ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय?
माध्यम प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेला ऑरेंज इकॉनॉमी असे संबोधतात. ही अर्थव्यवस्था व्यक्तिगत सर्जनशीलता, कौशल्ये आणि गुणवत्ता यांच्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांशी निगडित असते. यात संगीत, चित्रपट, फॅशन, छपाई, कला, जाहिरात आणि संगणकीय प्रणाली विकास आदी बाबींचा समावेश आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक नेटवर्कच्या व्याख्येनुसार, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक घटकांचा एकत्रित समावेश असलेली ही अर्थव्यवस्था आहे. याच वेळी ती तंत्रज्ञान, पर्यटन आणि बौद्धिक संपदा यांसारख्या क्षेत्रांशी जोडलेली असते. कल्पना आणि ज्ञान यावर प्रामुख्याने ही अर्थव्यवस्था अवलंबून असते. या अर्थव्यवस्थेत विकासाला चालना, रोजगारनिर्मिती आणि नावीन्याला प्रोत्साहन देण्याची क्षमता असते. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सांस्कृतिक वारसा आणि सांस्कृतिक ओळख जपण्यात ऑरेंज इकॉनॉमी महत्त्वाची भूमिका बजावते.
नामकरण का झाले?
कोलंबियाचे माजी अध्यक्ष इव्हान डूक्यू मार्क्वेझ आणि माजी सांस्कृतिक मंत्री फेलिपे बुईट्रॅगो यांनी सर्वप्रथम प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख ऑरेंज इकॉनॉमी असा केला. कारण नारिंगी हा रंग सर्व संस्कृतींमध्ये सर्जनशीलता, धार्मिकता आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला आहे. दृक-श्राव्य, चित्रपटनिर्मिती, दूरचित्रवाणी, व्हिडीओ गेम आणि संगीत हे सर्व प्रकार कलाकाराच्या संस्कृतीचे प्रतीक असतात. कलाकार त्यातून आपली संस्कृती मांडत असताना त्यांची सांस्कृतिक ओळखही पुढे येते, असे बुईट्रॅगो यांनी स्पष्ट केले होते.
भारतासाठी का महत्त्वाची?
भारत हा संगीत, चित्रपट आणि गेमिंगचे जागतिक केंद्र म्हणून समोर येत असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हज परिषदेत केला होता. देशात ऑरेंज इकॉनॉमी बहरत असताना ग्राफिक आणि अॅनिमेशन उद्याोगाला प्रचंड संधी निर्माण होणार असून, त्यातून देश समृद्ध होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. देशातील ऑरेंज इकॉनॉमीची पहाट झाल्याचा दावा मोदींनी केला आहे. देशातील नागरिकांनी २०२४ मध्ये एकूण १.१ लाख कोटी तास त्यांच्या स्मार्टफोनवर व्यतीत केले, असा अंदाज आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील हा प्रचंड स्मार्टफोन वापर आणि त्या माध्यमातून समाजमाध्यमांचा वापर पुढे आला आहे. देशात सध्या एक हजारांहून अधिक फॉलोअर असलेले २० ते २५ लाख डिजिटल प्रभावक आहेत. त्यातील केवळ ८ ते १० टक्के या माध्यमातून पैसे मिळवत आहेत. त्यामुळे भविष्यात या क्षेत्राच्या विस्ताराला आणखी वाव असणार आहे.
वाढ किती होणार?
देशातील चित्रपट आणि माध्यम उद्याोग पुढील दशकभरात तिपटीने वाढणार असून, तो १०० अब्ज डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वर्तविला आहे. सध्या देशातील माध्यम व मनोरंजन उद्याोगाची उलाढाल २८ अब्ज डॉलर आहे. यामुळे आगामी काळात त्यात मोठी वाढ होणार आहे. त्यातून स्वयंउद्याोजकतेला प्रोत्साहन मिळणार असून, कोट्यवधी रोजगार निर्माण होणार आहेत. या क्षेत्रातील मोठी वाढ इतरही क्षेत्रांना गती देणारी ठरणार आहे. देशातील ग्राहकांच्या आवडीनिवडीला आकार देणारी ही अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आगामी काळात कंपन्यांकडून यासाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सरकारकडून पावले कोणती?
केंद्र सरकारने प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यातून प्रभावकांना भांडवल मिळण्यासोबत कौशल्य विकास, निर्मितीची गुणवत्तावाढ आणि जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचणे यासाठी मदत होईल. याचबरोबर सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) स्थापन करण्यासाठी ३९१ कोटी रुपये मंजूर केले. या संस्थेच्या माध्यमातून डिजिटल आणि क्रिएटिव्ह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील शिक्षण दिले जाईल. प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेकडे सरकार कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे, हे सिद्ध करणारी ही दोन सकारात्मक पावले आहेत. सरकार प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देऊन त्यातून सॉफ्टवेअर आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याोग (एमएसएमई) क्षेत्रासारखे निर्यातक्षम उद्याोग तयार करीत आहे.