पाकिस्तानने दिल्लीत पुन्हा एकदा त्यांचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांतील ताणले गेलेले संबंध बघता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानमधील नवनिर्वाचित सरकारने यावर्षीपासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाकडे दोन्ही देशांतील संबंध सुधारणाचा प्रयत्न म्हणूनही बघितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर पाकिस्तानमध्ये २३ मार्च हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. १९४० मध्ये याच दिवशी मुस्लीम लीगने आपल्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी वेगळ्या राज्याची मागणी केली होती. तसेच या संदर्भातील ठरावही त्यांनी मंजूर केला होता. या दिवसाची आठवण म्हणून पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.

दरम्यान, हा लाहोर ठराव काय होता? या ठरावात नेमकं काय म्हटलं होतं? तसेच हा दिवस पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा का केला जातो? आणि महत्त्वाचे म्हणजे दिल्तीत तो कशाप्रकारे साजरा करण्यात येतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : भारताच्या कृषी उत्पादनावरील अनुदानावर थायलंडने प्रश्नचिन्ह का उपस्थित केले? यावर भारत सरकारचं म्हणणं काय?

लाहोर ठराव नेमका काय होता?

२२ ते २४ मार्च १९४० दरम्यान लाहोरमध्ये अखिल भारतीय मुस्लीम लीगचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात पहिल्यांदाच भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भातील ठरावही या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता, या ठरावालाच लाहोर ठराव म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे या ठरावात कुठेही ‘पाकिस्तान’ या शब्दाचा उल्लेख नव्हता. मात्र, मुस्लिमांसाठी वेगळ्या राज्यांची औपचारिक मागणी याच अधिवेशनात करण्यात आली होती, त्यामुळे पाकिस्तानमध्ये हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

विशेष म्हणजे १९५६ मध्ये याच दिवशी पाकिस्तानने आपली राज्यघटनादेखील स्वीकारली होती. तसेच लाहोरमधील ज्या ठिकाणी हा ठराव मंजूर करण्यात आला होता, त्या ठिकाणी १९६० ते १९६८ दरम्यान पाकिस्तान सरकारने मिनार-ए-पाकिस्तानदेखील उभारला, ज्याच्या पायथ्याशी लाहोर ठरावातील मजकूर कोरण्यात आला होता.

लाहोर ठरावाची पार्श्वभूमी :

१९३० च्या सुरुवातीपासून भारतातील काही मुस्लिमांनी आपल्याला योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे आणि आपल्या अधिकारांचे रक्षण व्हावे, या उद्देशाने आंदोलने सुरू केली होती. १९३५ च्या भारत सरकार कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी देण्यात आलेले वेगळे मतदारसंघ हे त्याच आंदोलनांचे फलित होते. मात्र, जसा जसा काळ लोटत गेला, वेगळ्या राष्ट्राची मागणी पुढे येऊ लागली. १९४० मधील लाहोर ठराव याच मागण्यांची औपचारिक घोषणा होती.

हेही वाचा – विश्लेषण : प्रेमळ लॅब्रडॉरऐवजी कणखर बेल्जियन मालिनोआस… भारतीय सैन्यदलांचे श्वानप्राधान्य का बदलले?

दिल्लीत हा दिवस कशाप्रकारे साजरा करण्यात येतो?

राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासात कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला दूतावासातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतात. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहतात. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले जाते. त्यानंतर पाकिस्तानचे दिल्लीतील उच्चायुक्त उपस्थितांना संबोधित करतात. तसेच प्रमुख पाहुणेदेखील उपस्थितांना संबोधित करतात. दरम्यान, यावर्षी २३ मार्चऐवजी २८ मार्च रोजी हा कार्यक्रम साजरा होणार असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why pakistan national day to be celebrated in delhi what is the connection with lahore resolution spb
First published on: 04-03-2024 at 18:45 IST