Indian Air Force Jaguar crash राजस्थानच्या चुरू येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान जॅग्वार कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातावेळी दोन वैमानिक विमानात उपस्थित होते. या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात दिली आहे. या वर्षी जॅग्वार विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची ही तिसरी घटना आहे. पहिला अपघात ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे झाला होता आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर येथे झाला. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी १९६० च्या दशकात संयुक्तरीत्या विकसित केलेली ही लढाऊ विमाने चालवणारे भारतीय हवाई दल हे जगातील एकमेव आहे. ब्रेगेट आणि ब्रिटीश एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या ‘सोसायटी युरोपियन डे प्रोडक्शन डे ल’एव्हियन इकोले डे कॉम्बॅट एट डी’अप्पुई टॅक्टिक'(सेपेकॅट) द्वारे तयार करण्यात आलेले हे विमान भारत, इक्वेडोर, नायजेरिया आणि ओमानला विकले गेले.
सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे जुन्या झालेल्या जॅग्वार लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. गेल्या पाच दशकांपासून हे विमान भारतीय हवाई दलात कार्यरत आहे. १९७० च्या दशकात भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेल्या या जुन्या लढाऊ विमानांना अद्याप निवृत्त का केले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ब्रिटन, फ्रान्स, ओमान आणि नायजेरियासारख्या देशांनी त्यांचे जॅग्वार लढाऊ विमाने फार पूर्वीच निवृत्त केली आहेत. खरं तर, ही जुनी होत असलेली लढाऊ विमाने किमान २०४० पर्यंत भारतात सेवेत राहतील अशी शक्यता आहे. पण, त्यामागील नेमके कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

भारतीय हवाई दलाकडून जॅग्वार लढाऊ विमानांची खरेदी
- १९६८ मध्ये भारताने जॅग्वार लढाऊ विमाने खरेदी करण्याची सुरुवातीची ऑफर नाकारली होती. मात्र, १९७८ मध्ये त्यांनी १ अब्ज डॉलर्स किमतीची जेट विमाने मागवली.
- भारतीय हवाई दलाने डसॉल्ट-निर्मित मिराज एफ१ आणि साब विग्गेनक्षा जॅग्वारला प्राधान्य दिले.
- भारतीय हवाई दलाने युरोपमध्ये तयार करण्यात आलेली ४० जॅग्वार विमाने खरेदी केली.
- त्याशिवाय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथे शमशेर या नावाने १२० लढाऊ विमाने तयार करण्यात आली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानविरोधातील युद्धात त्यांचा वापर केला.
कारगिल युद्धात भारतीय वायुसेनेकडून जॅग्वारचा वापर
फ्रेंच अॅगेव्ह रडार आणि शक्तिशाली ब्रिटीश जहाजविरोधी क्षेपणास्त्रे बसवल्यानंतर, १९८७ ते १९९० दरम्यान श्रीलंकेत भारतीय शांतता राखीव दलासाठी शोध मोहिमा पार पाडण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला. १९९९ च्या कारगिल युद्धात जॅग्वार लढाऊ विमानांनी सक्रिय भूमिका बजावली आणि अनगाइडेड तसेच लेसर-गाइडेड बॉम्ब टाकले. भारतीय वायुसेनेकडून या विमानांना ‘डीप पेनिट्रेटिंग स्ट्राइक एअरक्राफ्ट’ असे संबोधले गेले. फ्रेंचमध्ये विकसित झालेल्या मिराज २००० बरोबर ते अजूनही महत्त्वाची लढाऊ भूमिका बजावत आहे.
भारतीय हवाई दल जॅग्वार विमाने निवृत्त करणार?
जॅग्वार लढाऊ विमाने जवळजवळ जुनी झाली असल्याने भारतीय हवाई दल २०२८ ते २०३१ पर्यंत ६० विमानांची सर्वात जुनी तुकडी निवृत्त करण्याचा विचार करत आहे. उर्वरित जॅग्वार विमाने अपग्रेड केली जाणार आहेत. २०२४ पर्यंत, ६० विमाने (जॅग्वार ताफ्यातील निम्म्याहून अधिक) DARIN III मानकांनुसार अपग्रेड केली जात आहेत. परंतु, ही विमाने आतापर्यंत निवृत्त का केली गेली नाहीत, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:
पर्यायांचा अभाव : नवीन विमाने खरेदी करण्यात भारताला अद्याप फारसे यश मिळालेले नाही. एचएएल तेजस एमके२, राफेल आणि मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट मिळविण्यात विलंब होत असल्याने, या जुन्या विमानांचा वापर सुरू ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे फारसा पर्याय नाही, असे वृत्त ‘मिंट’ने दिले आहे. “भारत जॅग्वार विमाने उडवत आहे, कारण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. भारतात कोणतेही विमान तयार होत नाही, ती खरेदी करावी लागतात. खरेदी आणि निवड करण्याची प्रक्रिया अवघड आहे. आपल्याकडे स्क्वाड्रनचीही कमतरता आहे. इतर विमानांप्रमाणेच जॅग्वारदेखील क्रॅश झाले आहे. ते खूप धोकादायक आहे, असे मी म्हणणार नाही,” असे विंग कमांडर प्रफुल्ल बक्षी (निवृत्त) यांनी एप्रिलच्या अपघातानंतर एका टीव्ही चॅनेलला सांगितले.
कमी उंचीवरील क्षमता : जॅग्वारमध्ये कमी शक्तीचे इंजिन आहे आणि त्यामुळे त्यामध्ये बिघाड आणि मॅन्युअल त्रुटी होण्याची शक्यता असते. मात्र, असे असले तरीही जॅग्वार कमी उंचीवरील त्याच्या उपयुक्ततेसाठी ओळखले जाते. आजही, ते कमी उंचीवरून हल्ला करू शकणारे एक सक्षम लढाऊ विमान आहे.
किफायतशीर किंमत : आधुनिक काळातील युद्ध तंत्रांच्या तुलनेत जॅग्वार हे एक किफायतशीर आणि देखभाल करण्यास सोपे असणारे लढाऊ विमान मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, त्याचे इंजिन केवळ ३० मिनिटांत बदलणे शक्य आहे.
अनेक सुधारणा शक्य : जॅग्वार विमानांमध्ये स्टँड-ऑफ हल्ला, स्ट्राइक रेंज आणि लक्ष्य संपादन क्षमता सुधारण्यासाठी त्याला अनेकवेळा अपग्रेड करण्यात आले आहे. लष्करी विश्लेषक आणि निवृत्त जॅग्वार वैमानिक स्क्वाड्रन लीडर विजेंदर के ठाकूर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिहिले होते की, DARIN (डिस्प्ले अटॅक रेंजिंग इनर्शियल नेव्हिगेशन) म्हणून ओळखले जाणारे हे अपग्रेड तीन DARIN-1, DARIN-2 आणि DARIN-3, अशा तीन टप्प्यात केले गेले.
२००८ मध्ये, सरकारी मालकीच्या लष्करी विमान निर्माता HAL ने २,४०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या करारात ६८ ‘डीप पेनिट्रेशन’ जॅग्वार लढाऊ विमानांना आधुनिक एव्हियोनिक्ससह अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे लढाऊ विमानांचे आयुष्य आणि कार्यक्षमता वाढेल असे सांगण्यात आले. काही वृत्तानुसार २०२७-२८ नंतर आयएएफ त्यांच्या जुन्या जॅग्वार विमानांना टप्प्याटप्प्याने निवृत्त करण्यास सुरुवात करेल अशी शक्यता आहे. २०३५-२०४० पर्यंत ही विमाने पूर्णपणे बंद करण्याचे नियोजन आहे.
सुटे भाग : गेल्या काही वर्षांत जॅग्वारच्या एमके ८११ इंजिनांसाठी सुट्या भागांची उपलब्धता हीदेखील एक समस्या ठरत आली आहे, कारण ही विमाने इतरत्र स्क्रॅप केली जात आहेत. परंतु, २०१८ मध्ये आयएएफने सुट्या भागांसाठी ४० हून अधिक डिकमिशन केलेली विमाने खरेदी केली. २०२४ मध्ये संरक्षण मंत्रालयाने युरोपियन देशाच्या सेवेत नसलेली नऊ जॅग्वार विमाने सुट्या भागांसह हस्तांतरित करण्यासाठी ब्रिटनशी संपर्क साधला. परंतु, काही तज्ज्ञ असेही सुचवतात की, आयएएफने जॅग्वार विमाने सध्या टप्प्याटप्प्याने बंद करू नयेत. त्यांचे म्हणणे आहे की, जॅग्वार फेजआउट योजनेमुळे आयएएफच्या लढाऊ विमानांच्या साठ्यात होणारी घट लक्षात घेता आयएएफच्या ऑपरेशनल क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.