत. अमेरिका-चीन यांच्यातील शत्रुत्वाच्या विषयात तिघांपैकी कोणीही एका देशाची बाजू घेतली नाही. चीनशी काही मुद्द्यांच्या बाबतीत तिघांचेही विचार वेगळे आहेत. परंतु, असे असले तरीही दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याकडे त्यांचा कल आहे.