गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेवर सुरू होणाऱ्या रो-रो कार सेवेला कोकणात विरोध होत आहे. तर विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ ऑगस्टला खेड येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जनमानसात कोकण रेल्वेबाबत वाढत्या नाराजीमागील कारणांचा थोडक्यात आढावा.
झाले काय?
कोकण रेल्वे मार्गावर रो-रो कार सेवा सुरू करण्याची घोषणा कोकण रेल्वेने केली आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर ही ‘रोल ऑन रोल ऑफ’ (रो-रो) सेवा चालवली जाणार आहे. या रेल्वेगाडीतून चार चाकी मोटारी थेट गोव्यापर्यंत घेऊन जाता येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा दरम्यान ही रो-रो सेवा चालवली जाणार असून, रेल्वेकडून आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. एका वेळी चाळीस गाड्या या रो-रो रेल्वे सेवेने घेऊन जाता येणार आहे. पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्ससाठी ही सुविधा उपलब्ध होती. यंदा मात्र प्रथमच खाजगी चार चाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र प्रवासी संघटनांनी या सेवेला विरोध दर्शविला आहे.
रो-रो सेवेला विरोध का?
कोकण रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी रो-रो सेवेला कोकणातील प्रवासी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या सेवेमुळे कोकणातील प्रवाशांना कुठलाच फायदा होणार नसल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. शिवाय जनसामान्यांसाठी ही सेवा आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसल्याचेही प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती चालवण्याऐवजी कोकण रेल्वे मार्गावर अधिक प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीने केली आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय प्रवासासाठी लागणारा वेळही जास्त आहे. कोकणात रो-रो सेवेसाठी कोलाडचा अपवाद सोडला तर कुठेही थांबे नाही त्यामुळे ही रेल्वे सेवा अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रवासासाठी जाचक अटी कोणत्या?
रो-रो सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांवर अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. एका वेळेस चाळीस वाहनेच या रो-रो सेवेतून नेली जाणार आहे. किमान १६ वाहनांचे आरक्षण झाले नाही तर त्या दिवशी ही रेल्वे रद्द केली जाणार आहे. रो-रो सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना गाडीसह किमान तीन तास आधी कोलाड येथे दाखल व्हावे लागणार आहे. एका गाडीसोबत तीनच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यातील दोघांना वातानुकूलित डब्यात तर चालकाला द्वितीय श्रेणी डब्यात बसावे लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी स्वतंत्र प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे कुंटुंबात तीन पेक्षा जास्त सदस्य असतील तर त्यांना प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे.
रो-रो सेवा अव्यवहार्य का?
रो-रो सेवेचा लाभ घेणासाठी प्रत्येक वाहनामागे ७ हजार ८७५ रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. तर वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांसाठी ९३५ रुपये प्रत्येकी भाडे आकरले जाणार आहे. तर द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या चालकासाठी १९० रुपये दर आकारले जाणार आहे. त्यामुळे एका कुटुंबाला एका बाजूच्या प्रवासासाठी जवळपास दहा हजार रुपये खर्च येणार आहे. याशिवाय मुंबईतून कोलाडपर्यंत आणि वेरणाहून कोकणातील गावापर्यंत इंधन खर्च वेगळा करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ही सेवा परवडणार नाही. प्रवासासाठी इतर प्रवासी रेल्वेच्या तुलनेत या गाडीला जादा वेळ लागणार असल्यानेही प्रवाशांसाठी ही सेवा अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मागणी काय?
या रो-रो रेल्वे सेवेचा कोकणातील प्रवाशांना काहीच फायदा होणार नसल्याने, आणि आर्थिक दृष्ट्या ही रेल्वेसेवा परवडणारी नसल्याने, ती रद्द करून त्या ऐवजी कोकणासाठी जादा थांबे असलेली विशेष गाडी सुरू करण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनी केली आहे. दुसरीकडे, कोकण रेल्वे मार्गावरील दादर-रत्नागिरी गाडी बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ही गाडी पुन्हा सुरू करावी, कोकणातील सर्व स्थानकांवर थांबे असलेली दादर ते चिपळूण अशी पॅसेंजर सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.
आंदोलन कुठे?
कोकणातील प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात कोकण रेल्वे प्रशाससनाकडून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टला कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी खेड येथे आंदोलन करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनांनी हा इशारा दिला आहे.
harshad.kashalkar@expressindia.com