Religious food restrictions India श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी देशातील अनेक भागांत मांसाहारी दुकानांवर निर्बंध लादण्यासाठी आंदोलने आणि अनेक ठिकाणी तोडफोड केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्यतः पवित्र स्थळांच्या आसपास म्हणजेच मंदिर परिसरात मांसाहारी हॉटेल्स आणि दुकानांवर निर्बंध लादले जातात. प्रामुख्याने उत्तर भारतात मंदिर परिसरात मांसाहारी दुकानांना ठोस विरोध केला जातो.

परंतु, दक्षिण भारतात परिस्थिती काही वेगळी आहे. आपल्या सर्वांना ही गोष्ट ठाऊक आहे की, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक भागातील चालीरीतीही वेगवेगळ्या आहेत. असाच फरक धार्मिक स्थळांबाबतही जाणवतो. उत्तर भारतात जसा मंदिर परिसरातील मांसाहारी दुकानांन विरोध होतो, तसा विरोध दक्षिण भारतात होत नाही. परंतु, त्यामागील नेमके कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

सांस्कृतिक भेद

  • ​दक्षिण भारतात धार्मिक निष्ठा, भक्ती, अध्यात्म या बाबी खोलवर रुजलेल्या आहेत. मात्र, असे असले तरीही या भागात अन्नाची निवड हा नैतिकतेपेक्षा वैयक्तिक पसंतीचा किंवा उपजीविकेचा भाग मानला जातो.
  • उत्तर भारतात शाकाहार धार्मिक विधींशी संबंधित आहे; मात्र दक्षिण भारतीय परंपरांमध्ये मंदिरातील पवित्रता आणि बाहेरील आहाराच्या सवयींमध्ये फरक केला जातो.
  • या भागात मंदिराबाहेर कोण काय खात आहे, यावर समाजाकडून सामूहिक बंधन घालण्याचा प्रयत्न केला जात नाही.
  • नायर, रेड्डी, वोक्कलिगा, थेवर अशा अनेक समुदायांसह केरळ आणि बंगालमधील काही ब्राह्मण समुदायदेखील त्यांच्या आहारात मांस आणि माशांचा समावेश फार पूर्वीपासून करीत आले आहेत.
  • दक्षिण भारतात मांसाहार ही धार्मिक अपवित्रतेची बाब नसून, तो सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे.
​मंदिरांचे व्यवस्थापन कसे केले जाते यावरदेखील अनेक बाबी अवलंबून असतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

​मंदिर व्यवस्थापन आणि सामाजिक प्रभाव

​मंदिरांचे व्यवस्थापन कसे केले जाते यावरदेखील अनेक बाबी अवलंबून असतात. उत्तर भारतात अनेक मंदिरांचे व्यवस्थापन राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या प्रेरित संस्थांकडून केले जाते. त्यांचा प्रभाव मंदिरांवर असतो आणि अनेकदा या संस्था कट्टर शाकाहाराला प्रोत्साहन देतात. मात्र, दक्षिण भारतात मंदिरे सहसा देवस्थानम मंडळे किंवा मठांद्वारे चालवली जातात. या सर्व संस्था स्थानिक समुदायांनुसार काम करतात आणि मुख्य म्हणजे त्या आहारावर नियंत्रण ठेवत नाहीत. दक्षिण भारतात ​द्रविड चळवळ, आंबेडकरी विचार, प्रादेशिक पक्ष आदींमुळे राजकारण कमी आहे आणि त्यामुळेच मंदिरांवर राजकारणाचा प्रभावदेखील कमी आहे. त्याचाच परिणाम म्हणून आसपासच्या लोकांच्या आहारावर कोणतीही बंधने लादली जात नाहीत.

​उपजीविकेचा प्रश्न

​तमिळनाडूमधील रामेश्वरम आणि आंध्र प्रदेशातील श्रीशैलमसारख्या मंदिरे असलेल्या शहरांमध्ये स्थानिक समुदाय विशेषतः मच्छीमार हे त्यांच्या उपजीविकेसाठी मांसाहारी अन्नविक्रीवर अवलंबून असतात. या भागातून अशी दुकाने हटवणे केवळ अव्यवहार्य नसून, नैतिकदृष्ट्याही प्रश्नचिन्ह निर्माण करते. किनारपट्टी भागातील जीवन आणि प्राचीन द्रविड पाककृती परंपरेमुळे या प्रदेशात मासे आणि मांसाची उपस्थिती अधिक सामान्य झाली आहे. दक्षिण भारतातील अनेक ग्रामीण आणि लोकपरंपरांमध्ये शैव आणि शाक्त विधींचा समावेश आहे. त्या विधींमध्ये मांसाचे नैवेद्यही स्वीकारले जाते. त्यामुळे मंदिरांजवळ मांस दुकाने असल्यास विरोध दर्शविला जात नाही.

​दक्षिण भारतीय धार्मिकता भक्ती, आंतरिक अध्यात्म आणि इतरांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतींवर भर देते. त्यामुळेच अधिक सहिष्णू वातावरण निर्माण होते. ऐतिहासिकदृष्ट्याही त्यांच्या मंदिर संरक्षणासाठी ओळखले जाणारे चोळ आणि पांड्या यांसारखे दक्षिण भारतीय शासकदेखील मांसभक्षक होते, असे म्हटले जाते. आकडेवारीनुसार, गुजरात, हरियाणा, पंजाब व राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व तेलंगणामधील बहुतेक लोक नियमितपणे मांसाहारी अन्न खातात आणि या भागातील काही टक्केच लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत.

मांसाहारी खाद्यपदार्थ असलेले मंदिर परिसर कोणते?

​खालील मंदिरांजवळ मांसाहारी दुकाने आढळतात:

​रामेश्वरम, रामनाथपुरम (तमिळनाडू) : हे एक ज्योतिर्लिंग मंदिर. हे मंदिर स्थानिक मच्छीमार समुदायाला आधार देणाऱ्या सीफूड रेस्टॉरंट्सनी वेढलेले आहे.

​मीनाक्षी मंदिर, मदुराई (तमिळनाडू) : हे मंदिर शहराच्या एका गजबजलेल्या भागात वसलेले आहे. या मंदिराजवळच मटण बिर्याणीची दुकाने आहेत.

​चिदंबरम नटराज मंदिर (तमिळनाडू) : हे मंदिर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या रेस्टॉरंट्सनी वेढलेले आहे.

​अरुणाचलेश्वर मंदिर, तिरुवन्नामलाई (तमिळनाडू) : या भागात आसपासच्या हॉटेल्समध्ये मांसाहारी अन्न मिळणे सामान्य आहे.

​श्रीशैलम, कुर्नूल (आंध्र प्रदेश) : मंदिरातल्या आतील भागात पूर्णपणे शाकाहारी जेवण मिळते; मात्र बाहेरील परिसरात मांसाहारी पदार्थ विकले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

​यालाच एक अपवाद म्हणजे तिरुमला (आंध्र प्रदेश)मधील तिरुपती बालाजी मंदिर. या मंदिरात मांसाहारी अन्न पूर्णपणे प्रतिबंधित आहे. तिरुमला परिसरात मंदिर ट्रस्टने मांसाहारावर संपूर्णत: बंदी घातली आहे. मात्र, तिरुपती शहरात मांसाहारी हॉटेल्स आहेत.