विश्लेषण: फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचा वापर का केला जातो? ‘फिफा’ची मान्यता मिळणार का? | why white card used in football franc captain michel platini | Loksatta

विश्लेषण: फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचा वापर का केला जातो? ‘फिफा’ची मान्यता मिळणार का?

एका स्थानिक सामन्यात पंचांनी पांढऱ्या किंवा व्हाईट कार्डाचा उपयोग केला. हे कार्ड कशासाठी दाखविण्यात आले आणि याचा अर्थ काय याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

white card use in football
फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचा वापर का केला जातो? ‘फिफा’ची मान्यता मिळणार का?

ज्ञानेश भुरे

तुम्ही फुटबॉल चाहते नसलात, तरी सामन्यावेळी पंच पिवळे आणि लाल कार्ड खेळाडूंना दाखवितात हे तुम्हाला माहिती असेल. अलिकडे एका स्थानिक सामन्यात पंचांनी पांढऱ्या किंवा व्हाईट कार्डाचा उपयोग केला. हे कार्ड कशासाठी दाखविण्यात आले आणि याचा अर्थ काय याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

व्हाईट कार्ड दाखविण्याची मूळ संकल्पना कुणाची?

फुटबॉलमध्ये पांढऱ्या कार्डच्या वापराबाबत सर्वांत प्रथम युएफाचे माजी अध्यक्ष आणि विख्यात माजी फ्रेंच कर्णधार मिशेल प्लॅटिनी यांनी सादरीकरण केले होते. प्लॅटिनींच्या म्हणण्यानुसार खेळाडूंना निलंबित केले जाण्यासाठी पर्याय म्हणून पांढऱ्या कार्डाचा उपयोग केला जाऊ शकतो. सामन्यातून खेळाडूला ठराविक काळासाठी बाहेर काढण्याकरिता पांढऱ्या कार्डाचा उपयोग केला जाऊ शकतो. नाटकीरीत्या पडणे, धक्काबुकी, शिवीगाळ अशा मैदानावरील अखिलाडू गैरवर्तनासाठी हे कार्ड वापरले जावे. जेणेकरून खेळाडूंवर चांगले वर्तन करण्यासाठी दडपण राहील आणि पंचांच्या अडचणी कमी होतील, असे प्लॅटिनी यांचे म्हणणे होते. मात्र ‘फिफा’चे तत्कालिन अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी ही कल्पना फेटाळून लावली होती.

विश्लेषण : देशात करोनाची पुढची लाट का आली नाही? सद्यस्थिती काय आहे?

व्हाईट कार्डचा उपयोग आता कशासाठी केला जातो?

प्लॅटिनी यांची व्हाईट कार्ड दाखविण्यामागची कल्पना फेटाळली गेली असली तरी नव्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत व्हाईट कार्ड दाखविण्यास मान्यता मिळाली. फक्त त्याचा उपयोग करण्यामागची कल्पना बदलली. निष्पक्षपणे खेळल्या जाणाऱ्या खेळाच्या ओळखीसाठी आता हे कार्ड दाखविले जाते. एखाद्या संघाच्या चांगल्या कृतीचे किंवा खिलाडूवृत्तीच्या प्रदर्शनाच्या कौतुकासाठी या कार्डचा उपयोग केला जात आहे.

व्हाईट कार्डचा उपयोग सर्वप्रथम कधी करण्यात आला?

खेळातील नितिमत्ता जपण्यासाठी राष्ट्रीय नियोजनाचा एक भाग आणि मैदानावरील न्याय्य खेळाच्या कृतीचे कौतुक म्हणून पोर्तुगाल फुटबॉल संघटनेने या कार्डाचा उपयोग सुरू केला आहे. कार्डाचा उपयोग सध्या फक्त पोर्तुगालमध्ये करण्यात येत आहे. लिस्बन येथे झालेल्या महिला चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बेनफिका-स्पोर्टिंग लिस्बन संघांदरम्यान झालेल्या सामन्यात पंचांकडून व्हाईट कार्डचा सर्वप्रथम वापर करण्यात आला.

व्हाईट कार्डचा वापर का करण्यात आला?

सामन्याला प्रेक्षकांची सर्वाधिक गर्दी होती. तेव्हा स्टँडमधील पहिल्या रांगेतील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळाने तो बेशुद्धही पडला. या चाहत्याच्या मदतीसाठी मैदानावर खेळणाऱ्या दोन्ही संघांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि त्या आजारी प्रेक्षकाला वैद्यकीय मदत वेळेवर मिळाली. मैदानावरील पंच कॅटरिना कॅम्पोस यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांनी या दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाने दाखविलेल्या खिलाडूवृत्ती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेसाठी त्यांच्याकडे निर्देश करत व्हाईट कार्ड दाखवले.

विश्लेषण: आत्तापर्यंत कोणत्या भारतीय कलाकारांनी ऑस्कर जिंकलं आहे?

अन्यत्र व्हाईट कार्डचा वापर केव्हा सुरू होणार?

‘फिफा’ने अद्याप या कार्डाला मान्यता दिलेली नाही. पोर्तुगाल फुटबॉल संघटनेने कार्डाचा वापर स्वयंप्रेरणेसाठी सुरू केला आहे. त्यामुळे सध्या फक्त पोर्तुगालमध्येच या कार्डचा वापर केला जातो. अन्य कुठल्या फुटबॉल संघटनेने या कार्डाचा स्वीकार केलेला नाही. पण, नैतिकतेच्या आधारे निष्पक्ष खेळाला चालना देण्यासाठी भविष्यात निश्चितच पांढऱ्या कार्डाचा उपयोग निश्चित वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 10:48 IST
Next Story
विश्लेषण: भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालय आरक्षणाचा वाद काय?