चीनच्या वाहन निर्मिती कंपन्यांना युरोपियन बाजारपेठ काबीज करायची आहे. म्हणजे जर्मनीतील म्युनिच शहरात नुकत्याच पार पडलेल्या बड्या मोटार प्रदर्शनात जर्मनीच्या बीएमडब्ल्यू कंपनीने त्यांची विजेवर धावणारी आयएक्सथ्री एसयू्व्ही मोठ्या थाटात सादर केली. शिवाय, याच देशाच्या मर्सिडिज बेंझ कंपनीने नव्याने सादर केलेल्या जीएलसी या आणखी एका एसयू्व्हीचा समावेश होता. परंतु जर्मनीच्या इतिहासात ऊर भरून येईल अशी कामगिरी बजावणाऱ्या या कंपन्यांच्या डौलाकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. चीनच्या तीन ताज्या दमाच्या कंपन्यांच्या कार भाव खाऊन गेल्या. तरीही चीनचे दुखणे भलतेच आहे. प्रचंड संख्येने मोटारी उत्पादित केल्यानंतर आता त्यांच्याकडे ग्राहकच फिरकेनासे झालेत. 

चीनमधील ईव्ही कारची निर्मिती उच्चांकी का?

बीवायडी, क्ष्पेंग, शांगन अँड डोंगफेंग या चिनी वाहन कंपन्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भारित कारनी जगभरात नाव कमावलेल्या बीएमडब्ल्यू व बेंझ कंपन्यांच्या उत्पादनांना झाकोळून टाकले. त्याच वेळी युरोपीय देश हे आपल्या निर्यातीचे प्रमुख केंद्र असेल व त्यासाठी आम्ही आमचे विस्तारवादी धोरण राबवणार असल्याचे तिन्ही चिनी कंपन्यांनी जाहीर करून टाकले. परंतु, चीनने घेऊ इच्छिलेली ही मोठी उडी कितपत लांब पडेल, हे पाहण्याआधी त्यांच्या घरातील स्थिती पाहावी लागेल. चिनी वाहन कंपन्यांचे घरचे झाले थोडे…अशीच स्थिती आहे. म्हणजे कमी किमतीत कार उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात गेली दोन वर्षे या कंपन्यांनी स्वतःचे देशांतर्गत उत्पन्न मर्यादेच्या पलीकडे वाढवले आहे. याला चिनी सरकारच जबाबदार आहे. ईव्ही अर्थात विजेवर चालणाऱ्या गाड्या तयार करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पोषक वातावरणाचा घोडा चीन सरकारनेच तयार केला. सरकारनेच या कंपन्यांना घोड्यावर बसवले आणि घोड्याला धावतेही केले. आता या घोड्यावर बसलेल्या कंपन्यांची धावेची दिशा युरोप आहे आणि कारकंपन्या आता या घोड्यावरून उतरण्यास तयार नाहीत. 

युरोपिय बाजारपेठांमध्ये धुमाकूळ

युरोपीय बाजारपेठांत चिनी ईव्ही कार कंपन्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. कारण १५ वर्षांपूर्वीच सरकारच्या हे लक्षात आले होते, की पेट्रोलसारख्या पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या कार तयार करण्याची चिनी कंपन्यांची ताकद नाही. उलट, अत्यंत वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत बाजारपेठेत ईव्ही कार खपल्या जातील. त्यासाठी प्रमुख अनुदाने व इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला की पुरे. गेल्या वर्षभरात देशात डझनभर कंपन्यांनी ईव्ही कार निर्मितीत गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, ईव्ही कारचा खप ६० टक्क्यांच्या आसपास असेल.

नफ्याचे गणित डळमळीत

कार उत्पादन काही प्रमाणात आटोक्यात असले तरी चीनमध्ये सुमारे १३० हून अधिक कंपन्यांना खपाच्या लढाईत गुंतल्या आहेत. कार उत्पादन वर्षभरासाठी पूर्ण क्षमतेने सुरू ठेवल्यास चीनमधील खरेदीदारांच्या दुप्पट ईव्ही कार बाजारात आलेल्या असतील. क्षमतेहून अधिक उत्पादन झाल्याने चीनमध्ये क्रूर किंमत युद्धाला तोंड फुटले आहे. गेल्या दोन वर्षांत कारच्या सरासरी किमतींमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली आहे. काही कंपन्यांच्या मॉडेलच्या किमतीत ३५ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. खप कायम आहे. म्हणजे त्यात सात टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजे कार खपाचा आकडा २४ दशलक्ष इतका गृहित धरला तरी कंपन्यांचा नफा एकतर डळमळीत झालेला असेल किंवा तोटा वाढलेला असेल. २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत वाहन क्षेत्राच्या एकूण नफ्यात १२ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. राष्ट्रीय सांख्यिकी विभागानुसार, वाहन उद्योग क्षेत्राची वार्षिक घट ही १७८ अब्ज युआन इतकी आहे. यात चीनमधील यशस्वी कंपन्यांनाही याची झळ पोहोचली आहे. बीवायडी या आघाडीच्या कार निर्मिती कंपनीची दुसऱ्या तिमाहीत महसुलात १४ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी निव्वळ नफ्यातील घट ही ३० टक्के इतकी होती. यात पुरवठादारांनाही नुकसान सोसावे लागले आहे. म्हणजे काही कार कंपन्यांकडून सहा महिने उलटून गेल्यानंतरही देयके न आल्याने काही पुरवठादारांना स्वतःच्या दुकानांना टाळे ठोकावे लागले आहेत.

चीन कार कंपन्या दुष्टचक्रात का?

ईव्ही कार उत्पादनात चीनच्या वेगाने धावताना अनेक परदेशी कंपन्यांची आधीच दमछाक होत आहे. त्यात आर्थिक गणिते नव्याने जुळवावी लागत आहेत. चीनच्या ऑटोमोबाइल म्यॅन्युफॅक्चरर्स संघटनेच्या माहितीनुसार, कधी काळी परदेशी कंपन्यांनी इथल्या बाजारावर अधिराज्य गाजवले होते. मात्र, २०२०मध्ये चिनी कंपन्यांचा ३४ टक्के इतका वाटा २०२५च्या पहिल्या चार महिन्यांत ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. यात परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आणि नफा यांचे गणित पुरते कोलमडले असून यूबीएस या बँकेने चिनी कंपन्यांशी किमतीच्या युद्धात परदेशी कंपन्या टिकू शकणार नसल्याचे नमूद केले आहे. किंमत कमी करण्यावर कंपन्यांमध्ये लागलेली चुरस ही चीन सरकारची चिंता वाढवणारी ठरत आहे. म्हणजे गेल्या मे मध्ये बीवायडी कंपनीने किंमत कमी केल्याने मोठ्या प्रमाणावर सवलती द्याव्या लागल्या. यावरून सरकारला काही आव्हानांना सामोरे जावे लागले. काही कंपन्यांनी सरकारी प्रसारमाध्यमांद्वारे सरकारकडे किमतीवरून तक्रारी केल्या. किमतीबाबच्या अत्यंत तीव्र स्पर्धा उद्योगाला बाधा ठरणारी असल्याचे त्यात काही कंपन्यांनी म्हटले होते. त्यानंतर कार कंपन्यांना सरकारने समन्स बजावले होते. त्यात त्यांना पुरवठादारांची देयक ६० दिवसांत तरी अदा करण्याबाबत विनंती केली होती. तरीही अद्याप किमती कमी करण्याचा निर्णय थांबविण्याचा निर्णय कोणत्याही कंपनी घेतलेला नाही. चीनमधील युरोपियन कंपन्यांनी हा प्रकार पुढे काही दिवस असाच कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.