Tree Plantation पर्यावरण रक्षण आणि संवर्धन सध्या जागतिक चिंतेचा विषय आहे. विकासाच्या नावावर बेफाम वृक्षतोड झाली आहे आणि आजही सुरूच आहे. मात्र, त्या तुलनेत वृक्ष लागवडीचे प्रमाण खूप कमी आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्याने हवामानावर झालेला त्याचा घातक परिणाम आपण ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढ आदींच्या स्वरूपात पाहतोच आहे. विविध देशांतील सरकारद्वारे वृक्ष लागवड उपक्रम सुरू केले जातात. परंतु, अनेकदा हे उपक्रम अयशस्वी ठरतात. यामागील कारण काय? वृक्ष लागवड करताना कोणत्या बदलांची गरज आहे? याविषयी जाणून घेऊ.
केनियामध्ये २०३२ पर्यंत १५ अब्ज झाडे लावण्याची राष्ट्रीय मोहीम राबवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्था ‘ग्रीन डायमेंशन नेटवर्क’मधील पर्यावरणवादी लुसी कागेंडो यांनी गेल्या वर्षी ५० झाडांची लागवड केली. मात्र, यातील बोटावर मोजण्या इतकीच झाडे जगू शकली. असे वृक्ष लागवड उपक्रम हवेतील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने राबवले जातात. परंतु, हे उपक्रम कितपत प्रभावी ठरतात हा एक प्रश्नच आहे. कारण, लुसी कागेंडो यांच्या वृक्षारोपणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, त्या एकट्या नाहीत. गेल्या ५० वर्षांत उत्तर भारतात वृक्ष लागवडीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.
वृक्ष लागवड उपक्रमांना अपयश
पर्यावरणविषयक जर्नल ‘नेचर सस्टेनेबिलिटी’च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, “उत्तर भारतात अनेक दशकांपासून सुरू असलेले खर्चिक वृक्ष लागवड उपक्रम प्रभावी ठरले नाहीत. कारण त्यांनी जंगलाचे आच्छादन वाढवले नाही आणि हवामान बदलाचाही यावर परिणाम झाला. २००७ मध्ये सुरू झालेल्या आफ्रिकेच्या महत्त्वाकांक्षी ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पाचे उद्दिष्ट साहेलमधील १०० दशलक्ष हेक्टरवर (२४७.१ दशलक्ष एकर) वृक्ष लागवड करण्याचे होते. यूएनच्या ताज्या आकडेवारीनुसार, त्या क्षेत्राच्या फक्त एक पंचमांश क्षेत्रात वृक्षांची लागवड झाली होती. निधीच्या कमतरतेमुळे वृक्षांची लागवड थांबली आणि काही झाडे पुरेशा प्रमाणात पाणी किंवा काळजी न मिळाल्याने जगू शकली नाहीत.
वृक्ष लागवड उपक्रमातील अडचणी
चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीची झाडे लावल्यामुळे अनेक वृक्ष लागवड उपक्रमांचा बोजवारा उडतो. तुर्कीमध्ये २०१९ मध्ये सरकारने देशभरात ११ दशलक्ष झाडे लावली. परंतु, तुर्कीच्या कृषी आणि वनीकरण युनियनचे प्रमुख सुकरू डर्मस यांनी सांगितले की, “लागवड केलेल्या झाडांपैकी सुमारे ९८ टक्के झाडे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मरण पावली.” चुकीची लागवडीची वेळ, कमी पाऊस आणि चुकीच्या झाडांच्या प्रजाती निवडल्यामुळे हा उपक्रम अयशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. नायजेरियातील पर्यावरण व्यवस्थापन संशोधक सेयफुन्मी अडेबोटे यांच्या मते, बहुतेक उपक्रम अयशस्वी ठरतात, कारण लोक योग्य नियोजन करण्याऐवजी जास्त झाडे लावण्यावर लक्ष केंद्रित करतात.
“बहुतेक वेळा जेव्हा वृक्षारोपणाच्या मोहिमा राबवल्या जातात, तेव्हा त्या स्थानिक राजकारणाच्या संबंधित किंवा जागतिक राजकारणाच्या संबंधित असतात, असे सेयफुन्मी अडेबोटे यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. नायजेरियन राज्य कडुनामधील हवामान बदलासाठी काम करणारे सरकारी अधिकारी युसुफ इद्रिस अमोकेम्हणतात की, मागील उपक्रम अयशस्वी ठरले, कारण ते उपक्रम केवळ सरकारच्या ‘ग्रीन क्रेडेन्शियल्स’ची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी राबवले गेले होते.
झाडांच्या संगोपनावर भर देण्याची गरज
झाडे परिपक्व होण्यासाठी साधारणपणे २० ते ३० वर्षांचा कालावधी लागतो. हवामानावर या झाडांचा मोठा परिणाम होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे झाडांचा मागोवा घेणे आणि ते लावल्यानंतर त्याचा पाठपुरावा घेत राहणे आवश्यक आहे, जे शक्यतो या उपक्रमांमध्ये होत नाही. लागवडीवेळी झाडांची योग्य प्रजाती निवडणे आणि दीर्घकाळासाठी झाडांची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. “केवळ झाडे लावून काही उपयोग नाही, त्या झाडांची काळजी आणि देखरेखीद्वारे त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करणारे उपक्रमच यशस्वी ठरले,” असे इंडियाज यंग एन्व्हायर्नमेंटलिस्ट प्रोग्राम ट्रस्टच्या संस्थापक एल्सी गॅब्रिएलयन यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले.
उदाहरणार्थ, चीनमधील लॉस पठार पाणलोट पुनर्वसन प्रकल्प यशस्वी झाला, कारण यात वापरलेल्या प्रजाती मूळ आणि दुष्काळ प्रतिरोधक होत्या. तसेच स्थानिक हवामान आणि मातीशी एकरूप होणार्या होत्या. या उपक्रमांतर्गत २,७०,००० हेक्टर परिसरात यशस्वीरित्या झाडांची लागवड करण्यात आली.
झाडे लावल्यानंतर त्यांची काळजी घेणार कोण?
‘ग्रीन डायमेंशन्स नेटवर्क’च्या कागेंडो यांनी सरकारी उपक्रमादरम्यान केनियामध्ये झाडे लावली. त्यानंतर या झाडांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न त्यांना पडला. “राष्ट्राध्यक्ष आले आणि त्यांनी झाडे लावली, पण नंतर ते त्या ठिकाणी जाऊन पाणी देतील का? असा प्रश्न कागेंडो यांच्यासमोर उपस्थित राहिला. हा प्रश्न सहाजिक आहे, पण यात स्थानिक समुदाय झाडे जगवण्यात मदत करू शकतात. या प्रकल्पांमध्ये त्यांचाही समावेश करायला हवा. “भारतातील वृक्षारोपण उपक्रम स्थानिक स्वदेशी समुदायांपर्यंत पोहोचले पाहिजे,” असे एलिस गॅब्रिएल म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “शाळा आणि महाविद्यालयांना या संधी दिल्या पाहिजेत. लिंगभेद भरून काढण्यासाठी महिलांना बागायती आणि वृक्षारोपणात नोकऱ्या दिल्या पाहिजेत.”
हेही वाचा : आंदोलक विद्यार्थी ते माजी नौदल कमांडो; बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये कोणाकोणाचा समावेश?
काही यशस्वी स्थानिक वृक्ष लागवड उपक्रमांमध्ये हा दृष्टिकोन वापरण्यात आला आहे. ‘यूएस ग्रीन सिएटल’ या भागीदारी प्रकल्पामध्ये शाळा आणि स्थानिक समुदायातील तरुण स्वयंसेवकांचा समावेश होता. त्यांनी आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक स्वयंसेवक तयार केले आहेत. “मोठ्या संख्येने झाडे लावण्यापेक्षा निरोगी, कमी झाडे जगवणे योग्य आहे,” असे पर्यावरणवादी कागेंडो म्हणाल्या.