अन्वय सावंत

प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये यंदा रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड क्लबने कठोर पाऊल उचण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केले होते आणि त्यात त्यांना बेलारूसचे साहाय्य लाभले. हे युद्ध अजूनही थांबलेले नसून युक्रेनची मोठी जीवितहानी होत आहे. त्यामुळे विविध क्रीडा संघटनांनी रशिया आणि बेलारूसवर बंदी घातली आहे. मात्र, टेनिस संघटनांनी या दोन्ही देशांच्या खेळाडूंना ‘तटस्थ खेळाडू’ म्हणून स्पर्धांमध्ये खेळत राहण्यासाठी परवानगी दिली. परंतु असे असतानाही ऑल इंग्लंड क्लबने मात्र या दोन्ही देशांच्या खेळाडूंवर सरसकट बंदी घातल्याने त्यांच्यावर बरीच टीकाही केली जात आहे.

बंदीमागचे नक्की कारण काय?

ऑल इंग्लंड क्लबने ब्रिटनमधील सरकारशी सविस्तर चर्चा करून रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर विम्बल्डन स्पर्धेमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला. रशियाचा जागतिक प्रभाव कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे ऑल इंग्लंड क्लबने आपल्या निवेदनात म्हटले. तसेच रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंच्या विम्बल्डनमधील सहभागामुळे रशियन राजवटीला कोणताही फायदा होऊ नये, अशी ऑल इंग्लंड क्लबची धारणा आहे. त्यामुळे त्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.

या निर्णयाला का आणि कोणाचा विरोध?

बहुतांश टेनिस स्पर्धांमध्ये, खेळाडू देशांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. त्यांची कामगिरी केवळ वैयक्तिक धरली जाते. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खेळाडूंवर होणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच, १८ ग्रँडस्लॅम विजेत्या माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा यांच्यासह व्यावसायिक टेनिस संघटना (एटीपी) आणि महिला टेनिस संघटना (डब्ल्यूटीए) यांनी ऑल इंग्लंड क्लबच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘‘मी युद्धाचे कधीही समर्थन करणार नाही. मात्र, विम्बल्डनने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. खेळाडू, टेनिसपटूंचा युद्धाशी काहीही संबंध नाही. खेळांमध्ये राजकारणाचा हस्तक्षेप झाल्यास, त्याचा परिणाम चांगला होत नाही,’’ असे जोकोव्हिच म्हणाला आहे.

विश्लेषण : रशियासाठी मारियोपोलमधील स्टील प्लांटची लढाई महत्त्वाची का आहे?

कोणते आघाडीचे खेळाडू मुकणार?

गेल्या वर्षी विम्बल्डनच्या मुख्य फेरीत रशिया आणि बेलारूसच्या एकूण २२ खेळाडूंचा सहभाग होता. पुरुषांमध्ये यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला प्रबळ दावेदार मानले जात होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मेदवेदेवने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते, तर यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तसेच पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेला आंद्रे रूब्लेव्ह (रशिया), महिलांमध्ये जागतिक क्रमावारीत चौथ्या स्थानावरील अरिना सबालेंका (बेलारूस), दोन ग्रँडस्लॅम विजेती व्हिक्टोरिया अझारेंका (बेलारूस) आणि गेल्या वर्षीच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपविजेती अनास्तासिया पाव्हलुचेंकोव्हा (रशिया) यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंनाही यंदाच्या विम्बल्डनला मुकावे लागेल.

विश्लेषण : जगात कुठेही मारा करू शकेल असे रशियाचे आरएस – २८ सरमत क्षेपणास्त्र किती संहारक?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदी मागे घेतली जाऊ शकते का?

यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेला २७ जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतचे अंतिम निर्णय घेण्यासाठी ऑल इंग्लंड क्लबकडे दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात परिस्थिती बदलू शकते आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे ऑल इंग्लंड क्लबने म्हटले आहे. त्यामुळे रशिया आणि बेलारूसवरील बंदी कायम ठेवून या दोन देशांच्या खेळाडूंना विम्बल्डनमध्ये ‘तटस्थ खेळाडू’ म्हणून खेळण्याची परवानगी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.