U19 World Cup Cricket: दक्षिण आफ्रिकेत काही तासात U19 क्रिकेट वर्ल्डकप सुरू होतो आहे. स्पर्धेची सर्वाधिक जेतेपदं भारतीय संघाच्या नावावर आहेत. भारतीय संघ गतविजेता असून, उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय युवा संघ जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी आतूर आहे. या स्पर्धेने देशाच्या कानाकोपऱ्यातील युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी ठोस व्यासपीठ दिलं आहे. या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करणारे युवा शिलेदार काही वर्षातच वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा भाग होताना दिसले आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे आयपीएल संघांचं लक्ष असतं. लिलावात या युवा खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी आयपीएल संघ उत्सुक असतात. घरच्या मैदानावर बहुतांश खेळाडूंची कामगिरी चांगली असते. पण या वर्ल्डकपच्या निमित्ताने तटस्थ ठिकाणी चांगलं खेळण्याचं आव्हान असतं. आयसीसीचे वनडे आणि ट्वेन्टी२० वर्ल्डकप असतात. टेस्ट चॅम्पियनशिप असते. वनडेत चॅम्पियन्स ट्रॉफी असते. त्या स्पर्धांना जो मान मिळतो तोच U19 वर्ल्डकपलाही मिळतो. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे उदयोन्मुख तारे म्हणूनच पाहिलं जातं. वरिष्ठ राष्ट्रीय संघाच्या निवडसमितीचं या स्पर्धेकडे बारकाईने लक्ष असतं.

केवळ भारतीय क्रिकेट नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सार्वकालीन छाप उमटवणारा विराट कोहली याच स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा जगासमोर आला. राहुल द्रविडच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचा वारसदार ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने याच स्पर्धेतून आगमनाची नांदी दिली. सलामीवीर म्हणून शिखर धवनने याच स्पर्धेतून दखल घ्यायला भाग पाडली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असो किंवा अष्टपैलू रवींद्र जडेजा- याच स्पर्धेच्या व्यासपीठावर पहिल्यांदा चमकले.

pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का
For the first time in the history of IPL Vidarbha player Jitesh Sharma as the captain
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाच्या खेळाडूला कर्णधारपद….
India Satviksairaj Rankireddy and Chirag Shetty defeat China Chen Bo Yang and Liu Yi to win Thailand Open Badminton Championship sport news
थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिरागला विजेतेपद
rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत
Indian Relay Teams Qualify for Olympics
रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान भारताच्या महिला, पुरुष संघांना यश
Indian Team Announced for World Cup 2024
T20 World Cup 2024 : साई-अभिषेकसह IPL 2024 गाजवणाऱ्या ‘या’ पाच खेळाडूंना वर्ल्डकपसाठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान
Uber Cup Badminton Tournament Indian women team in quarterfinals sport news
उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा: भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत
shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य

२०११ विश्वचषकाचा नायक युवराज सिंगने याच स्पर्धेत आपल्या नावाची चुणूक दाखवली होती. भारतीय संघासाठी केवळ ही स्पर्धा नाही. ज्युनियर ते सीनिअर संक्रमणातला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ गांभीर्याने सहभागी होतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडू खणखणीत प्रदर्शन करतात. स्पर्धेतील पुरस्कारांवर भारतीय खेळाडू नाव कोरतात. बीसीसीआय या स्पर्धेसाठी स्वतंत्र सपोर्ट स्टाफ पाठवतं. स्पर्धेआधी खेळाडूंचं शिबीर आयोजित करण्यात येतं. ज्या ठिकाणी स्पर्धा होणार आहे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आधीच काही दिवस जाऊन राहायला प्राधान्य दिलं जातं. या स्पर्धेसाठी संघ निवडताना देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाते. कामगिरीच्या बरोबरीने फिटनेसचा विचार होतो. प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले ऋषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले हे भारतीय संघाबरोबर आहेत.

२०२२- यश धूलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेदावर कब्जा केला. या संघातील बहुतांश खेळाडूंना आयपीएल संघांनी सामावून घेतलं आहे.

२०२०- प्रियम गर्गने संघाचं नेतृत्व केलं. ४०० धावांसह मालिकावीर ठरलेला यशस्वी जैस्वाल सध्या वरिष्ठ संघाचा भाग असून त्याची बॅट तळपते आहे. या संघातील विकेटकीपर बॅट्समन यश जुरेलची वरिष्ठ राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. या संघातील फिरकीपटू रवी बिश्नोई वरिष्ठ संघाकडून खेळताना दिसतो आहे. कुमार कुशाग्रने नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. अथर्व अंकोलेकर मुंबईच्या रणजी संघाचा भाग झाला आहे.

२०१८- मुंबईकर पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली. फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला नमवलं. या स्पर्धेतून जागतिक पटलावर छाप उमटवणाऱ्या पृथ्वीने कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम केला. या स्पर्धेत सलामीवीराच्या भूमिकेत असणाऱ्या शुबमन गिलने सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

२०१६- भारतीय राष्ट्रीय संघाचा भाग असणारा इशान किशनने युवा संघाचं नेतृत्व केलं होतं. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने इशानसाठी .. रुपये बोली लावत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. इशानच्या संघातील ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतने स्वत: प्रस्थापित केलं आहे.

२०१४- मराठमोळ्या विजय झोलच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला. विजयचे सहकारी कुलदीप यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आता भारतीय संघाचा भाग आहेत.

२०१२- उन्मुक्त चंदच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेपद नावावर केलं. उन्मुक्त फायनलमध्ये सूत्रधाराची भूमिका निभावत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची मॅरेथॉन खेळी केली. उन्मुक्तचं कारकीर्द अपेक्षेप्रमाणे बहरली नाही. त्याचा सहकारी हनुमा विहारीने भारताच्या कसोटी संघात स्थान पटकावलं.

२०१०- अशोक मेनारियाकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावांची टांकसाळ उघडणाऱ्या खेळाडूंमध्ये अशोकचं नाव घेतलं जातं. काही दिवसांपूर्वीच अशोकच्या नेतृत्वातील हरयाणा संघाने विजय हजारे स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.

२००८- आधुनिक क्रिकेटचा शिलेदार विराट कोहली त्यावेळी युवा संघाचा कर्णधार होता. कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवलं. विराटने टेस्ट, वनडे, ट्वेन्टी२० अशा तिन्ही प्रकारात अद्भुत सातत्याने धावा करत नवनवे विक्रम रचले. २०१० ते २०२० हे दशक कोहलीचं होतं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कोहलीने वरिष्ठ संघाचं नेतृत्वही केलं. त्या संघातील कोहलीचे सहकारी रवींद्र जडेजा हा टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र आहे. मनीष पांडे आणि सिद्धार्थ कौल हेही भारतीय संघाकडून खेळले.

२००६- हिटमॅन रोहित शर्मा त्या स्पर्धेत भारताचा कर्णधार होता. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. मालिकावीराचा मानकरी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडची परंपरा समर्थपणे जपली.

२००४- आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या जेतेपदांच्या मांदियाळीत अग्रणी संघाचा अविभाज्य भाग असलेला अंबाती रायूडू भारताचा कर्णधार होता. स्पर्धेत शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्यालाच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिखर अल्पावधीत भारताचा सलामीवीर झाला. या दोघांचे सहकारी दिनेश कार्तिक, सुरेश रैना, आरपी सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनीही भारताचं प्रतिनिधित्व केलं.

२००२- पार्थिव पटेलने भारताचं नेतृत्व केलं होतं. भारतीय संघाने सेमी फायनलपर्यंत आगेकूच केली. पार्थिवच्या बरोबरीने त्याचे सहकारी इरफान पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी हेही भारतासाठी खेळले.

२०००- मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला हरवलं. कैफ भारताचा वनडे फिनिशर झाला. मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा युवराज सिंग भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला. २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत युवराजच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने जेतेपदावर नाव कोरलं. युवराजला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

१९९८- दहा वर्षानंतर युवा वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं. त्या स्पर्धेत अमित पागनीसने संघाचं नेतृत्व केलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अमितचं नाव घेतलं जातं. अमितच्या संघातील वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांनी भारताच्या वरिष्ठ संघासाठी खेळताना नवनवे मापदंड प्रस्थापित केले.

१९८८- युथ क्रिकेट वर्ल्ड असं त्यावेळी स्पर्धेचं नाव होतं. माल्यवहन सेंथीलनाथन संघाचा कर्णधार होता. या संघातील नयन मोंगिया, नरेंद्र हिरवाणी आणि वेंकटपथी राजू वरिष्ठ भारतीय संघासाठी खेळले.


यंदाचा वर्ल्डकप कधी आणि कुठे होतोय?
U19 वर्ल्डकप १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होत आहे. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सलामीचा सामना आहे. ११ फेब्रुवारी रोजी फायनल होणार आहे

यजमान कोण आहेत?
दक्षिण आफ्रिकेचा संघ यजमानाच्या भूमिकेत आहे. पॉचशेफ्सरुम, ब्लोमफौंटन, बेनोई, किंबर्ले आणि इस्ट लंडन या ठिकाणी वर्ल्डकपचे सामने होार आहेत. सेमी फायनल आणि फायनल बेनोई इथे होणार आहे.

श्रीलंकेचं यजमानपद का गेलं?
यंदाचा वर्ल्डकप श्रीलंकेतच होणार होता. पण आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर नोव्हेंबर महिन्यात निलंबनाची कारवाई केली. श्रीलंका बोर्डाच्या कारभारात अतिरिक्त प्रमाणात सरकारी हस्तक्षेपामुळे ही कारवाई झाली. यामुळे श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेकडे यजमानपद सोपवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेने याआधी १९९८ आणि २०२० मध्ये वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं.

स्पर्धेचं स्वरुप कसं आहे?
१६ संघ शर्यतीत असून चार गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत आगेकूच करतील. सुपर सिक्स फेरीत १२ संघ असतील. प्रत्येकी सहा अशा दोन गटात त्यांची विभागणी होईल. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. सेमी फायनलमधील विजयी संघांदरम्यान अंतिम मुकाबला रंगेल.

संघ वर्ल्डकपसाठी कसे पात्र ठरले?
यजमान या नात्याने श्रीलंकेचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. यजमानपद दक्षिण आफ्रिकेला देण्यात आल्यानंतरही श्रीलंकेच्या संघाचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला. २०२२ मध्ये वर्ल्डकपचा भाग असणारे संघ आपोआप पात्र ठरले. याव्यतिरिक्त संघ प्रादेशिक पात्रता फेरीद्वारे पात्र ठरले. न्यूझीलंडने ईस्ट एशिया पॅसिफिक तर नामिबियाने आफ्रिका क्वालिफायर्स मध्ये अव्वल स्थान पटकावलं. आशिया प्रदेशातून नेपाळने तर स्कॉटलड युरोप क्वालिफायर्समध्ये जेता ठरला. अमेरिका क्वालिफायर्समध्ये अमेरिकेचाच संघ अव्वल ठरला.

घरातल्यांकडे लक्ष
पाकिस्तानचा उबैद शहा हा नसीम शहाचा भाऊ आहे. नसीम पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करतो. अफगाणिस्तानचा फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीचा मुलगा हसन एसखील खेळताना दिसेल. अफगाणिस्तानचा फिरकीपटू आणि जगभरातील ट्वेन्टी२० लीगमध्ये नियमित खेळणाऱ्या रशीद खानचा पुतण्या उस्मान शिनवारी खेळताना दिसेल. २०१६ युवा विश्वचषक गाजवलेल्या सर्फराझ खानचा भाऊ मुशीर खान स्पर्धेत खेळताना दिसेल.

गतविजेते कोण आहेत?
२०२२ स्पर्धेत यश धूलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. फायनलमध्ये भारताने इंग्लंडवर विजय मिळवला होता. भारताच्या नावावर या स्पर्धेची पाच जेतेपदं (२०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२) आहेत.