अमोल परांजपे
अमेरिकेच्या दीर्घकाळ चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा येत्या मंगळवारी, ५ मार्च रोजी आहे. ‘सुपर ट्युसडे’ या नावाने ओळखला जाणारा हा दिवस जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशाचे पुढील राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी पुरेसा आहे, असे मानले जाते. या दिवशीचे फासे कुणाच्या बाजूने पडतात, त्यावर नोव्हेंबरमधील आणखी एका अशाच मंगळवारी कोण रिंगणात असेल, हे बऱ्यापैकी निश्चित होईल.
‘सुपर ट्युसडे’ म्हणजे काय?
अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी आपल्या पक्षातून सर्वात आधी निवडून यावे लागते. त्यासाठी पक्षांतर्गत प्राथमिक फेऱ्या (प्रायमरीज) सध्या सुरू आहेत. यातून सर्वाधिक प्रतिनिधींची (डेलिगेट्स) पसंती ज्या उमेदवाराला मिळेल, त्याची अखेरीस पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड केली जाते. याची घोषणा जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पक्षांच्या वार्षिक अधिवेशनात केली जाते. सध्या विविध राज्यांच्या कॉकस (मेळावे) किंवा प्रायमरीज (निवडणुका) सुरू आहेत. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक या दोन्ही प्रमुख पक्षांचे या प्राथमिक फेऱ्यांचे भिन्न वेळापत्रक असते. मात्र या प्रक्रियेतील एक मंगळवार असा असतो, की ज्या दिवशी अनेक राज्यांच्या प्राथमिक निवडणुका एकाच दिवशी असतात आणि तो दिवस ‘सुपर ट्युसडे’ म्हणून ओळखला जातो. यावेळी हा दिवस आहे ५ मार्च… या दिवशी रिपब्लिकन पक्षाच्या १५ आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या १६ राज्यांमध्ये प्रायमरीज किंवा कॉकस होणार आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण: डब्ल्यूटीओत भारत-थायलंड आमने-सामने का?
कोणत्या राज्यांत ‘सुपर ट्युसडे’?
‘सुपर ट्युसडे’ला एका अर्थी संपूर्ण अमेरिकेचे प्रातिनिधिक मत काय आहे, याचा अंदाज बांधता येतो. कारण, या दिवशी रिपब्लिकन प्रभाव असलेली राज्ये (रेड स्टेट्स) तसेच देशाच्या चारही दिशांकडील डेमोक्रेटिक पक्षाचे वर्चस्व असलेली राज्ये (ब्लूू स्टेट्स) प्राथमिक फेऱ्या घेतात. अलाबामा, आर्कान्सास, कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, मेन, मॅसॅच्युसेट्स, मिनेसोटा, नॉर्थ कॅरोलिना, ओक्लाहोमा, टेनेसी, टेक्सास, यूटा, व्हरमाँट आणि व्हर्जिनिया या राज्यांत दोन्ही पक्षांत निवडणूक होते. अलास्का या ‘रेड स्टेट’मध्ये याच दिवशी मतदान होईल. डेमोक्रेटिक पक्षासाठी अमेरिकन सामोआ या राज्यात निवडणूक होईल आणि या पक्षाची टपालाद्वारे मतदानाची हीच अंतिम मुदत असेल.
दोन्ही पक्षांसाठी मंगळवार महत्त्वाचा का?
रिपब्लिकन पक्षात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर आहेत. त्यांच्या एकमेव प्रतिस्पर्धी, दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि भारतीय वंशाच्या नेत्या निकी हॅले या स्पर्धेत पुढेही राहणार का याचा निर्णय मंगळवारी होऊ शकेल. हॅले यांना आतापर्यंत केवळ वॉशिंग्टन डीसीच्या प्राथमिक फेरीत ट्रम्प यांच्यावर विजय मिळविता आला आहे. ‘सुपर ट्युसडे’ला अधिकाधिक डेलिगेट्स आपल्या बाजुने वळविणे हे हॅले यांचे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकमेव लक्ष्य असेल. दुसरीकडे ट्रम्प मात्र या मंगळवारी २,४२९ डेलिगेट्सपैकी १,२१५ मते मिळवून पक्षावर निर्विवाद वर्चस्वासाठी प्रयत्न करतील. डेमोक्रेटिक पक्षात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मार्ग बऱ्यापैकी सुकर आहे. येत्या मंगळवारी ते ३,९३४पैकी १,९६८ डेलिगेट्स जमविण्यात यशस्वी होतील, असे मानले जात आहे. मात्र अलिकडेच मिशिगनमध्ये पडलेली ‘निषेध मते’ त्यांची डोकेदुखी वाढवू शकतात.
हेही वाचा >>>विश्लेषण : दिल्लीत पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो? या दिवसाचा ‘लाहोर ठरावा’शी संबंध काय?
बायडेन यांना मिशिनगचा कोणता इशारा?
अलिकडेच मिशिगन राज्यात झालेल्या प्राथमिक फेरीत बायडेन यांनी ८१ टक्के मते मिळवून पक्षाच्या उमेदवारीवरील आपला दावा निर्विवादपणे सिद्ध केला आहे. तरीही या राज्याने त्यांना एक जबरदस्त इशाराही दिला आहे. पक्षातील सुमारे १ लाख मतदारांनी आपले ‘निषेध मत’ नोंदविताना बायडेन यांच्याऐवजी ‘अनिश्चित’ या चौकटीत शिक्का मारला आहे. अरब वंशियांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या या राज्याने हमासविरोधी युद्धात बायडेन इस्रायलला करीत असलेल्या मदतीचा आपल्या पद्धतीने निषेध केला आहे. यामुळे प्राथमिक फेरीत बायडेन यांना धक्का लागला नसला, तरी अध्यक्षीय निवडणुकीत एवढे हक्काचे मतदार दूर गेले, तर राज्याचा निकाल फिरू शकेल. ‘सुपर ट्युसडे’ला मिशिगनप्रमाणेच अन्य कोणत्या राज्यांमध्ये युद्धविरोधी भावना आहेत, याचा अंदाजही बायडेन यांना येऊ शकेल आणि पुढील आठ महिन्यांत त्यावर मार्ग काढता येईल. मंगळवारनंतरही अन्य काही राज्यांमध्ये प्राथमिक फेऱ्या होतील. मात्र दोन्ही पक्षांचे सुमारे एक तृतियांश मतदार एकाच दिवशी आपला कौल देणार असल्यामुळे ट्रम्प, हॅले आणि बायडेन या तिघांसाठी हा मंगळवार निर्णायक ठरणार आहे.
amol.paranjpe@expressindia.com