Pakistan Air Strike Khyber Pakhtunkhwa Attacks : दुसऱ्याचे घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचे घर त्याच आगीत जळून खाक व्हावे, अशी अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या हवाई दलाने त्यांच्याच खैबर पख्तूनख्वा प्रांतातील गावांवर हवाई हल्ले केले. चिनी बनावटीच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांमधून या गावांवर एकापाठोपाठ एक सहा बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यांत जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानी लष्कराच्या या कृतीवर तेथील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमका काय आहे हा प्रकार? पाकिस्तानने त्यांच्याच देशातील लोकांवर बॉम्बहल्ले का केले? त्या संदर्भातील हा आढावा…
पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानच्या हवाई दलाने खैबर पख्तूनख्वा प्रांतावर हवाई हल्ले केले. चिनी बनावटीच्या जेएफ-१७ या लढाऊ विमानामधून पश्तूनबहुल मातरे डारा गावावर एकापाठोपाठ एक सहा बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यात जवळपास ३० लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचादेखील समावेश आहे. या हल्ल्यानंतरच्या काही वेळातच समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये मृतदेहांचा खच दिसून आला. सध्या तिराह व्हॅलीमध्ये बचाव पथकांनी मृतदेह शोधण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानने आपल्याच प्रांतात हवाई हल्ले का केले?
स्थानिक वृत्तानुसार, सोमवारी झालेले हवाई हल्ले पाकिस्तानच्या हवाई दलाने तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेच्या गुप्त ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी केले. या संघटनेने पाकिस्तानमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली असून, तेथील लोकांना ठार मारले जात आहे. त्यामुळे या संघटनेला नष्ट करण्यासाठी अलीकडच्या काळात पाकिस्तानी सैन्याने या भागातील लष्करी कारवाया वाढवल्या आहेत. रविवारी डेरा इस्माईल खान जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेदरम्यान ‘टीटीपी’च्या सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली.
आणखी वाचा : What is Zoho : मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देणारा ‘झोहो’ हा स्वदेशी प्लॅटफॉर्म नक्की आहे तरी काय?
खैबर पख्तूनख्वा प्रांत दहशतवाद्यांचा तळ
खैबर पख्तूनख्वा प्रांत हा तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेचा तळ मानला जातो. या वर्षी ऑगस्टपर्यंत पाकिस्तानच्या या प्रांतात दहशतवादाशी संबंधित ६०५ घटना घडल्या असून, त्यामध्ये १३८ लोक ठार झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७९ पोलीस आणि सैनिकांचाही मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. केवळ ऑगस्ट महिन्यातच या प्रांतात १२९ दहशतवादी हल्ल्यांची नोंद झाली, ज्यात १७ नागरिक आणि १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यांमागे ३५१ संशयित दहशतवाद्यांची नावे समोर आली. पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत ३२ जणांना ठार करण्यात आले.
२०१४ साली पाकिस्तानमध्ये सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला
खैबर पख्तूनख्वा प्रांतात जूनमध्ये अलीकडील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी एका लष्करी ताफ्याला लक्ष्य केले होते. त्यात किमान १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेच्या एका गटाने स्वीकारली होती. या प्रदेशातील सर्वांत भयानक दहशतवादी हल्ला २०१४ मध्ये झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलला (APS) लक्ष्य केले, ज्यात १३० हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

हा प्रदेश दहशतवादाचा अड्डा कसा बनला?
खैबर पख्तूनख्वा प्रांत हा दहशतवादी अड्डा कसा झाला याबाबत अनेक मतांतरे आहेत. मात्र, न्यूयॉर्क टाइईम्सच्या वृत्तानुसार, १९७९ मध्ये सोविएत संघाने (आताचे रशिया) अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यामुळे हा प्रदेश अमेरिका, अरब राष्ट्रे व पाकिस्तान यांच्या पाठिंब्याने सोविएत सैन्याशी लढणाऱ्या इस्लामिक लढ्याचा तळ झाला. १९८९ मध्ये सोविएत सैन्य माघार घेतले गेल्यानंतर या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आली. फरारी गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या, शस्त्रे व अमली पदार्थांची तस्करी करणारे आणि खंडणीसाठी अपहरण करणाऱ्यांचा हा प्रदेश अड्डा बनला. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या लष्करी कारवायांना घाबरून तालिबान आणि अल-कायदाचे दहशतवादी पाकिस्तानच्या आदिवासी भागांमध्ये शिरले, ज्यामुळे हा प्रदेश दहशतवाद्यांचा बालेकिल्ला झाला.
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशाला धोकादायक बनविणाऱ्या कारणांमध्ये धार्मिक हिंसाचारदेखील मोठा आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये फक्त १० दिवसांत या प्रांतातील कुर्रम जिल्ह्यामध्ये धार्मिक हिंसाचारामुळे १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. कुर्रम हा पाकिस्तानमधील एकमेव असा जिल्हा आहे, जिथे शिया समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक आहे; तर देशाच्या उर्वरित भागात सुन्नी बहुसंख्याक आहेत. गेल्या वर्षी जुलैपासून शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये जमिनीच्या वादावरून सुरू झालेल्या तणावामुळे तिथे हिंसेच्या लाटा उसळत आहेत.
पाकिस्तानी लष्कर निष्पाप लोकांनाही मारतंय?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खैबर पख्तूनख्वामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे तिथे अतिरेकी आणि दहशतवादी कारवायांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या प्रदेशातील वारंवार होणारे ड्रोन हल्ले पाकिस्तानातील सामान्य नागरिकांच्या जीवनाकडे दुर्लक्ष दर्शवितात. पाकिस्तानी लष्करी अधिकारी खैबर पख्तूनख्वामधील नागरिकांच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. पेशावर शहरातील विद्यापीठातील प्राध्यापक सय्यद इरफान अशरफ म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्कराने खैबर पख्तूनख्वामध्ये हुकूमशाही शासन पद्धती लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. या शासन पद्धतीचे मोठे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत.
दरम्यान, रविवारी दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानी लष्कराने निष्पाप लोकांचा जीव घेतला, अशी भावना या प्रांतातील लोकांमध्ये आहे. स्थानिक लोकांचा असा दावा आहे की, मृत्युमुखी पडलेले सर्व जण निष्पाप होते आणि गावात कोणतेही दहशतवादी लपण्याचे ठिकाण नव्हते. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जोपर्यंत पाकिस्तानी लष्कराच्या या कृतीवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह दफन करणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.