Wildlife hunting उत्तर कोरियातील लोक वाघ आणि बिबट्यांसह इतर वन्यजीवांची शिकार करत आहेत, ज्यामुळे हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहेत. एका नवीन अभ्यासात असे आढळले आहे की, उत्तर कोरियातील उपासमारीचा सामना करणारे नागरिक वन्य प्राण्यांची शिकार करून स्वतःचे पोट भरत आहेत. ब्रिटीश आणि नॉर्वेजियन शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या या संशोधनातून उघड झाले आहे की, या पर्यावरणीय ऱ्हासाला उत्तर कोरियाचे सरकार आणि प्रादेशिक काळ्या बाजारातील (ब्लॅक मार्केट) व्यापार व्यवस्था कारणीभूत आहेत. ‘बायोलॉजिकल कॉन्झर्वेशन’ नावाच्या जर्नलमध्ये ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाने या देशातील वन्यजीवांच्या संरक्षणाची वाढती गरज अधोरेखित केली आहे. उत्तर कोरियातील नेमकी परिस्थिती काय? लोकांवर वन्यजीवांना मारून खाण्याची वेळ का आली? जाणून घेऊयात…
हा अभ्यास कसा करण्यात आला?
उत्तर कोरिया हा जगातील सर्वात विलग देशांपैकी एक असल्यामुळे तिथे संशोधन करणे जवळजवळ अशक्य आहे, त्यामुळे या निष्कर्षांवर पोहोचण्यासाठी दक्षिण कोरिया आणि ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या ४२ देश सोडून गेलेल्या नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी काही जण पूर्वी शिकारी, सैनिक होते किंवा त्यांनी वन्यजीव उत्पादनांचा व्यापार केल्याचे सांगितले.

उत्तर कोरिया वन्यप्राण्यांची शिकार का करत आहे?
उत्तर कोरियातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करत आहेत, त्यांना खात आहेत आणि विकत आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे सह-लेखक जोशुआ एल्व्स-पॉवेल म्हणाले, “उत्तर कोरियातील प्रत्येक सस्तन प्राण्याची शिकार करून त्यांना खाल्ले जात आहे. अगदी अत्यंत संरक्षित प्रजातींचाही व्यापार केला जात आहे, कधीकधी तर सीमा ओलांडून चीनमध्येही त्याची तस्करी होत आहे.” मुलाखत घेतलेल्या उत्तर कोरिया सोडून गेलेल्या नागरिकांनी सांगितले की, १९९० च्या दशकातील भीषण दुष्काळामुळे लोक स्वतःसाठी शिकार करण्यास प्रवृत्त झाले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शिकार सुरू झाली.
सोव्हिएत युनियनकडून मिळणारी मदत थांबल्यामुळे कम्युनिस्ट सरकारची सरकारी वितरण व्यवस्था कोलमडली, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. लाखो लोक उपाशी राहिले आणि २.२ कोटी (२२ दशलक्ष) या एकूण लोकसंख्येपैकी मृतांची संख्या ३५ लाखांपर्यंत पोहोचली होती. अनेक मुलाखतदारांनी एल्व्स-पॉवेल यांना सांगितले की, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ब्रिटीश संवर्धनवाद्याने ‘दिस वीक इन एशिया’ला सांगितले, “जर एखादा प्राणी एक संसाधन असेल, त्याचा उपयोग अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत असलेल्या लोकांना करता येत असेल तर त्यांच्या जगण्यासाठी या संसाधनांचे शोषण होणे तर्कसंगत आहे.”
उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था सुधारली असली तरी प्राण्यांचा व्यापार सुरूच आहे. अभ्यासकांच्या या चार वर्षांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, प्योंगयांग प्राणीसंग्रहालयासह (Pyongyang Zoo) सरकारी संस्थांनीही अशी उत्पादने पुरवली आहेत, जी अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल झाली आहेत. ब्रिटीश संवर्धनवादी म्हणाले, “हे धक्कादायक वाटायला हवे, पण यात आश्चर्यकारक काहीही नाही. आम्हाला माहीत आहे की उत्तर कोरियातील कारखाने यांसारख्या इतर सरकारी संस्थांमधून विक्रीयोग्य वस्तू काढून घेण्यात आल्या आहेत आणि त्या काळ्या बाजारात दाखल झाल्या आहेत.”
प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करणाऱ्या ‘Cites (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora)’ करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये उत्तर कोरियाचा समावेश आहे.
उत्तर कोरियाचे स्वतःचे प्राणी संरक्षण कायदे आहेत, जे उदमांजर आणि सेबल यांच्या शिकारीवर बंदी घालतात, परंतु त्यांची क्वचितच अंमलबजावणी होते. अभ्यासात आढळले की, राज्य स्वतः भेटवस्तू म्हणून वन्यजीव उत्पादने गोळा करते. यातील कातडी आणि हाडे सीमेपलीकडून चीनमध्ये पाठवली जातात.
कोणत्या प्रजातींची शिकार केली जात आहे?
एल्व्स-पॉवेल यांच्या मते, कोरियन द्वीपकल्पात एकेकाळी भरपूर प्रमाणात आढळणारा सेबल (sable) आज उत्तर कोरियामध्ये नामशेष झाला आहे. अमूर वाघ आणि अमूर बिबट्या यांची उत्तर कोरियामध्ये शिकार केली जात आहे. अस्वल, उदमांजर, हरीण यांचीही शिकार केली जात आहे. देश सोडून गेलेल्या नागरिकांनुसार, राज्याने स्वतः उदमांजर, हरीण, अस्वल आणि तितर यांचे फार्म (शेती) स्थापन केले आहेत. त्यांचे अवयव देशांतर्गत आणि परदेशात विकले जातात. हरणे उच्च दर्जाच्या अन्नाचा स्रोत मानली जातात. त्यांची शिंगे आणि अवयव, तसेच अस्वलांचे पंजे यांचा वापर पारंपरिक कोरियन औषधांमध्ये केला जातो. काही नागरिकांनी कोल्हे, बॅजर खाल्ल्याचे आणि त्यांच्या केसांचा व्यापार केल्याचेही सांगितले.
याचा काय परिणाम होणार?
संशोधकांनी इशारा दिला आहे की, उत्तर कोरियातील वन्यजीव शिकार ईशान्य प्रांतांमध्ये अमूर वाघांना पुनर्संचयित करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना धक्का देऊ शकते. संशोधकांच्या मते, अमूर वाघ चीनमधून उत्तर कोरियामध्ये येतात, जिथे त्यांच्या अस्तित्वाला धोका आहे. अमूर बिबट्याच्या बाबतीतही अशीच चिंता व्यक्त केली गेली आहे. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार संशोधक म्हणाले, “आमच्या तपासातून दिसून येते की, उत्तर कोरियात विखुरलेल्या वाघांना त्यांच्या अवयवांसाठी मारले जाण्याचा धोका आहे, ज्यामुळे या प्रदेशात वाघांच्या लोकसंख्येवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”
या अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, वन्यजीव व्यापाराचा विस्तार देशातील बहुतेक नागरिकांनी अनुभवलेल्या हालअपेष्टांमुळे झाला आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाचे राज्य स्वतःचे वन्यजीव संरक्षण कायदे लागू करण्यात आणि त्यांचे पालन करण्यात अपयशी ठरत आहे, ही सध्या एक मोठी अडचण आहे.” या निष्कर्षात म्हटले आहे, “उत्तर कोरियातील वन्यजीवांच्या शोषणामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, यामुळे उत्तर कोरियातील नैसर्गिक भूभागातून प्राण्यांचा संभाव्य ऱ्हास होऊ शकतो.” एल्व्स-पॉवेल यांनी ‘दिस वीक इन एशिया’ला सांगितले, “जर असे घडले तर केवळ जैवविविधतेचेच नुकसान होणार नाही, तर स्थानिक लोकांवरही परिणाम होईल आणि मुख्य म्हणजे शेजारील दक्षिण कोरिया, चीन आणि रशियातील वन्यजीवांवरही त्याचा परिणाम होईल.”